computer

फोटो स्टोरी : दुर्मिळ तस्मानियन वाघ कसे संपले? वाचा शेवटच्या तस्मानियन वाघाची शोकांतिका !!

दुर्मिळ अशा तस्मानियन वाघाचा हा फोटो तुम्ही अनेकदा बघितला असेल. फोटोतला दुर्मिळ वाघ या प्रजातीतला शेवटचा प्राणी होता. दुर्मिळ प्राण्यांच्या यादीत पहिल्या ५ प्राण्यांत त्याची दखल घेतली जाते. पण फारच कमी लोकांना हे माहित आहे की फोटोत दिसणारा हा शेवटचा वाघ पृथ्वीवरून नामशेष कसा झाला. म्हणूनच आजच्या फोटो स्टोरीमध्ये आपण शेवटचा तस्मानियन वाघ, तस्मानीयन प्रजाती आणि त्यांच्या नामशेष होण्याची कथा वाचणार आहोत.

तस्मानियन वाघाविषयी थोडक्यात

तस्मानियन वाघाचं खरं नाव होतं थायलेसिन. हा वाघ मूळचा ऑस्ट्रेलिया आणि न्युगिनी देशात आढळणारा प्राणी होता. त्याला ऑस्ट्रेलियातील तस्मानिया बेटावरून तस्मानीयन हे नाव मिळालं होतं. त्याच्या श्वान प्रजातीशी असलेल्या साधर्म्यामुळे त्याला तस्मानियन वूल्फ म्हणजे तस्मानियन लांडगा असेही म्हटले जायचे.

तस्मानियन वाघ हा मांसाहारी प्राण्यांच्या कार्निवरस मार्सुपियल्स गटातील सर्वात मोठा प्राणी समजला जातो. त्याच्या पाठीवर असणारे चट्टे त्याची ओळख होते. नर आणि मादी दोघांच्याही शरीरावर हे चट्टे असायचे. त्याची आणखी एक खासियत बऱ्याच लोकांना माहित नाहीय. या प्राण्याच्या पोटाला चक्क कांगारू प्राण्याला असते तशी थैली होती. ही थैली नर आणि मादी दोघांनाही असायची. सर्व गुणधर्मांकडे बघितलं तर हा प्राणी दोनतीन प्राण्यांचं एकत्रीकरण वाटू शकतो. त्याच्या श्वान प्रजातीशी असलेल्या साम्यामुळे ग्रीक भाषेत त्याला “dog-headed pouched one” म्हणतात.

शेवटचा तस्मानियन वाघ

फोटोत दिसत असलेल्या तस्मानियन वाघाचं नाव बेन्जामिन होतं. ज्या शेवटच्या तस्मानियन वाघांचा सांभाळ करण्यात आला तो त्यापैकी एक होता. त्याला ऑस्ट्रेलियाच्या हॉबर्ट प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलं होतं. पण याच प्राणीसंग्रहालयाने त्याचा जीव घेतला. त्याचा अंत अत्यंत दुःखद अवस्थेत झाला. प्राणीसंग्रहालयाने त्याची नीट देखभाल केली नाही. त्याला थंडीवाऱ्यात खितपत ठेवलं. याच अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.

तस्मानिया भागातील हवामान हे मुख्यत्वे दिवसा उष्ण, तर रात्री अत्यंत थंड असतं. त्यामुळे हे वाघ पहाटे किंवा संध्याकाळी शिकार करत. दिवसाच्या उष्णतेच्यावेळी ते जंगलात अगदी आत जात, थंड जागा शोधून तिथे दिवस काढत. ही त्यांची दिनचर्या होती. याच्या अगदी उलट प्राणीसंग्रहालयात घडलं. बेन्जामिनला सदासर्वकाळ एका पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. त्याला बाहेरचं हवामान मानवलं नाही आणि शेवटी त्याचा अंत झाला.

७ सप्टेंबर, १९३६ साली बेन्जामिन मरण पावला. हॉबर्ट प्राणीसंग्रहालयात तो ३ वर्ष होतं. आपण पाहात असलेला फोटो हा १९३३ सालचा आहे.

बेन्जामिन मेल्यानंतर तो कसा मेला यापेक्षा तो ‘तो’ होता की ‘ती’ म्हणजे हा वाघ नर होता की मादी यावर मोठी चर्चा रंगली. काही वर्षांपूर्वी सिद्ध झालं की बेन्जामिन नर होता. असं म्हणतात की त्याला मिळालेलं बेन्जामिन हे नावसुद्धा नंतर देण्यात आलं होतं. खरं तर याबद्दलही अनेक वाद आहेत.

तर, तेव्हापासून आजपर्यंत तस्मानियन किंवा थायलेसिन प्रजातीतील वाघाला बघितल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत, पण कोणालाही ते सिद्ध करता आलेलं नाही. अगदीच अलीकडे म्हणजे २०१७ साली असा दावा करण्यात आला होता. या दाव्यांमुळे तस्मानियन वाघ ‘सर्वात जास्त दावा करण्यात आलेल्या दुर्मिळ प्राण्यात’ अव्वल ठरला आहे.

गोष्टी इथेच संपत नाही. तस्मानियन वाघाच्या लुप्त होण्यामागे त्यावेळची परिस्थिती कारणीभूत होती.

तस्मानियन वाघाविषयी त्याकाळी जी माहिती पसरली होती ती सगळी या वाघाच्या जीवावर उठण्यासाठी पुरेशी होती. हा वाघ रक्तपिपासू आहे, तो माणसांवर हल्ला करतो, नरभक्षक आहे, इत्यादी सारख्या खऱ्याखोट्या कथांना-दंतकथांचं पीक आलं होतं. त्याकाळी तस्मानियन वाघाची ओळख व्हँपायर डॉग अशी होती.

२० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ही समजूत इतकी घट्ट बसली की लोक तस्मानियन वाघांना संपवत गेले. यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कारण हा वाघ आपल्या गुराढोरांना संपवेल ही भीती त्यांच्या मनात होती.

तस्मानिया भागात नव्याने राहायला येणाऱ्या माणसांनी तस्मानियन वाघांसाठी आणखी धोका निर्माण केला. माणसं तर जीवावर उठली होतीच, पण आता नव्या माणसांमुळे जंगलं नष्ट झाली. याखेरीज या नव्या पाहुण्यांनी आपल्यासोबत आणलेले नवीन आजार या प्राण्यांना दिले. नव्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती नसल्याने वाघांची संख्या आणखी कमी होत गेली.

तस्मानियन वाघाबद्दल असलेलं अज्ञान आणि पुरेशा संशोधनाअभावी हा प्राणी आज जगातून नष्ट झाला आहे. तो पुन्हा अस्तित्वात येईल का हा आजही मोठा प्रश्न आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required