computer

जगातल्या २५ आश्चर्यांपैकी एक- आरोग्यास हितकारक आईसलँडचे गरम पाण्याच्या झऱ्यांचे स्पा!!

चांगल्या आरोग्यासाठी जसे अन्न महत्वाचे, तशीच ताजी हवा, स्वच्छ पाणीही तितकेच महत्वाचे असते. शहरवासी तर इतक्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत की स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ते पैसेही मोजायला तयार असतात. तुम्हाला कोणी सांगितले की इथे पाण्यात आंघोळ केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल तर तुम्हाला विश्वास बसेल काय? पण युरोपातल्या आइसलँडमधली माणसे रोजच्या रोज पाण्यात बसून अनेक आजारांपासून दूर राहत आहेत आणि आश्चर्य म्हणजे हे नैसर्गिक पाण्याचे स्पा आहेत.

आइसलँड हा उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळचा देश आहे.इथल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.पण इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले सर्वात स्वच्छ पाणी !. जगातले स्वच्छ पाणी मिळणाऱ्या देशात आइसलँडचा पहिला नंबर लागतो.आश्चर्य म्हणजे इथे जागोजागी स्पा आहेत. घराबाहेर, हॉटेल बाहेर हे टब आहेत.त्यामध्ये डुंबून, आरामात बसून लोक त्याचा उपयोग करतात. हे गरम पाण्याचे नैसर्गिक स्पा उबदार असतात.हे भू-औष्णिक स्पा आहेत आणि तसेच यातले पाणी अनेक आजारांना पळवून लावते. त्वचा आजार असल्यास या पाण्यामध्ये बसल्यास बऱ्याच अंशी कमी होतात. हे पाणी सल्फर आणि सिलिकेट्ससह विविध खनिजांनी समृद्ध असते.

इथले ब्लू लगून आइसलँड हे गरम पाण्याचे खास ठिकाण आहे. इथल्या स्पामध्ये आंघोळ करण्यासाठी आणि या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. दरवर्षी पर्यटक उन्हाळ्याच्या ऋतूऐवजी हिवाळ्यात येथे येण्यास प्राधान्य देतात. इथे आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी असलेल्या पाण्याचे तापमान ३७-३९ डिग्री सेल्सियस असते. म्हणूनच हिवाळ्यात स्पा घेण्यासाठी अनेकजण भेट देतात. या स्पाच्या गरम पाण्यात सल्फर सारख्या खनिजांचे मिश्रण असते, त्यामुळेच सोरायसिससारखा त्वचारोग असलेल्या रुग्णाने त्यात आंघोळ केली तर त्यांचा आजार बरा होतो असे म्हणतात. त्याचबरोबर या स्पामध्ये आंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित इतर आजारांपासूनही सुटका मिळते. इथे असलेले मानवनिर्मित स्पा जवळच्या भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील पाणी वापरतात आणि हे पाणी दर दोन दिवसांनी बदलले जाते. जे लोक आजाराने त्रस्त आहेत आणि स्पामध्ये जाऊ शकत नाहीत, असे लोक रॅम्पवरून व्हील चेअरवर बसून येथे पोहोचू शकतात.

इथे बरेच हॉटेल्स स्पा आणि तलावाची सुविधा देतात. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे या स्पामध्ये डुंबून लोक आनंद घेतात.आइसलँडवासी निसर्गाने त्यांना दिलेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करतात आणि पर्यटक भाडे देऊन या स्पाचा आनंद घेतात. इथल्या पाण्यामुळे झोपेची समस्या असेल तर तीही सुटते आणि शांत झोप लागते असे म्हणतात.

प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती त्याला खास बनवते. आपल्याकडेही काही नद्यांना पवित्र मानून तिथे स्नान केले जाते याचे कारणही शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर नदीचे स्वच्छ पाणीच असू शकते. शेवटी ही निसर्गाची किमया आहे, माणूस कितीही वैज्ञानिकदृष्ट्या पुढे गेला तरी निसर्गाशी स्पर्धा होऊ शकत नाही.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required