computer

शोलेचा गब्बरसिंग ज्यावर बेतला, त्या खऱ्याखुऱ्या 'गब्बरसिंह'ची कहाणी. याचं नाव खरंच गब्बर सिंह होतं!!

"कितने आदमी थे?","ये हाथ मुझे देदे ठाकूर", हे संवाद ऐकताच आपल्या डोळ्यासमोर कोण उभा राहतो? अर्थात शोले आणि त्यातला क्रूर गब्बर! अमजद खानने ती व्यक्तिरेखा अगदी जिवंत केली होती. तो खलनायक हिंदी सिनेमाचा एक माईलस्टोन ठरला होता. आज चार दशके उलटून गेली तरीही गब्बरची भूमिका आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे.

गब्बरची दहशत, भेदक नजर,अमानुष अत्याचार हे सर्व चित्रपटात पाहताना देखील आपल्याला अक्षरशः घाम फुटतो. त्या गब्बरला सगळे ओळखतात, पण तुम्हाला माहिती आहे का, असा गब्बर खरोखरच अस्तित्वात होता. या गब्बरने मध्य प्रदेशात अशी काही दहशत पसरवली होती की सर्व पोलीसदल हैराण झाले होते. आज पाहूयात या खऱ्या गब्बरची कहाणी!

'गबरा' उर्फ 'गब्बर सिंह' याचा जन्ममध्यप्रदेशात भिंड जिल्ह्यातील डांग गावी १९२६ मध्ये झाला. हा स्वातंत्रपूर्व काळ होता. त्याकाळी दरोडेखोरांच्या टोळ्या अनेक गावांमध्ये घुसून लुटमारी, खून, बलात्कार करत. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या टोळ्या बंदुकी घेऊन येत असत आणि लूटमार करून पळून जात असत. अनेकदा यांचा ठावठिकाणाही लागत नसे.

१९५५ मध्ये गब्बर 'कल्याण सिंह' या दरोडेखोर टोळीत सामील झाला. टोळीत काही दिवसात तो कंटाळला आणि सहकाऱ्यांच्या साथीने काही महिन्यातच त्याने स्वतःची टोळी तयार केली. भिंड, ग्वाल्हेर, इटावा, ढोलपूर या भागामध्ये त्याची प्रचंड दहशत होती.

त्यावेळी मध्यप्रदेशात के.एफ. रुस्तम हे पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते स्वतः आणि पोलिसांची फौज गब्बर सिंहचा शोध घेत होते, पण दरवेळी तो पोलीसांना गुंगारा देऊन पळून जात असे. आणि विशेष म्हणजे एकही गावकरी त्याच्या ठाव ठिकाण्याबद्दल अवाक्षर काढत नव्हता. याच कारणामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागणे अजून अवघड झाले होते. पोलिस महानिरीक्षक के.एफ. रुस्तम यांनी गब्बर सिंहचे अनेक किस्से आपल्या दैनंदिनी मध्ये लिहून ठेवले होते. असे म्हणतात गब्बरने आपल्या कुलदेवीला ११६ लोकांच्या नाकांची भेट अर्पण करण्याचा नवस केला होता. एका तांत्रिकाने त्याला सांगितले होते की ११६ लोकांच्या नाक अर्पण केल्याने तो कधीही पोलिसांच्या किंवा इतर कुणाच्या गोळीबारात मरणार नाही.

त्या काळात चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांच्या १६ टोळ्या अस्तित्वात होत्या. सर्वसामान्य लोकांसोबतच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील चिंतेत होते. गब्बरच्या जुलमी व अनाचारी कृत्यांची दहशत मोडून काढण्यासाठी तीन राज्यांच्या पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पण असं म्हणतात ना, पापाचा घडा भरला की अंत जवळ येतोच. त्याप्रमाणे गब्बरला मारणारा एक हिरो म्हणजे पोलीस अधिकारी राजेंद्र प्रसाद मोदी आले! त्यावेळी ते डिप्युटी एसपी होते. त्यांनी यापूर्वी कुख्यात दरोडेखोर पुतळीबाई हिला जेरबंद केले होते. गब्बरचा खात्मा करायचा विडाही मोदी यांनी उचलला. त्यांनी काम सुरू केले.

एका घटनेत मोदी यांनी रामचरण नावाच्या गाववाल्याच्या मुलाचा जीव वाचवला होता. म्हणून रामचरणला जेव्हा कळले मोदी गब्बरला पकडण्यासाठी आले आहेत तेव्हा तो धावत मोदी यांच्या घरी आला आणि गब्बर आपल्या टोळीसह जिथे बसला होता याचा ठावठिकाणा सांगितला. मोदी यांनी त्या रात्रीच सहकाऱ्यांसोबत गब्बरला पकडण्यासाठी कूच केले. पोलिस व दरोडेखोर यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झाला. आपल्या प्राणांची पर्वा न करता मोदी स्वतः टोळीच्या अगदी जवळ पोहोचले. दोन हातबॉम्ब फेकून त्यांनी हल्ला चालू ठेवला. दुर्देवाने एका हातबॉम्बची सेफ्टी पिन गच्च झाली. पण दुसरा बाँब त्यांनी फेकला. त्यात गब्बरचा जबडा पूर्णपणे जखमी झाला.अखेरीस पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. गब्बर मेला. पूर्ण टोळी जखमी झाली, बरेचसे दरोडेखोर मारले गेले. मोदी आणि इतर पोलिसांना यश मिळाले होते.

ही घटना नोव्हेंबर १९५९सालची आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना गाववाल्यांनी प्रत्यक्ष पहिली. अगदी रेल्वे, बस थांबवून, त्यावरील छतावर श्वास रोखून लोक हे थरार नाट्य अनुभवत होते. गब्बर मेल्यावर एकच जल्लोष झाला. पोलिस महानिरीक्षक के.एफ. रुस्तम यांनीही राजेंद्र प्रसाद मोदी यांच्यासकट सर्व पोलिसांचे कौतुक केले.

१३ नोव्हेंबरच्या रात्री गब्बर पर्वाचा अंत झाला.१४ नोव्हेंबर रोजी ७० व्या वाढदिवसाची भेट म्हणून मध्य प्रदेश पोलिसांच्या वतीने ही बातमी देण्यात आली. इतकी वर्षं पोलिसांना छळणारा दरोडेखोर अखेर संपला होता. राजेंद्र प्रसाद मोदी यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले.

शोले चित्रपटाचे लेखक सलिम खान यांचे वडील मध्य प्रदेश पोलिसांत होते. त्यामुळे त्यांच्याकडून सलिम खान यांनी खऱ्या गब्बरचे किस्से ऐकले होते. कदाचित हेच किस्से शोले चित्रपटाची जन्माचे कारण बनले असावे.

मंडळी कशी वाटली खऱ्याखुऱ्या गब्बरची कहाणी? कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required