computer

आजपासून अंडर १९ वर्ल्डकप चालू होतोय, भारताच्या मॅचेस कुणासोबत आणि कधी आहेत हे पाहून घ्या!!

आयसीसी आयोजित करत असलेल्या क्रिकेटच्या जवळपास सर्वच स्पर्धा भारतात तरी लोकप्रिय आहेत. यातील एक महत्वाची स्पर्धा म्हणजे अंडर १९ वर्ल्डकप. या स्पर्धेत जिंकणे म्हणजे देशाचे नाव तर मोठे होत असतेच, पण या स्पर्धेतून भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू पण समोर येतात.

यंदा १४ वी अंडर १९ स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदाची स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि १६ संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित होत आहे. १९८८ साली पहिल्यांदा सुरू झालेली ही स्पर्धा नवख्या खेळाडूंना भविष्यात आपापल्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची असते.

भारत हा दरवेळच्या स्पर्धेत भाग घेणारा सर्वात जुना संघ आहे. भारतासोबतच सामील होणाऱ्या प्रत्येक संघाला विजेतेपदाची आस लागलेली आहे. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत.

हे १६ संघ खालीलप्रमाणे ग्रुप्समध्ये विभागण्यात आले आहेत.

ग्रुप ए - बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, यूएई

ग्रुप बी - भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा

ग्रुप सी - अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे

ग्रुप डी - ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्टइंडिज

या स्पर्धेत पात्रता फेरी, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल असे चार टप्पे असतील.

१९८८ साली झालेली पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. २००२ आणि २०१० साली देखील त्यांनी विजय मिळवला होता. तर इंग्लिश साहेबांनी फक्त १९९८ साली विजय मिळवला आहे. भारत मात्र इथेही टॉपवर आहे. २०००, २००८, २०१२, २०१८ असे चार वेळा भारताने हा वर्ल्डकप जिंकला आहे.

तर पाकिस्तानने २००४ आणि २००६ अशा सलग दोन स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांनी अनुक्रमे २०१४, २०१६ आणि २०२० यासाली स्पर्धा जिंकली आहे.

भारताला १९९८ साली दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन घरी यावे लागले होते. पण २००० साली मोहम्मद कैफने पहिल्यांदा भारताला ही स्पर्धा जिंकून दिली होती. पुढे २००८ साली विराट कोहली, २०१२ साली उन्मुक्त चंद तर २०१८ साली पृथ्वी शॉ यांनी भारताला ही ट्रॉफी जिंकून दिली आहे. तर ३ वेळा २००६, २०१६ आणि २०२० साली भारताला फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले होते.

या स्पर्धेत भारताचे सामने खालीलप्रमाणे आहेत.

१५ जानेवारी - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१९ जानेवारी - भारत विरुद्ध आयर्लंड

२२ जानेवारी - भारत विरुद्ध युगांडा

हे सामने स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहेत.

भारताने सराव सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी करत स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना भारताने पराभवाची चव चाखायला लावली आहे. आता प्रत्यक्षा स्पर्धेत ही कामगिरी दिसते का याकडे सर्वांचे लक्ष राहील.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required