हे जोडपं २२ वर्षांपासून चक्क गटारात राहतंय...!!!

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे सुखात पण काहीतरी दु:ख शोधून तक्रारी करणारे आणि दुसरे म्हणजे दु:खात पण सुख शोधणारे.  कोलंबियात राहणारं हे जोडपं दुसर्‍या प्रकारातलं दिसतं आहे.

हे आहेत मारिया गार्सिया आणि मिगेल रेस्ट्रेपो आणि  गेल्या बावीस वर्षांपासून हे राहात आहेत  बंद पडलेल्या या गटारात.

कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे. पाब्लो इस्कोबार नावाच्या ड्रग माफियाबद्दल तुम्ही ऐकून असाल, तर तो इथलाच बरं. या देशात ड्रग, ड्रग्जची तस्करी, खून, मारामार्‍या या सगळ्यांची काही कमी नाहीय. तर, मारिया आणि मिगेल जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा ते ही या ड्रग्जच्या व्यसनाच्या खूप आहारी गेले होते. राहायला घर नाही, जवळ पैसा नाही.. थोडक्यात, दोघांचीही हालत जाम वाईट होती.

भेटल्यानंतर दोघांनाही ड्रग्ज घेणं सोडावं आणि एकमेकांना आधार देत राहावं असं वाटलं. पण पैसा नाही, उधारी देणारं कुणी नाही अशा परिस्थितीत काय करावं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी या रिकाम्या पडलेल्या गटाराचं एका राहाण्यास योग्य घरात रूपांतर केलं.

या त्यांच्या घरात काय नाहीय? आता आकडे टाकून आणलीय की कशी ते माहित नाही, पण त्यांच्या घरात लाईट आहे, किचन आहे आणि एका घरात जे कमीतकमी असायला हवं ते सगळं आहे. इतकंच नाही, ख्रिसमससारख्या सणांच्या वेळेस ते आपलं घरही सुंदरपैकी सजवतात.

या घरात त्यांनी एक ब्लॅकी नावाचा कुत्राही पाळलाय. कुलूप नसलेल्या मारिया-मिगेलच्या घराचं हा काळूराम छान रक्षण करतो. ब्लॅकीला छोटीमोठी कामं करण्याचं ट्रेनिंगही या दोघांनी दिलंय.

या बावीस वर्षांत मारिया-मिगेलनी ड्रग्जपासून पूर्ण व्यसनमुक्ती मिळवलीय. गटाराला त्यांनी घरपण दिलंय. ते म्हणतात,”हे घर सोडण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही”.

या दोघांची कहाणी जगाला प्रेमाची ताकद दाखवून देतेय.

(सर्व फोटो स्रोत)

सबस्क्राईब करा

* indicates required