computer

फोटो स्टोरी : अमेरिकन दारुबंदी आणि गाईच्या खुरांच्या बुटांची आयडिया. सरकार नक्की कसं मामा बनलं?

आजच्या फोटोस्टोरीमध्ये आम्ही ज्या फोटोची निवड केली आहे तो फोटो आपल्याला अमेरिकेच्या जन्मकाळात घेऊन जाणार आहे. अमेरिकेचा नुकताच जन्म झाला होता. म्हणजे अमेरिकेने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं होतं आणि पहिल्या स्वतंत्र अमेरिकन सरकारची स्थापना झाली होती. युद्धामुळे डोक्यावर कर्ज होतं. नवीन देशाची उभारणी करायची होती. थोडक्यात, पैसा हवा होता. अशावेळी सरकार जो शॉर्टकट वापरतं तेच त्यावेळच्या सरकारने केलं. दारूवर मोठ्याप्रमाणात कर लावला.

फोटोमध्ये दिसणारा बूट याच निर्णयातून जन्माला आला. पण त्याबद्दल वाचण्यापूर्वी आधी इतिहास जाणून घेऊया. १७७६ साली अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. आपण वाचत असलेली गोष्ट १७७७ सालातली आहे. नवीन सरकारने स्वतःची सत्ता गाजवण्यासाठी आणि देशावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग धुंडाळले, त्यातील एक मार्ग होता दारूवर कर लादण्याचा. या निर्णयाने सरकारच्या तिजोरीत भर तर पडली, पण त्याचे दुष्परिणामही दिसून आले. आधीपासून अवैधरीत्या सुरु असलेली दारूविक्री आणखी तेजीत सुरु झाली.

अमेरिकेच्या दक्षिण भागात असलेल्या केंटकी, व्हर्जिनिया आणि कॅरोलिनास भागात अवैधरीत्या दारूविक्री मोठ्याप्रमाणात व्हायची. दारूवरील भरमसाठ करामुळे ही मागणी आकाशाला भिडली. अवैध दारू मुख्यत्वे दुर्गम भागात तयार केली जायची. पोलीस या दारू विक्रेत्यांच्या लोकांच्या मागावर असायचे. बऱ्याचदा छापे पडायचे. असा उंदीर मांजराचा खेळ चालत होता. यातून एक प्रभावी मार्ग काढण्यासाठी दारू विक्रेत्यांनी हे विशिष्ट बूट तयार केले होते.
हा बुटाचा मागचा भाग पाहा.

याला म्हणतात ‘काऊ शू’. नेहमीच्या वापरातील बुटांना खालच्या बाजूने धातूची पट्टी लावली जायची आणि धातूच्या पट्टीला धरून गाईच्या खुरांच्या आकाराचं लाकूड बसवलं जायचं. दुर्गम भागात जिथे लोक फारसे जात नाहीत तिथे बुटांचे छाप आढळल्यास पोलिसांना दारू विक्रेत्यांचा माग काढणं सोपं जायचं. ‘काऊ शू’ घातल्यामुळे मात्र जमिनीवर खुरांचे छाप उमटायचे. पोलिसांना वाटायचं की इथे जनावरं फिरत असतील. अशा प्रकारे पोलिसांना मामा बनवणं सोप्पं जायचं.

या आयडियाने काही दिवस का होईना दारू विक्रेत्यांना निश्चिंत केलं. काही दिवसांनी या आयडियाबद्द्ल बातमी बाहेर पडली. एव्हेनिंग इंडेपेंडन्ट या वृत्तपत्राने भांडेफोड करणारी सविस्तर बातमी छापून आणली होती. यानंतर या आयडियातील हवा निघाली. पोलीस पुन्हा मागावर लागले. पुढे सरकारनेही काऊ शू निकालात काढला. कायद्याने वेगळ्या आणि विचित्र चप्पल, बुटांवर कायमची बंदी आणली.

या घटनेचं महत्त्व एवढंच नाही. या घटनेतून दारू विक्रीशी निगडीत व्यवसायांवर उपासमारीची वेळ आली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू विक्रीच्या धंद्यातून अमेरिकेत संघटीत गुन्हेगारीच्या भरभराटीला सुरुवात झाली.

सबस्क्राईब करा

* indicates required