घरात बाग फुलवण्याची नवी पद्धत....वाचा 'टेरेस फार्मिंग'बद्दल !!

गच्चीवरच्या बागांबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्यासाठी असलेल्या फेसबुक ग्रुपचे तुम्ही कदाचित सभासदही असाल किंवा तुमच्याकडे जागा असेल तर बाग लावण्याचा, ती फुलवण्याचा मनमुराद आनंदही तुम्ही कदाचित घेत असाल. या गच्चीवरच्या बागेचं गोंडस आणि मॉडर्न नाव आहे टेरेस फार्मिंग!! टेरेसवर झाडे लावून त्यांना जगवणे असा एकंदरित हा प्रकार आहे. सहसा मोठ्या शहरांमध्ये टेरेस फार्मिंगचा प्रसार बऱ्यापैकी झालेला दिसतो. ५-१० झाडे लावून त्यांची निगा राखणे, जेणेकरून निसर्गाच्या थोडंफार तरी सानिध्यात असल्याचे समाधान मिळेल या प्रकारच्या हेतुमधून सहसा टेरेस फार्मिंग सुरू केलेले दिसते.
ही गच्चीवरची बाग वाटते तसे सोपे काम नाही. झाडांची निवड, त्यांचं वजन, मोठी झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे हलवावे लागते की कसे याचे प्लॅनिंग करणे.. अशा बऱ्याच गोष्टी यात येतात. त्यामुळे हे टेरेस फार्मिंग करणाऱ्यांचं कौतुक आहे. म्हणूनच आज आम्ही अशा भन्नाट माणसाची गोष्ट सांगणार आहोत. या माणसाने आपल्या टेरेसवर खरोखरीचं शेत उभं केलं आहे. ते ही एकाहून एक वेगळ्या आयडिया लढवून!!! तेलंगणाच्या विकाराबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मोईज यांची ही गोष्ट!!!
जवळपास ४ वर्षांपूर्वी त्यांच्या मनात ही गच्चीवरच्या बागेची आयडिया आली. सुरुवात करण्यापूर्वीच त्यांनी ठरवले होते की झाडांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया करायची नाही आणि आजही त्या नियमाचे ते काटेकोर पालन करत आहेत.
यातली सर्वाधिक आकर्षक गोष्ट म्हणजे ही झाडे लावण्यासाठी त्यांनी बाजारातून तयार सामान आणलं नाही. त्यांनी घरातल्याच आता कामात नसलेले बूट, टीपॉय, जीन्स, बॉटल्स, डब्बे अशा टाकाऊ वस्तूंचा याकामी उपयोग केला आहे. यातच माती भरायची आणि झाड लावायचे अशी ही त्यांची डोकॅलिटी!!!
आता एवढा भारी प्रयोग केल्यावर कौतुक तर होणारच ना!! आतातर देशभर त्यांचे नाव पोहोचायला लागले आहे. पण सुरुवातीपासून स्थानिक अधिकारी तिथे भेट देऊन त्यांचे कौतुक करत असत. तसेच त्यांचे पाहून त्यांच्या शहरात इतरांनीसुद्धा तो प्रयोग सुरू केला आहे.
मोहम्मद सांगतात की अतीव समाधान या एकाच कारणासाठी एवढी उठाठेव आम्ही करत असतो. तर वाचक मंडळी, तुम्हीसुद्धा जर अशाप्रकारचा एखादा प्रयोग केला असेल तर आम्हाला जरूर कळवा...