computer

फोटो स्टोरी : खोट्या अफवांचा खापर पणजोबा.. या सांगाड्याने अमेरिकन जनतेला असा चुना लावला!!

फोटोत इजिप्शियन ममी सारखा दिसणारा पुतळा हा फेक गोष्टींचा खापर पणजोबा आहे. हा खापर पणजोबा इतिहासात Cardiff Giant म्हणून ओळखला जातो. १९ व्या शतकात सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीचे जे मोजके दुष्परिणाम होते त्यातल्याच हा एक दुष्परिणाम म्हणता येईल.

चला तर गोष्टीला सुरुवात करूया. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात जाऊ. औद्योगिक क्रांतीतून जन्माला आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा आणि संशोधनांचा वापर करून काही भामट्यांनी लोकांना फसवण्याचा उद्योग सुरु केला होता. त्यातीलच एक मोठं उदाहरण म्हणजे ‘Cardiff Giant’.

१६ ऑक्टोबर १९६९ साली गिडॉन एमोंस आणि हेन्री निकोलस हे दोघे कामगार न्यूयॉर्कच्या कार्डिफ येथील शेतात काम करत असताना त्यांना १० फुट लांबीचं भलामोठया माणसाचं प्रेत सापडलं. हे शेत विल्यम नेवेल या व्यक्तीचं होतं. या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. कारण, या कथेत विल्यम नेवेलची महत्त्वाची भूमिका आहे.

तर, त्या काळी सत्यता पडताळण्यासाठी गुगल वगैरे नसल्यामुळे सर्वांना वाटलं की हा खरोखर माणूस आहे. फोटोत दिसत असल्याप्रमाणे तो पूर्णपणे सांगाडा नव्हता. तो साधारण इजिप्शियन ममीसारखा दिसत होता. एक थियरी अशी शोधण्यात आली, की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ‘ओंडोंगा’ लोकांचा पूर्वज आहे. ओंडोंगा हे अमेरिकेच्या उत्तर भागातील सर्वात जुन्या आदिवासी जमातींपैकी एक आहेत. मूळ अमेरिकन म्हटलं तरी चालेल. ओंडोंगा लोक हे धिप्पाड होते आणि त्यांची उंचीही जास्त असायची. त्यामुळे या थियरीवर लोकांचा विश्वास बसला. 

लवकरच हा माणूस कार्डिफ जायन्ट म्हणून अमेरिकेत प्रसिद्ध झाला. त्याला बघायला माणसांची रांग लावली. विल्यम नेवेलने कार्डिफ जायन्टचं संरक्षण करण्यासाठी एक तंबू ठोकला आणि त्याच्या दर्शनासाठी लोकांकडून पैसे घेऊ लागला.

सत्य काय होतं?

कार्डिफ जायन्ट अर्थातच खरा नव्हता.  त्याला विल्यम नेवेलने स्वतःहून आपल्या शेतात पुरलं होतं. पण या मागचं डोकं त्याचं नव्हतं. ही कल्पना त्याचा भाऊ जॉर्ज हल याची होती. 
गोष्ट पुढे वाचण्यासाठी जॉर्ज हलची ओळख करून घेऊया.

जॉर्ज हल हा तंबाखू विकून उदरनिर्वाह करणारा साधारण माणूस होता. ख्रिस्ती धर्माचा मजबूत पगडा असलेल्या त्या काळात तो स्वतःला नास्तिक आणि विज्ञानवादी म्हणवून घ्यायचा. कार्डिफ जायन्टचा जन्मामागे त्याच्या नास्तिक आणि विज्ञानवादी समजुतींचा मोठा हात आहे. त्याला विज्ञानाबद्दल असलेल्या धर्माच्या भूमिकेला धक्का द्यायचा होता.

कार्डिफ जायन्ट तयार करण्यासाठी त्याने १० फुट लांबीचा जीप्सियम विकत घेतला आणि शिकागो येथील कारागिराच्या मदतीने  त्यातून मानवाकृतीची निर्मिती केली. या कारागिराला तोंड बंद ठेवण्यास सांगितलं. मानवाकृती पुतळा तयार झाल्यांनतर तो खरा वाटावा म्हंणून त्याच्यावर संस्कार करण्यात आले. एकूण २६०० डॉलर्स खर्चून हलने हा पुतळा तयार केला.

हलने एका खोट्यानाट्या गोष्टीला जन्म तर दिला, पण  त्याने हा विचार केला नव्हता की आपण ज्या खोट्या गोष्टीला जन्म देतोय ती किती दूरवर पसरू शकते. आजच्या काळात ज्या प्रकारे व्हायरल झालेली गोष्ट व्हायरल करणाऱ्याच्या हातातून निसटते तसंच त्याकाळी झालं. कार्डिफ जायन्ट खोटा असूनही त्याला मोठ्या उद्योगपतींनी विकत घेतलं. हे उद्योगपती देशभर दौरे करायचे आणि कार्डिफ जायन्टचं प्रदर्शन भरवायचे. यातून पैसा भरपूर मिळत गेला.

पुढे काय घडलं ?

आता या गोष्टीत एक नवीन पात्र येतं. पी. टी. बर्मन हा जुन्या कलाकृती जमा करायचा. या कलाकृती खोट्या असल्या तरी त्याला काही फरक पडत नसे. या कलाकृतींना तो न्यूयॉर्कच्या अमेरिकन म्युझियममध्ये ठेवायचा. 

जेव्हा कार्डिफ जायन्टची हवा झाली तेव्हा बर्मनला कार्डिफ जायन्ट विकत घ्यावासा वाटला. पण कार्डिफ जायन्ट ज्यांच्याकडे होता ते उद्योगपती आपल्या या नोटा छापण्याच्या नव्या मशीनला असं सहजासहजी जाऊ देणं शक्यच नव्हतं. बर्मनला नकार देण्यात आला. बर्मनही हुशार माणूस होता. त्याने खोटा कार्डिफ जायन्ट तयार केला आणि हाच खरा कार्डिफ जायन्ट म्हणून त्याची जाहिरात केली.

(पी. टी. बर्मन)

हे जेव्हा त्या उद्योगपतींना समजलं तेव्हा त्यांनी बर्मनला कोर्टात खेचलं. ही परिस्थिती फारच गमतीदार होती. आधीच खोटा असलेल्या कार्डिफ जायन्टचे मालक बनावट कार्डिफ जायन्टच्या विरोधात कोर्टात गेले होते. जज महाशयांनी निर्णय देताना म्हटलं, की ‘आपापले कार्डिफ जायन्ट इथे आणा, जर त्यांनी स्वतःच्या सत्यतेबद्द्ल स्वतःहून कबुली दिली तर पुढची कारवाई होईल.’

हे अर्थातच शक्य नव्हतं. एकंदरीत जज साहेबांनी ही केस निकालात काढली. या भानगडीत सामान्य लोकांना कार्डिफ जायन्ट खोटा असल्याचं समजलं. स्वतः जॉर्ज हलने (२०,००० डॉलर्सची कमाई केल्यानंतर) १९६९ सालच्या अखेरीस ही गोष्ट काबुल केली. शिकागो ट्रिब्युनने कार्डिफ जायन्टची सत्यता पडताळून त्याच्यावर बातमी छापली. त्यानंतर या नाटकावर पडदा पडला.  

लोक एवढे मूर्ख कसे बनले?

कार्डिफ जायन्ट तयार होण्याच्या १० वर्षापूर्वी डार्विनने आपला इतिहास प्रसिद्ध On the Origin of Species हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. या ग्रंथाने लोकांमध्ये उत्क्रांती आणि जीवाश्म या गोष्टीचं आकर्षण वाढलं होतं. पुढच्याच १० वर्षांनी कार्डिफ जायन्टने लोकांची उत्सुकता शमवली.

याखेरीज त्याकाळात पुरातत्वशास्त्र आपल्या बाल्यावस्थेत होतं. आजच्या काळात कार्बन डेटिंग किंवा इतर मार्गांनी जीवाश्माचा अभ्यास सोपा झाला आहे. त्याकाळी ही साधनं नसल्यामुळे लोकांना फसवणं सहज शक्य होतं. 

आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल, की कार्डिफ जायन्टचं पुढे काय झालं. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात फसवी गोष्ट म्हणून आज कार्डिफ जायन्ट न्यूयॉर्कमधल्या कूपरटाऊन इथल्या वस्तूसंग्रहालयात दिमाखाने बसला आहे. कधी न्यूयॉर्कला गेलात तर कार्डिफ जायन्ट नक्की बघा.

आजची फोटो स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required