computer

सोशल मिडियावरचे स्टार : इंजिनिअरिंगमध्ये अपयश, फिटनेस ट्रेनर ते यशस्वी युटूबर हा रणवीर अलाहाबादिया

आज आपण ज्या युट्यूबरची गोष्ट वाचणार आहात त्या भावाचे आज वय आहे २७ वर्षं!! आजच्या तारखेला त्याच्या चॅनेलवर विविध क्षेत्रातील दिग्गज जसे गौरगोपाल दास, ए. आर. रहमान, प्रियंका चोप्रा, सैफ अली खान, सुधा मूर्ती, जय शेट्टी असे मोठे लोक येऊन गेले आहेत. एका युट्यूब चॅनेलपासून सुरुवात करणाऱ्या या युअवकाचे आज अर्धा डझन युट्यूब चॅनेल्स् आहेत. डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे, यातून तो कोट्यावधींची उलाढाल करतो. रणवीर अलाहाबादिया असे या पठ्ठ्याचे नाव आहे. बियर बायसेप्स असे त्याच्या मुख्य चॅनेलचे नाव आहे.

रणवीरचे आडनाव अलाहाबादिया असले तरी त्याचा जन्म २ जून १९९३ रोजी मुंबई येथे झाला होता. सधन घरातला मुलगा, साहजिकच शिक्षणासाठेवे काही संघर्ष वगैरे त्याला करावा लागला नाही. बारावीनंतर इतर अनेक मुलांप्रमाणे तोही इंजिनिअरिंगला गेला. मात्र इंजिनिअरिंग करताना बऱ्याच मुलांना जे दिवस बघावे लागतात, तेच त्याच्याही वाट्याला आले.

पहिल्याच वर्षी भाऊ बेसिक इंजिनिअरिंगसारख्या विषयात नापास झाला. मग दारूचे व्यसन लागले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे ब्रेक-अप झाले. सर्व नातेवाईकांची मुले चांगली प्रगती करत असल्याने त्याच्यावर मोठा दबाव आला. अशा सर्व परिस्थितीत तो अतिशय निराश झाला. तो दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत ढकलला गेला.

तरुण वयात एकामागे एक अपयश आले तर माणूस जास्तच वाईट विचार करतो. त्याच्या मानत आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला समजून घेतले. आयुष्य या सर्व गोष्टींपेक्षा खुप मोठे आहे हे त्याला त्यांनी समजावून दिले. या काळात त्याला एक चांगली सवय लागली ती म्हणजे व्यायामाची. व्यायामामुळे त्याची दारू सुटली आणि त्याचे मन एकाग्र व्हायला लागले.

आता तो फिटनेस ट्रेनर म्हणून लोकांना फिटनेसचे धडे द्यायला लागला. त्याकाळी त्याने तन्मय भटचा फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम पाहिले होते. रणवीरला फिटनेससंबंधी गोष्टी अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी युट्यूब चांगले माध्यम वाटले. २०१५ साली त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले. बियर बायसेप्स नावाने त्याने युट्यूबवर चॅनेल सुरू केले.

युट्यूबसाठी लागणारे कॅमेरा वगैरे साहित्य घेण्यासाठी रणवीरने आपले सर्व गेमिंग साहित्य विकले. एक पॅशन फॉलो करण्यासाठी त्याला दुसऱ्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागला. युट्यूबवर सुरुवातीला त्याचे व्हिडिओ चालले नाहीत. मग त्याने अनेक गोष्टींवर काम केले. हळूहळू त्याचे चॅनेल चांगले व्ह्यूज मिळवू लागले.

आधी त्याचे व्हिडिओ इंग्लिशमध्ये असत. भारतात हिंदी कंटेंट अधिक चालते हे लक्षात येणे कठीण नाही. मग त्याने २०१७ साली रणवीर अलाहाबादिया या स्वतःच्या नावाने हिंदी चॅनेल सूरु केला. स्वतःचा तगडा अभ्यास आणि विषय सोप्या पद्धतीने पटवून देण्याची खुबी यामुळे हे चॅनेलही चांगलेच चालले.

रणवीरला खरे यश मिळाले ते त्याने इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली त्यावेळी. आता जवळजवळ प्रत्येक चॅनेलवर सेलब्रिटी बोलवून चॅनेल मोठा करण्याचे प्रयत्न होतात. पण रणवीरने विविध विषयांना हात घालून त्यातले सेलेब्रिटी तज्ञ आपल्या चॅनेलवर आणले. यामुळे त्याला मोठ्या वर्गापर्यंत पोहोचणे सोपे झाले. आजवर दिडशेपेक्षा जास्त सेलब्रिटी त्याच्या 'द रणवीर अलाहाबादिया' शोवर येऊन गेले आहेत.

सोबतच त्याने मॉंक-इ नावाची डिजिटल मार्केटिंग कंपनी स्थापन केली. बियरबायसेप्स या चॅनेलला आज ३.६७ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर रणवीर अलाहाबादिया या हिंदी चॅनेलला २.७९ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंजिनिअरिंग करताना सहसा येणारे सर्व समस्या त्याने बघितल्या त्यातून मार्ग काढत आज तो कोट्यधीश युट्यूबर झाला आहे. आपले पॅशन ओळखून जीव तोडून मेहनत करणे हेच त्याच्या यशाचे सार सांगता येईल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required