चार्ली चॅप्लीनची १०० वर्षांपूर्वी तयार झालेली फेक न्यूज!! लोक अजूनही तिला खरी मानतात!
चार्ली चॅप्लिन हे नाव कुणाला माहित नसेल ? याने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, विचार करायला लावलं, आणि त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. इंग्लंडचा सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार म्हणून ओळख असलेला चार्ली चॅप्लिन एकेकाळी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होती. त्याच्या मूक चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हसवण्यात आपले जीवन व्यतित केलं. प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीमागे काही अफवा किंवा गमतीदार किस्से असतातच. चार्लीच्या बाबतीत एक विचित्र आणि मजेशीर घटना म्हणजे त्याने स्वतः चार्ली चॅप्लिन सारख्या दिसण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तो हरला होता. आता हे सत्य आहे की अफवा याचा आपण मागोवा घेऊयात.
असे म्हणतात त्या काळी कॅलिफोर्नियामध्ये एक स्पर्धा भरवली गेली होती. या स्पर्धेत चार्ली चॅप्लिनसारखे हुबेहूब दिसायचे होते. स्पर्धेत खुद्द चार्ली चॅप्लिन सहभागी झाला होता आणि तो हरला असा दावा त्याकाळी प्रसिद्ध असणार्या बहुतांशी वृत्तपत्रांनी केला होता. काही वृत्तपत्रांमधे चॅप्लिनला दुसरे किंवा तिसरे स्थान मिळाले असे नमूद करण्यात आले होते.
जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये असे संदर्भ आहेत. १ जुलै १९२० रोजी प्रकाशित झालेल्या शेफील्ड इव्हनिंग टेलिग्राफच्या "टू-डेज गॉसिप" यामधे असे छापून आले होते आणि मग ही बातमी जगभर पसरू लागली. १० ऑगस्ट १९२० रोजी सिंगापूरच्या द स्ट्रेट्स टाइम्समध्ये अशाच प्रकारे प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर २५ ऑगस्ट १९२०मधे न्यूझिलंडच्या पॉव्हर्टी बे हेराल्डमधील आणखी एका वर्तमानपत्रामध्ये अशाच मथळ्याची बातमी प्रकाशित केली गेली.
कॅलिफोर्नियामध्ये चार्ली चॅप्लिनच्या तोतयागिरीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ४० स्पर्धक चार्ली चॅप्लिन बनून आले होते. गंमत म्हणून चार्लीने स्पर्धेत प्रवेश केला. पण तो जिंकला नाही. तो स्पर्धेत २७ व्या स्थानावर होता असाही एका ठिकाणी संदर्भ आढ्ळतो. अशा प्रकारचे लेख बऱ्याच वर्तमानपत्रांत प्रकाशित झाले होते.
पण ही बातमी पूर्णपणे सत्य नव्हती, कारण प्रत्येक वर्तमानपत्रांनी तीच संकल्पना पुन्हा पुन्हा कॉपी केली होती. असे म्हणतात की चार्ली चॅप्लिनची मैत्रिण मेरी पिकफोर्डने ही गोष्ट लेडी डेसबरोला सांगितली, तिने ती बातमी प्रेसला सांगितली. शेफिल्ड इव्हनिंग टेलीग्राफवर प्रकाशित झालेल्या मूळ लेखात मेरी पिकफोर्डचा उल्लेखही नसल्यामुळे मेरी पिकफोर्डने ही कथा खरोखर सांगितली की नाही हे कुणालाही माहित नाही. तसेच या स्पर्धेचा संदर्भ देणारा दुसरा कोणताही स्त्रोत नाही. “माय फादर”, “चार्ली चॅप्लिन”, :”चार्ली चॅप्लिन ज्युनियर” या पुस्तकांतही कोणत्याही अशा प्रकारच्या स्पर्धेबद्दल काहीही उल्लेख नाही. या पुस्तकांत अगदी छोट्या गोष्टींचाही उल्लेख आहे, पण अशी स्पर्धा भरवली गेली असती तर कुठेतरी तिचा उल्लेख आलाच असता. त्यामुळे कोणताही ठोस संदर्भ नसल्यामुळे ही एक अफवा आहे. चार्ली चॅप्लिन या नावाचे मोठे वलय वापरून बातमी छापण्यात आली होती. आधी ती एका ब्रिटिश वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती आणि नंतर इतर अनेक वृत्तपत्रांनी कोणत्याही अभ्यासाशिवाय कॉपी केली होती.
थोडक्यात, चुकीचा संदर्भ वापरून पुढे सगळ्यांनी बातम्या करणे ही काय आजचीच डोकेदुखी आहे असे नाही!!
शीतल दरंदळे




