computer

फोटो स्टोरी : मिस वर्ल्ड, मिस इंडिया अशा स्पर्धा नसलेल्या काळात चक्क घोट्यांच्या सौंदर्यस्पर्धा व्हायच्या?

मिस वर्ल्ड आणि मिस इंडिया सारख्या सौंदर्य स्पर्धा भरायच्या आधी स्त्रियांसाठी चक्क घोट्यांची सौंदर्य स्पर्धा भरवली जायची? या फोटोत दिसतच आहे ते! स्त्रियांना एका पडद्यामागे उभं केलं जायचं आणि त्यांचे घोटे तपासले जायचे. घोट्याचा आकार, सौंदर्य, त्याचा आकर्षकपणा पाहून विजेतेपद घोषित केलं जायचं. 

घोट्यात एवढं काय खास आहे, या स्पर्धा कशा जन्माला आल्या, का आणि कशा बंद पडल्या?... आजच्या फोटो स्टोरीत आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

या स्पर्धांना इंग्रजीत Pretty Ankle competition म्हणतात. या स्पर्धा १९२० ते १९३० दरम्यान प्रसिद्ध होत्या. एका माहितीनुसार १९५० साली सुद्धा अशी एक स्पर्धा भरवण्यात आली होती. सौंदर्य स्पर्धांवर एक आरोप असा केला जातो की या स्पर्धा सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करण्यासाठी भरावल्या जातात. त्याचा उगम कुठेतरी घोट्यांच्या स्पर्धेत आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला फॅशन इंडस्ट्री बदलत होती. स्टॉकिंग्ज, मोजे यांचं उत्पादन वाढलं होतं आणि ते सामान्य स्त्रियांच्याही ऐपतीत बसत होते. या कारणाने त्यांची जाहिरात करण्याच्या दृष्टीने घोट्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विजेत्या महिलेला स्पर्धेच्या आयोजक कंपनीचे स्टॉकिंग्ज मिळायचे आणि शिवाय मोठं नावही व्हायचं.

१९५३ साली इंग्लंडची राणी एलिजाबेथ २ हिच्या राज्याभिषेक स्पर्धेच्या वेळी अशीच एक स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यावेळी Worcestershire या वृत्तपत्रात छापून आलेली बातमीत काय लिहिलेलं पाहूया.

“One of the main attractions at a big party organised by residents at Norton and All Saint’s Road in Bromsgrove was the ladies’ ankle competition. It was won by Mrs Biddle who welcomed the prize of a pair of nylon stocking.”

राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळीही घोट्यांची स्पर्धा हे सर्वात मोठं आकर्षण होतं. ही स्पर्धा सौ. बीडल नावाच्या बाई जिंकल्या होत्या आणि त्यांना बक्षीस म्हणून नायलॉनच्या स्टॉकिंग्ज मिळाल्या होत्या.

घोट्यांच्या स्पर्धा प्रसिद्ध होण्यामागे फक्त स्टॉकिंग्ज हे एक एकच कारण नव्हतं. त्याकाळी पाश्चात्त्य जगात घोटा हा स्त्री सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जायचा. याचा प्रत्यय त्याकाळच्या जाहिराती, कथा कादंबऱ्या वाचताना येतो. पण तरी घोट्याला एवढं महत्त्व नव्हतं. २० व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांच्या वस्त्रांची नवीन फॅशन बाजारात आल्यानंतर घोट्यालाही तेवढंच महत्त्व दिलं जाऊ लागलं. 

वाचकहो, त्याकाळी फक्त सुंदर घोट्यांच्या स्पर्धा होत नसत, संदर खांदा, सुंदर हात, सुंदर पाय अशा विविध अवयवांच्या स्पर्धाही भरावल्या जात. या स्पर्धाही अर्थातच काही ना काही विकण्याशी जोडलेल्या होत्या.

या स्पर्धा मग बंद का पडल्या? 

जगाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या दुसऱ्या जागतिक युद्धाने या स्पर्धा बंद पाडल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर १९५० साली स्पर्धा भरवल्याचा उल्लेख आढळतो, पण त्यांना पूर्वीचं रूप कधीच मिळू शकलं नाही. खांदा, हात, पाय, घोटा यांसारख्या स्पर्धा जाऊन आता चेहरा हे एकच परिमाण राहिलं होतं. १९५१ साली पहिल्यांदा मिस वर्ल्ड स्पर्धा भरवण्यात आली. त्याच सुमारास प्रत्येक देशाची अशी एक स्पर्धा आयोजित होऊ लागली. भारतातही १९४७ साली पहिल्यांदा मिस इंडिया स्पर्धा भरवण्यात आली होती.

स्त्रीच्या सुंदर्याच्या आकर्षणातून या स्पर्धा निर्माण झाल्या. वेळोवेळी त्यात बदल होत गेले, पण आकर्षण मात्र आजही कमी झालेलं नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required