computer

लतादीदींसाठी आयुष्यभराची कमाई देणारा रिक्षावाला चाहता!! काहींनी केले कौतुक, काहींनी दिला रोकठोक डोस!

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी आली आणि चाहत्यांना काळजी वाटू लागली. गेल्या दहा दिवांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे. केवळ भारतातील नाही तर लता मंगेशकर यांचे जगभरात चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.अशातच मुंबईच्या एका रिक्षा चालकाने देखील एका अनोख्या पद्धतीने लता दीदींच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी प्रार्थना केली आहे. त्याने आपली संपूर्ण कमाई लतादीदी यांच्या उपचारासाठी दान केली आहे.

सत्यवान गीते असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून तो लतादीदींचा खूप मोठा चाहता आहे. लतादीदींना तो देवी सरस्वती देवीचे रूप मानतो. जेव्हापासून लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तेव्हापासून तो सतत त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे. लतादीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना त्याने आपल्या रिक्षावरही लिहिली आहे. रिक्षावर त्याने लतादीदी यांचे फोटोही लावले आहेत. तसेच त्यांच्या गाण्याच्या ओळी त्याने रिक्षावर लिहिल्या आहेत.

लता दीदींना लवकर आराम मिळावा म्हणून आयुष्यभराची कमाई त्याने दान केली आहे. त्याची रिक्षा पहायला अनेकजण गर्दी करत आहेत. कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्या प्रेमाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. सत्यवान गीतेही त्याच्या निस्सीम प्रेमामध्ये सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या कौतुकाचा सूर असला तरी काही लोकांच्या मते चाहता असणे वेगळे आणि त्यासाठी आयुष्यभराची कमाई देणे वेगळे. लतादीदींकडे यश आणि त्यामुळे असणारा, त्यांच्या गुंतवणूकींमुळे येणारा अमाप पैसा आहे. त्यापुढे त्यांना गीतेंच्या या रकमेमुळे काही जस्त फरक पडणार नाही. परंतु गीतेंच्या कुटुंबासाठी हा पैसा कदाचित त्यांच्या मूलभूत गरजांसाठी अतिमहत्त्वाचा असू शकतो. त्यामुळे सेलेब्रिटींसाठी इतकंही भावूक होऊ नये असाही रोकठोक सल्ला काहीजणांनी सोशल मिडियावर दिला आहे.

काही असो, लता मंगेशकर यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडल्सवरून त्यांच्या प्रकृतीला आराम पडल्याचे आपल्याला कळलेच आहे. त्या ठणठणीत बऱ्या व्हाव्या ही सर्व चाहत्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो.

शीतल दरंदळ

सबस्क्राईब करा

* indicates required