बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये आंद्रे रसेल आऊट झाला त्यापद्धतीने आजवर कुणीच आऊट झाले नाहीय. नक्की काय आहे हा आगळावेगळा प्रकार?

आयपीएलमध्ये अनेक चित्रविचित्र प्रसंग बघायला मिळत असतात. म्हणजे कधी बाऊन्ड्रीला अगदीच कमी अंतर असताना कॅच घेणे असो की अगदी दुरून नेमका स्टंपवर बरोबर थ्रो मारणे असो. आयपीएलचा हाच चित्तथरारक अंदाज तिच्या लोकप्रियतेमागील कारण आहे. आयपीएलच्या धर्तीवर विविध देशांत प्रीमियर लीग सुरू आहेत. बांगलादेश प्रीमियर लीग त्यांपैकीच एक आहे.

बीपीएलमध्ये शुक्रवारी खुलना टायगर्स आणि मिनिस्टर ग्रुप ढाका हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण या संघात झालेला एक रनआऊट इतका भन्नाट होता की आजवर कधीही असा रनआऊट झाला नसेल. आंद्रे रसेल हा बिचारा फुकटच आऊट झाला असे म्हणावे लागेल.

सामन्याची १५वी ओव्हर सुरू होती. आंद्रे रसेल आणि महमदुल्ला हे मिनिस्टर ग्रुपकडून मैदानात उतरले होते. तर खुलना टायगर्सकडून तिसारा परेरा बॉलिंग करत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रसेलने थर्ड मॅनकडे बॉल ढकलला. एक धाव घेण्यासाठी तो धावला.

 

बॉल हाती आल्यावर मेहंदी हसनने तो रसेल धावत होता त्याच्या विरुध्ददिशेच्या स्टम्पसकडे फेकला. बॉलने स्टंप्स तर उडवल्या, पण तोवर महमदुल्ला क्रीझमध्ये पोहोचला होता. खरा चमत्कार मात्र पुढे झाला. तो बॉल काही एक साईडचे स्टंप उडवून शांत झाला नाही. तिथून तो बॉल गेला थेट पुढच्या स्टंपवर आणि दांड्या उडवल्या.

रसेलला वाटले बॉल तिकडच्या स्टंप्स उडवून तिकडेच थांबला असेल. मात्र त्याच्या नशिबी इतक्या विचित्र पद्धतीने आऊट होणे लिहिले होते. सामन्यातील या आगळ्यावेगळ्या विकेटने मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

क्रिकेटला आनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते, पण तो इतका अनिश्चित असेल हा विचार कुणी केला नसेल. हा व्हिडिओ बघितल्यावर रसेलबद्दल सहानुभूती बाळगावी की या प्रकारावर हसावे हेच कळत नाही असा हा प्रकार घडला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required