computer

ऑटो रिक्षाचं रुपडं पालटलं....आता मुंबईच्या रस्त्यांवर धावणार 'क्युट रिक्षा' !!

काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा यांना एकत्र करून जे तयार होईल त्याला ‘क्युट रिक्षा’ (Qute Rickshaw) म्हणता येईल. ही क्युट रिक्षा बजाजने तयार केली आहे. खरं तर ही आकाराने लहान असलेली कार आहे, पण तिला बजाजने रिक्षा म्हणून लाँच केलंय. लवकरच क्युट रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर दिसेल.

मंडळी, बजाजने काही महिन्यापूर्वीच ही क्युट रिक्षा बाजारात आणली होती. तिला सार्वजनिक वाहनांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून कंपनीकडून प्रयत्न सुरु होते. परिवहन विभागाने नुकतंच क्युट रिक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे. या क्युट रिक्षाचे पहिले मालक हे मुंबईचे नितीन भालेकर ठरले आहेत.

आता क्युट रिक्षाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

मंडळी, जर ‘शेअर रिक्षा’ असेल तर मागे तीन लोक आणि चालकाच्या शेजारी एकाला बसवलं जातं. असा जीवघेणा प्रकार क्युट रिक्षामध्ये नसेल. आकाराने लहान असली तरी आत ३ माणसांना आरामात बसता येईल एवढी जागा आहे. जर प्रवाशांचा आकार लहान असेल तर कदाचित ४ लोकही सामावू शकतात. तसेच क्युट रिक्षाला दारे आहेत आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीटबेल्ट्स सुद्धा आहेत.

दुसरं वैशिष्ट्य असं की ही क्युट रिक्षा पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी या तीनही इंधनावर चालते. याखेरीज ऑटोरिक्षाच्या इंजिनपेक्षा क्युट रिक्षाचे इंजिन अत्याधुनिक आहे. कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर ती कपू शकते.

तर मंडळी, नवीन क्युट रिक्षा तुम्हाला कशी वाटली ? तुमची प्रतिक्रिया नक्की द्या !!