भल्या भल्यांची हवा टाईट करणारा जगातला सगळ्यात लांब झुलता पूल आहे तरी कुठे ???

Subscribe to Bobhata

फाटणे, कपाळात जाणे, घाम फुटणे, अंग थरथरणे, अंगावर काटा येणे, वगैरे वगैरे जितकं काही भीतीमुळे आपली अवस्था होते, तेवढं सगळं या एकाच जागी तुम्हाला अनुभवता येणार आहे. कारण हे ठिकाण तेवढं भारी आहे राव... तर मंडळी, हा आहे जगातील सर्वात लांब झुलता पूल. निसर्गाने वेढलेला असा हा पूल तुम्हाला अविस्मरणीय आनंद देईल.  पण अट एवढीच की चुकूनसुद्धा खाली बघायचं नाही.

स्रोत

मंडळी, स्वित्झर्लंडच्या रँडा येथे ऑगस्ट २०१७ मध्ये हा पूल बनून तयार झाला आहे. या पुलाचं नाव आहे 'Charles Kuonen'. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा पूल नेहमीच्या कोणत्याही पुलासारखा वाटत असला तरी तो जमिनीपासून तब्बल....तब्बल २८२ फुट उंचीवर आहे. शिवाय जाताना एकावेळी एक किंवा दोनच माणसं जाऊ शकतात. एवढ्या लांब आणि उंचावर बांधलेला हा पूल फक्त १० महिन्यांमध्ये तयार झाला हे विशेष. हे सगळं श्रेय Swissrope आणि Lauber cableways या दोन कंपन्यांच्या इंजिनियर्सना जातं.

हा पूल खास असण्याचं एक कारण म्हणजे या पुलाची जी उंची आहे, ती अनावश्यक आणि जागतिक रेकॉर्ड बनवण्यासाठी मुद्दाम केलेली नाही. त्यामागे सुद्धा एक कारण आहे. हा पूल स्विस अॅल्पस भागात असल्याने इथे अधूनमधून दरड कोसळते. म्हणून पुलाची निर्मिती अशा उंचीवर केली आहे की तिथून कोणालाही काहीही धोका उद्भवणार नाही.

एकंदरीत हा पूल नियमित ये-जा करण्यासाठी आणि ज्यांना थरारक अनुभव घ्यायला आवडतो अशाांसाठी फॅनटॅस्टीक आहे.

काय राव, मग जाणार का हा थरारक अनुभव घेण्यासाठी?

सबस्क्राईब करा

* indicates required