computer

भारताच्या गोलंदाजीचा अनेक वर्ष कणा राहिलेल्या श्रीनाथ बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

भारतात क्रिकेट हा खेळ किती लोकप्रिय आहे हे सांगण्याची गरज नाही. पण या लोकप्रियतेत सहसा फिट बसतात हे बॅट्समन. बॉलर्सच्या वाट्याला तुलनेत तितकी लोकप्रियता येत नाही. मात्र त्यातही काही बॉलर्स असतात तुफान लोकप्रिय होतात, अनिल कुंबळे, हरभजन सिंग हे नावे त्यात घेता येतील. याच यादीतील एक नाव म्हणजे जवागल श्रीनाथ!!

जवागल श्रीनाथ क्रिकेट संघात दाखल झाला तेव्हापासून क्रिकेटमध्ये कर्नाटकचे खेळाडू चमकू लागले. व्यंकटेश प्रसाद हा भेदक बॉलर, तसेच पुढे भारताची भिंत बनलेला राहुल द्रविड हे श्रीनाथची कर्नाटकी परंपरा पुढे घेऊन जाणारे खेळाडू म्हटले तर गैर होणार नाही.

कर्नाटकातील म्हैसूर येथे जन्मलेल्या श्रीनाथची तुफान बॉलिंग पाहून त्याला म्हैसूर एक्सप्रेस हे नाव आपोआप लाभले. एकूण ६२ टेस्ट आणि २२९ वनडे अशी भरभक्कम कारकीर्द करणाऱ्या श्रीनाथने या दरम्यान अनेक विक्रम केले आहेत.

श्रीनाथने क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते साल होते १९९२. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याने पदार्पण केले, पण या सामन्यात त्याला छाप पाडता आली नाही. पुढे मात्र त्याचा करिष्मा दिसला. भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत श्रीनाथ कुंबळे नंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ३१५ विकेटस् घेतल्या आहेत.

श्रीनाथच्या नावावर असलेला अजून एक विक्रम म्हणजे ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक वर्ल्डकप खेळले आहेत त्यात त्याचे नाव सर्वात वरच्या स्थानी आहे.. १९९२ साली त्याने वनडे खेळायला सुरुवात केली आणि याचवर्षी तो वर्ल्डकप संघाचा भाग झाला. नंतर १९९६, १९९९ आणि २००३ असा त्याचा प्रवास होता. या काळात त्याने भारतासाठी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. ३४ सामन्यांमध्ये त्याने ४४ विकेट घेतल्या आहेत.

१९९२, १९९६, १९९९ आणि २००३ अशा चार वर्ल्डकपमध्ये एकूण ४४ विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथ झहीर खानसोबत हा विक्रम राखून आहे. झहिरने २००३, २००७ आणि २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये हीच कामगीरी करून दाखवली होती. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३०० विकेट घेणारा श्रीनाथ हा एकमेव भारतीय फास्ट बॉलर आहे. हा ३०० विकेटस् घेणाचा विक्रम जगात आजवर मोजक्या 13 खेळाडूंनी केला आहे आणि त्यात श्रीनाथचा समावेश आहे. शारजाहचे ग्राऊंड तर श्रीनाथसाठी घरचे वाटावे अशी त्याची तेथील कामगिरी आहे. या ग्राउंडवर त्याने सर्वाधिक ३९ विकेट घेतल्या आहेत.

जवागल श्रीनाथचा बॉलिंगचा करिष्मा किती होता हे यावरून समजू शकते की २००२ साली अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊनही २००३ सालच्या वर्ल्डकपसाठी त्याला गांगुलीने पुन्हा बोलावून घेतले होते. श्रीनाथ संघाला वर्ल्डकप मिळेल या आशेने परतला.

पूर्ण संघाने प्रचंड जोर लावत फायनलमध्ये धडक दिली. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव करत, भारतीयांचे दुसऱ्या वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंग केले. अशा पद्धतीने कारकिर्दीचा शेवट गोड करण्यासाठी परतलेल्या श्रीनाथचे स्वप्नही अपूर्णच राहिले.

आज श्रीनाथ निवृत्ती घेऊन रेफरी म्हणून काम करत आहे. त्याने आजवर ३५ कसोटी सामने, १९४ एकदिवसीय सामने आणि ६० T-20 सामन्यांत रेफरी म्हणून काम केले आहे!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required