प्रसंगी माणसं पण देवदूत होतात -बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी वाचवला चिमुकल्याचा जीव !
सोशल मीडिया बऱ्याचदा अफवा, नकारात्मक गोष्टी पसरवताना दिसतो. पण आज अशी एक बातमी व्हायरल झाली आहे ज्यामुळे अनेकांचे डोळे भरून आले. या जगात अजूनही माणुसकीचा ओलावा आहे याचा प्रत्यय आला. ही घटना मुंबईतली आहे. बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी एका लहानग्याला वाचवायला धाव घेतली आणि त्यांची धावपळ एका महिलेने प्रत्यक्ष पाहून जे घडले ते ट्विट करून त्यांचे आभार मानले. त्या महिलेचे ट्विट बघता बघता व्हायरल झाले आणि त्या बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा खास सत्कार ही करण्यात आला.
बेस्ट बस क्रमांक ३३ चे चालक श्री दाणे आणि कंडक्टर श्री लोहार हे नेहमीप्रमणेच ड्युटीवर होते.दादरला दुपारी १ च्या सुमारास बसमधील एका पाच वर्षाच्या मुलाला अचानक फिट आली आणि तो पडला. त्याच्या आईला धक्का बसला. ती रडू लागली. बसमधील कंडक्टर आणि चालक दोघांनीही क्षणात इतर प्रवाश्यांना उतरवून बस मार्ग बदलला. त्यांनी थेट बस ठाकूर हॉस्पिटलला नेली. ते तेवढच करून थांबले नाहीत. तर मुलाला कडेवर उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यांनी डॉक्टरांना मुलाचा जीव वाचला पाहिजे , सर्व उपचार करा " अशी विनंतीही केली. नंतर काउंटर वर जाऊन पैसेही भरले. त्या मुलाच्या आईला धीर दिला. ही सारी घटना तिथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या महिलेने पहिली. तन्वी गवाणकर असे त्यांचे नाव आहे.
त्यांना बेस्ट कर्मचाऱ्यांचे खूप कौतुक वाटले. म्हणून त्यांनी हे सोशल मीडियावर शेयर केलं. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. खुद्द सचिन तेंडुकरसह अनेक सेलिब्रेटींनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी जी माणुसकी दाखवून तत्परता दाखवली त्यामुळे त्या लहान मुलाचा जीव वाचला.
बेस्टचे महाव्यवस्थापक श्री लोकेश चंद्र यांनीही बस मार्ग ३३ चे कार्यरत कर्मचारी श्री लोहार आणि श्री दाणे यांना आपल्या कार्यालयात बोलावून विशेष सत्कार केला. व ट्विट करून त्याचे फोटोही शेयर केले.
शीतल दरंदळे




