computer

'बीएसएफ'कडून दोन भारतीय श्वान प्रजातींना प्रशिक्षण देण्यात येत आहे...प्रशिक्षणाची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या !!

सिनेमा किंवा वेबसिरीजमध्ये आपण पाहिले असेल, कुठे एखादा गुन्हा , खून, किंवा बॉम्बस्फोट झाला की पोलीस लगेच कुत्र्यांना घेऊन जातात. ते जीभ बाहेर काढलेले काळे कुत्रे मग हुंगत पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे शोधून देतात आणि पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला मदत होते. पण हे अगदी खरं आहे कारण कुत्रा त्याच्या घ्राणेंद्रियामुळे  किती मदत करू शकतो हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. म्हणून कुत्र्याला पोलिसमित्र म्हणून ओळखले जाते.

आज आम्ही ही माहिती देत आहोत, कारण शिल्लॉंगमधील सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सीमावर्ती भागात दोन भारतीय कुत्र्यांच्या जातींना गस्त घालण्यासाठी विशेष प्रशिक्षण देत आहे.

राजपालय आणि मुधोळ या दोन भारतीय कुत्र्यांना किमान एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसं पाहता मुधोळ प्रजातीतील कुत्र्यांना भारतीय सैन्यात फार पूर्वी स्थान देण्यात आलं होतं. आता त्यांना बीएसएफनेही आपल्यात सामील करून घेण्याचं ठरवलं आहे. मुधोळ प्रजातीबद्दल सविस्तर वाचण्यासाठी आमचा खालील लेख वाचा.

आपले सैन्य पहिल्यांदाच करणार भारतीय प्रजातीच्या कुत्र्यांची भरती. मुधोळ हाउंडबद्दल माहिती लगेच वाचा!!

(मुधोळ प्रजाती) स्रोत

आजपर्यंत मुख्यतः जर्मन शेफर्ड आणि  लॅब्राडोर या जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जायचे. पण जर भारतीय कुत्रांच्या  या दोन जातींचा प्रयोग  यशस्वी झाला तर त्यात आणखी भारतीय जातींनाही  प्राधान्य दिलं जाईल. बीएसएफ मेघालयातील वरिष्ठ पशुवैद्यांनी सांगितले की, ‘कुत्र्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच या कुत्र्यांना सीमावर्ती भागात गस्त घालण्याच्या कामासाठी पाठवले जाईल’

फक्त बीएसएफच नाही तर भारतीय सैन्य देखील भारतीय कुत्र्यांच्या जातींना सैन्यात समाविष्ट करण्याची तयारी करत आहेत. ही नक्कीच चांगली बातमी आहे. कारण सीमेवर अवैध घुसखोरी होत असते. अनेक चुकीच्या कारवाया सुरू असतात. त्यासाठी बीएसएफ जवान रात्रंदिवस पहारा देत असतात. त्यांना या कुत्र्यांची मदतच होईल.

कुत्र्यांना कसे प्रशिक्षण देण्यात येते?

(राजपालय)

कुत्र्यांचे घ्राणेंद्रिय म्हणजे गंध ओळखण्याची क्षमता  इतर प्राण्यापेक्षा तीव्र असते. प्रशिक्षण घेतल्यानंतर ते औषधे, स्फोटके, रक्त आणि बरेच काही शोधू शकतात. परंतु, हे एखादा गंध शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. त्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण एक साधी ट्रिक पाहुयात.

प्रशिक्षक प्रथम अतिशय स्वच्छ, कुठलाही वास नसलेल्या टॉवेलचा वापर करून कुत्र्यांबरोबर खेळतात. नंतर, टॉवेलच्या आत औषधांची एक पिशवी गुंडाळली जाते. थोडावेळ खेळल्यानंतर कुत्रा त्याच्या आवडत्या खेळण्याला म्हणजेच टॉवेलला त्या औषधाचा वासाशी जोडण्यास सुरवात करतो. मग प्रशिक्षक तो औषधासह तो टॉवेल वेगवेगळ्या ठिकाणी  लपवून ठेवतो. आणि कुत्र्याला ते शोधण्यासाठी सांगतो. कुत्रा त्या वासाच्या आधारे तो टॉवेल शोधण्यासाठी कधी मातीही खणून काढतो तर कधी भीतीवर उडी मारण्याचाही प्रयत्न करतो. जेव्हा त्याला तो टॉवेल सापडतो तेव्हा त्याला खास बक्षीस म्हणून त्याचे आवडते पदार्थ बक्षीस म्हणून खायला मिळते.

प्रशिक्षण चालू असताना त्याच्या सवयी हळूहळू  विकसित होत असतात. टॉवेलमध्ये नंतर निरनिराळ्या प्रकारची औषधे ठेवली जातात आणि लपविली जातात. अखेरीस  कुत्रा विविध प्रकारच्या औषधांचा वास ओळखू लागतो.यात अवैध पदार्थांचा वास समाविष्ट असतो.

बीएसएफचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे भारतीय जातीचे कुत्रे नक्कीच सीमेवरच्या घुसखोरीला आळा घालण्यास जवानांना मदत करतील यात शंका नाही.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required