जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करणारे विस्मृतीत गेलेले प्रमुख नेते डॉ. सैफूद्दीन किचलू कोण होते?
देश स्वतंत्र होण्यासाठी आणि देशातील जनता एकसंध राहावी यासाठी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. पण देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होत असताना आजही असे अनेक महान नेते आहेत ज्यांचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेले नाही. सैफूद्दीन किचलू हे असेच एक नाव आहे.
सैफूद्दीन किचलू यांना जालियनवाला बाग निषेधातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाते. या निषेध सभेनंतरही त्यांनी आपले असामान्य कार्य सुरू ठेवले होते. स्वतंत्र लढा ते देश स्वतंत्र झाल्यानंतरही हिंदू मुस्लिम एकतेसाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य त्यांनी देशाला बहाल केले होते.
किचलूंचे पूर्वज मूळ हिंदू होते. त्यांचे कुटुंब काश्मीरमधल्या बारामुल्लाचे. प्रकाश राम किचलू हे त्यांचे पूर्वज मुसलमान झाले होते. नंतर १८७१ साली काश्मीरमध्ये दुष्काळ पडला तेव्हा त्यांचे आजोबा अमृतसरला आले. किचलूंचे वडील पश्मीना आणि केसरचा व्यवसाय करत होते.
श्रीमंत परिवारात जन्म झाल्याचा थेट फायदा किचलूंना झाला. जगभर प्रसिद्ध असलेल्या केंब्रीज विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे जर्मनीला जाऊन पीएडी पूर्ण केली. त्याकाळी श्रीमंत घरातली मुले परदेशात शिक्षण घेऊन तिथेच स्थायिक होत, तर काही मात्र देशप्रेमाने झपाटून जाऊन देशात परत येत. किचलूंनी अमृतसरला परत येऊन त्यांनी वकिली कारकीर्द सुरु केली. आता देशातले वातावरण मात्र यावेळी तणावाचे होते. कारण इंग्रज शक्ती क्षीण करण्यासाठी देशातील अनेक महत्वाचे नेते जंग जंग पछाडत होते. किचलू देशातील परिस्थिती बघून शांत राहणे शक्य नव्हते. तसा त्यांचा स्वभावही नव्हता.
किचलू यांचे नातू एफ झेड किचलू यांनी सैफूद्दीन किचलू यांच्यावरएक पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव आहे - 'फ्रीडम फायटर - द स्टोरी ऑफ सैफूद्दीन किचलू.' यात म्हटले आहे की, "किचलू केंब्रिजला असताना त्यांना समाजवादी विचारांबद्दल ओढा निर्माण झाला. तसेच फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठा पगडा त्यांच्या विचारांवर होता. यासंबंधी जे दिसेल ते त्यांनी वाचून काढले. यातून त्यांचे देशप्रेम आणि इंग्रजविरोध प्रखर होत गेला."
भारतात आल्यावर किचलूंनी स्वतःला स्वातंत्रलढ्यात झोकून दिले होते. या काळात त्यांची ओळख गांधीजींसोबत झाली. तो काळ इंग्रजांनी आणलेला काळा कायदा रॉलेटला विरोध करण्याचा होता. १९१९ साली ९ एप्रिलला राम नवमीच्या दिवशी उत्साहाचे वातावरण होते. पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायरने किचलू आणि डॉ. सत्यपाल यांना अटक करण्याचे आदेश दिले. गांधीजींनाही अटक करून ब्रम्हदेशात पाठवण्याची त्यांची योजना होती. पण लोकांचा विरोध वाढेल या भीतीने ती रद्द केली. पण किचलू आणि सत्यपाल यांना अटक करून गुपचूप धरमशाला येथे पाठवण्यात आले.
गांधीजींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात किचलूंनी सक्रिय भाग घेतला. पुढे खिलाफत चलवळीवेळीही ते सक्रिय झाले. देशभक्ती आणि सत्याग्रह या दोन मार्गांवर त्यांचा मोठा विश्वास होता. हिंदू मुस्लिम एकता हा त्यांच्या कामाचा मोठा भाग होता. यासाठी ते प्रचंड मेहनत घेत असत. किचलू यांनी अमृतसरला १९२१ साली स्वराज आश्रम स्थापन केला. येथे तरुण मुलांना देशप्रेम आणि हिंदु-मुस्लिम एकतेचे धडे दिले जात असत. आज देशात उभ्या असलेल्या जामीया मिलिया विद्यापीठाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. त्यांनी याच आपल्या कामासाठी तनझीम नावाचे उर्दू वृत्तपत्र सुरू केले होते.
किचलू यांचा आयुष्यातील अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ते मुस्लिम लीगचे कट्टर विरोधी होते. मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानची केलेली मागणी मान्य करू नये यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. १९४० साली पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी मुस्लिम लीगला असलेला आपला विरोध अजून वाढवला.
१९४७ ला देश स्वतंत्र झाला तरी त्यांनी आपले काम मात्र सुरू ठेवले. समोर इंग्रज नसले तरी देशात शांतता राहावी म्हणून त्यांनी पीस अँड फ्रेंडशिपसारख्या संस्थांच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवले. यासाठी ते १९५२ साली लेनिन पीस प्राईज मिळवणारे पहिले भारतीय ठरले. आपले काम शेवटपर्यंत त्यांनी सोडले नाही. शेवटी ९ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या किचलू यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी याच हेतूने ही माहिती तुमच्यापुढे आणली आहे. अधिकाधिक लोकांना किचलू यांचे कार्य माहीत व्हावे यासाठी हा लेख शेयर करा.
उदय पाटील




