computer

चीनमध्ये जगातला सर्वात लांबलचक असा नवा सी-लिंक आलाय भौ!! वाचा या सी-लिंकवर काय काय असणार आहे ते..

मंडळी, आपल्याकडं असलेला बांद्रा-वरळी सी-लिंक रोड आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे. पण हा सागरी पूल काहीच नाही असं दाखवणारा एक पूल चीन आणि हॉंगकॉंगच्या दरम्यान उभारण्यात आलाय भाऊ!. हा पूल ‘हॉंगकॉंग’ आणि ‘मकाऊ’  या शहरांना चीनच्या मुख्य भूभागाशी जोडतोय. आताच्या घडीला हा पूल जगातला सर्वात लांब सागरी पूल ठरलाय आणि  तो तब्बल ५५ किलोमीटर लांबीचा आहे. हो, ५५ किलोमीटर्स!! त्यामुळं पूर्वी हॉंगकॉंग ते मकाऊ असणारं ३ तासांचं अंतर या पुलामुळं ते अवघ्या ३० मिनिटांवर आलंय.

२००९ साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. पण कामात अनेक अडचणी येत गेल्या. कामगारांचे मृत्यू झाले, बजेट वाढलं. शिवाय भ्रष्टाचारामुळं पुलाचं बांधकाम आणखी लांबणीवर जाऊन पडलं होतं. हे सगळं होत होत शेवटी तब्बल ९ वर्षांनी पूल लोकांसाठी खुला करण्यात आलाय.  

चला तर जगातल्या या सर्वात लांब सागरी पुलाबद्दल आणखी माहिती घेऊया.

१. जगातला हा सर्वात लांब सागरी पूल बांधण्यासाठी जवळजवळ २० बिलियन डॉलर्स म्हणजे ४७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. पुलाच्या खांबांच्या बांधणीसाठी तब्बल ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. खांबांची मजबुती भूकंपामध्येही टिकून राहावी म्हणून विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पूलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पूल फक्त पाण्यावर नाही, तर त्याचा ६.७ किलोमीटरचा भाग पाण्याच्या आतून आहे.

२. पुलावर अपघात घडू नयेत यासाठी प्रत्येक वाहन चालकाच्या रक्तदाबावर म्हणजेच शुद्ध मराठीत बीपीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या नियंत्रण कक्षाकडे चालकाच्या रक्तदाबाची माहिती पाठवली जाईल. याशिवाय पुलावर प्रत्येक चालकावर नजर ठेवतील असे खास कॅमेरे असतील. जर कोणताही चालक ३ पेक्षा जास्त वेळा आळस देताना आढळला,  तर २० सेकंदाच्या आत त्याची माहिती नियंत्रण कक्षाला म्हणजेच कंट्रोल रूमला मिळेल. 

३. या पुलावरून दोन्ही बाजूच्या व्यक्तींना खुलेआम प्रवास करता येणार नाहीय राव. हॉंगकॉंगच्या नागरिकांना प्रवासासाठी विशेष परवाना काढावा लागेल. हा परवाना मिळवणंही सहज सोप्पं नाहीय. जे लोक नियमित कर भरतात व मोठ्या प्रमाणात पैसे चॅरिटी मध्ये दान करतात किंवा जे लोक राजकीय पक्षाचे सदस्य आहेत अशा लोकांनाच पुलावरून प्रवास करण्यासाठी परवाना मिळणार आहे. अशा बंधनामुळे हॉंगकॉंगकडून जबरदस्त विरोध होताना दिसतोय.

४. पुलावरच्या प्रवासासाठी आणखी एक गंभीर प्रश्न आहे राव. त्याचं असंय  की हॉंगकॉंग आणि मकाऊमध्ये डावीकडून प्रवास केला जातो, तर चीनच्या मुख्य भागात उजवीकडून. हॉंगकॉंग आणि मकाऊच्य लोकांना चीनच्या मुख्य भागात आल्यानंतर ‘साईड’ बदलावी लागेल. मार्गांची अदलाबदली करण्यासाठी पुलाच्या सुरुवातीच्या भागाजवळ ‘merge point’ उभारण्यात आले आहेत.

काही असो.. चीनमध्ये उंचावरचा काचेचा पूल, असा लांबलचक सागरी पूल असले भारी-भारी प्रकार दिसतात. जर कधी चीनला भेट दिलीत तर या पूलावरुन प्रवास करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा..

 

आणखी वाचा :

हा पूल चक्क दोन हातांवर पेलला आहे ? कुठे आहे हा पूल ?

भल्या भल्यांची हवा टाईट करणारा जगातला सगळ्यात लांब झुलता पूल आहे तरी कुठे ???

मेघालयात लोक बांधतात जिवंत पूल...!!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required