computer

घरासाठी भांडी खरेदी करताय? मग हे वाचलंच पाहिजे!!

अन्न शिजवण्यासाठी आणि पदार्थ साठवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळी भांडी वापरली जातात. पण भांडी खरेदी करताना, ती वापरताना आणि त्यांची काळजी घेताना योग्य नियोजन आणि पुरेशी व योग्य माहिती हवी. नाहीतर हौसेने, कौतुकाने घेतलेली महागामोलाची भांडी काही दिवसांतच खराब व्हायला लागतात किंवा जास्तीची म्हणून माळ्यावर टाकली जातात.

हे टाळण्यासाठी भांडी खरेदी करताना काही गोष्टी अवश्य विचारात घ्या.
१. घरातल्या माणसांची संख्या
२. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेली जागा
३. घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, पथ्यपाणी
४. कुटुंबाची खाद्यसंस्कृती
या गोष्टी वरवर किरकोळ वाटल्या तरी त्यांचा रोजच्या स्वयंपाकाशी, आणि पर्यायाने वापरल्या जाणाऱ्या भांड्यांशी बराच संबंध आहे. कसं ते लेखाच्या शेवटी लक्षात येईलच.

पण त्याआधी भांडी घेताना कोणत्या मटेरियलची घ्यावीत आणि ती कशासाठी वापरावीत याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. भांड्यांसाठी वापरलेलं मटेरियल मुख्यतः तीन प्रकारचं असतं. हानिकारक, सुरक्षित, आणि हितकारक.

हानिकारक मटेरियल्समध्ये मुख्यतः प्लॅस्टिक आणि ऍल्युमिनियम येतात. अगदी प्रत्येक स्वयंपाकघरात प्लॅस्टिकचे डबे, ऍल्युमिनियमचे तवे असतातच. गंमत म्हणजे घरात मुबलक आढळणारं प्लॅस्टिक आरोग्यासाठी तितकंच घातक आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचं किती नुकसान होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण वैयक्तिक पातळीवर आपल्या आरोग्याचंही ते तितकंच नुकसान करत आहे. आजकाल सर्वत्र हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढल्याच्या तक्रारी ऐकू येतात, त्यात इतर कारणांबरोबर प्लॅस्टिकचा स्वयंपाकघरात वाढलेला वापर हेही एक कारण आहे. याचं कारण म्हणजे प्लॅस्टिक कंटेनरमध्ये साठवलेल्या/ शिजवलेल्या पदार्थांमुळे शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या कामात बाधा येते. प्लॅस्टिक वापरल्याने कॅन्सर होतो या विधानाला थेट शास्त्रीय पुरावा नसला तरी अंतःस्रावी ग्रंथींचा आणि हॉर्मोन्सचा समतोल बिघडणं अनेक समस्यांना जन्म देतं.

तीच गोष्ट ऍल्युमिनियमची. ऍल्युमिनियमचा संबंध अल्झायमर(स्मृतीभ्रंश) या रोगाशी लावला जातो. उच्च तापमानाला ऍल्युमिनियम विघटित होऊन त्याचे सूक्ष्म कण अन्नात मिसळू शकतात. अन्नातल्या आम्लधर्मी घटकाशी त्याची लवकर रासायनिक विक्रिया होऊन शरीराला अपायकारक संयुगं तयार होतात. त्यामुळे ऍल्युमिनियम भांड्यांत अन्न शिजवणं टाळा, शिजवलंच तर ते ताबडतोब दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा.

पुढचा प्रकार आहे सुरक्षित मटेरियल्सचा. स्टेनलेस स्टील, काच, माती, दगड यांपासून बनलेली भांडी शरीराला खास पोषण वगैरे पुरवत नसली तरी वापरायला पूर्णपणे सुरक्षित असतात. यात पदार्थ साठवणं, शिजवणं तुम्ही डोळे झाकून करू शकता.

तिसऱ्या प्रकारातली भांडी म्हणजे लोखंड, तांबं यांपासून बनवलेली भांडी. ही सुरक्षितच नाहीत तर आरोग्यासाठी हितकारकही आहेत. तांब्यामध्ये सूक्ष्म जीवविरोधी गुणधर्म असल्याने आजही अनेक घरांत पिण्याचं पाणी साठवण्यासाठी तांब्याची भांडी वापरली जातात. शिवाय तांब्यातून उष्णतेचं वहन जलद होत असल्याने ही भांडी लवकर तापतात. कॉपर बॉटमच्या भांड्यांमध्ये हेच तत्त्व वापरलेलं असतं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तळाला तांब्याचा थर दिल्याने भांडं लवकर तापतं आणि इंधनाची बचत होते. मात्र तांब्याच्या भांड्यात ताक वगैरेंसारखे आम्लधर्मी पदार्थ ठेवू नका. यातल्या आम्लाची तांब्याबरोबर रासायनिक विक्रिया होऊन पदार्थाला कळकल्यासारखी चव येते. शिवाय तांब्यापितळ्याची भांडी दमट हवेच्या संपर्कात आल्याने क्युप्रस क्लोराईड नावाचं संयुग तयार होऊन भांड्यावर हिरवट राप तयार होतो. त्यामुळे ती वरचेवर स्वच्छ करावी लागतात. लोखंडी भांडी - तवे, कढया, उलथणी, खलबत्ता - वापरणं आरोग्यदृष्ट्या अत्यंत हितकारक आहे. यामुळे नियमितपणे लोह पोटात जातं.

अजून एक प्रकार म्हणजे नॉनस्टिक भांडी. यात भांड्याच्या पृष्ठभागावर पॉलिटेट्राफ्ल्यूरोइथिलिन या मटेरियलचा थर दिलेला असतो. या थरामुळे अन्नातल्या रेणूंचा भांड्याच्या रेणूंशी थेट संपर्क न आल्याने त्यांच्यात बंध निर्माण होत नाहीत आणि पदार्थ भांड्याला चिकटत नाही. परंतु कालांतराने हे कोटिंग निघू लागतं. अशा वेळी ही भांडी वापरू नका.

हे झालं भांड्यांच्या मटेरियलबद्दल. आता पदार्थ साठवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी किती आणि कोणती भांडी असावीत हे बघू. यासाठी घरात चार माणसं आहेत असं गृहीत धरून त्यानुसार अंदाज दिलेला आहे.

किराणासामान साठवण्यासाठी
तांदूळ, गहू/आटा : (५ किलोचे स्टीलचे २ डबे)
तूरडाळ, गूळ, साखर : (१ किलोचे स्टीलचे ३ डबे)
इतर डाळी म्हणजे मूगडाळ, उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, हिरव्या मुगाची डाळ, मसुराची डाळ : अर्धा किलोच्या ५ काचेच्या बरण्या
कडधान्यं म्हणजे मूग, मटकी, चवळी, राजमा, वाटाणा : अर्धा किलोच्या ५ काचेच्या बरण्या
पोहे, रवा, बेसन, इडली रवा, साबुदाणा, भाजणी इ. : १ किलोचे ८ स्टीलचे डबे
सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे : १ किलोच्या ४ काचेच्या बरण्या
धणे, जिरे, मोहरी, हळद, तिखट, मसाला : पाव किलोच्या ६ काचेच्या बरण्या
इतर बारीकसारीक पदार्थांसाठी : १०० ग्रॅमच्या ६ छोट्या बरण्या

थोडक्यात, चार जणांच्या कुटुंबासाठी-
५ किलोचे २ स्टीलचे डबे,
१ किलोचे १२ स्टीलचे डबे (मुद्दाम जास्त असू द्या. एरवी जास्तीचे पदार्थ साठवायला कामाला येतात.)
अर्धा किलोच्या १० काचेच्या बरण्या,
पाव किलोच्या ६ काचेच्या बरण्या, आणि
१०० ग्रॅमच्या १२ बरण्या
एवढी भांडी साठवण्यासाठी वापरली जायला हवीत.

आता वळूया रोजच्या वापरासाठी किती भांडी हवीत याकडे...

दुधाची पातेली – साधारण दीड ते दोन लिटरची ३ स्टीलची पातेली किंवा दुधाचे कुकर.
एक आज वापरायला, एक उद्या वापरायला आणि एक जास्तीचं दूध काढून ठेवायला.

स्टीलची ठोक्याची पातेली – अर्ध्या लिटरपासून २ लिटरपर्यंतची साधारण ४ पातेली
आमटी, पातळ भाजी, रस्सा, कढी, सूप, सार, वरण, आमटी इ. उकळण्यासाठी आणि काढून ठेवायला.

ठोक्याची मोठी पातेली – ५ लिटरची मोठी २ पातेली.
इडली-डोशाचं पीठ आंबवणं, श्रीखंड, दहीवडे यासाठी दही लावणं, दूध आटवणं, पाहुणे आल्यास जास्त प्रमाणात मसालेभात - पुलाव यासाठी वापरता येतात.

कढया – २ लिटरच्या सर्जिकल स्टीलच्या २ कढया, २ लिटरची एक लोखंडी कढई, नॉनस्टिकची १ लिटरची १ कढई, वरून फोडणी घालण्यासाठी १ छोटी लोखंडी कढली

तवे – ४
एक पोळ्यांसाठी (हार्ड अनोडाइज्ड किंवा लोखंडी), एक डोसे, उत्ताप्पे यांसाठी (बिडाचा), एक नॉनव्हेज फ्राय पदार्थांसाठी (नॉनस्टिक किंवा सिरॅमिक कोटिंगचा), एक भाकरी, थालिपीठं यासाठी (लोखंडी).

फ्रायिंग पॅन्स - २
एक ऑम्लेटसाठी, एक शॅलो फ्रायसाठी

तसराळी आणि परात - ५
एक मोठी परात (स्टील किंवा पितळेची)
चार एकात एक बसतील अशी तसराळी, एखादं पीठ भिजवण्यासाठी, कोशिंबीर, रायता इ. कालवण्यासाठी (स्टीलची)

कुकर – ३ (स्टीलचे)
किमान दोन कुकर असलेले म्हणजे एक लहान आणि एक मध्यम, हे केव्हाही सोयिस्कर. लोकाचं जेवणखाण आणि तसा गोतावळा असेल तर तिसरा म्हणजेच मोठा कुकरही असायला हवा.

ताटं-वाट्या-चमचे –
१२ ताटांचा सेट,
१२ वाट्या,
१२ ग्लास किंवा पाणी प्यायची भांडी,
२ तुपाची भांडी
१२ बोल्स
२ डझन चमचे

आता तुमच्या लक्षात आलं असेल, स्वयंपाकघर व्यवस्थित सांभाळण्यासाठी किती विचारपपूर्वक नियोजन करावं लागतं! बरं भांडी नुसती घेऊन ठेवली तरी काम भागत नाही, त्यांची काळजीही तितकीच घ्यावी लागते. ते बघू या लेखात. 

भांडी जास्त काळ टिकवण्यासाठी आणि लखलखीतही ठेवण्यासाठी अशी काळजी घ्या

 पण तोवर हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required