तो रिक्षावाला, तो करोडपती आणि ते मुख्यमंत्री- कारपेक्षा रिक्षा भारी !!
कधी कधी बड्या बड्या लोकांना आपला मोठेपणा बाजूला ठेवून अगदीच सामान्य गोष्टींचा आधार घ्यायला लागत असतो. तशी वेळ परिस्थितीच त्यांच्यावर आणत असते. पेटिएम अॅप तर तुम्हाला माहीत असेलच. मोबाईल रिचार्जपासून कॅश ट्रान्स्फरपर्यंत सगळे व्यवहार मोबाईलवर आणणार्या या कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ आहेत 'विजय शेखर'. त्यांच्या संपत्तीची आजची किंमत आहे 7000 करोड रुपये..
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटायला निघालेल्या विजय शेखर यांची एसयुव्ही कार अडकली लखनौच्या ट्राफिक जाममध्ये. अपॉइंटमेंटच्या वेळेत सी.एम. हाऊसवर पोहचायचं असल्यामुळं त्यांनी चक्क रस्त्यावर थांबलेल्या एका सायकल-रिक्षावाल्याची मदत मागितली. आणि या रिक्षावाल्यानेसुद्धा ५० रुपयांसाठी ठासून भरलेल्या ट्राफिकमधून वाट काढत त्यांना ठरलेल्या वेळेत सी.एम. हाऊसवर पोहचवलं!
रिक्षावाल्याच्या या मदतीमुळे खूष झालेल्या विजय शेखर यांनी त्या रिक्षावाल्याला 6000 रुपये रोख, एक ई-रिक्षा आणि घर देऊन टाकलं. स्वतः मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मणीराम नावाच्या रिक्षावाल्याचा फोटो ट्विटरोवर शेअर केलाय. सायकल रिक्षा अजूनही काही ठिकाणी चालतात, उत्तर प्रदेशात तर बर्याच शहरांत. सायकल रिक्षा चालवणं हे अतिशय अंगमेहनतीचं काम आहे. बक्षीस मिळालेल्या इ-रिक्षामुळे मणीरामचे कष्ट थोडे कमी झाले हे काय कमी आहे?




