चॉकलेट खाणारा 'मंच मरूगण' : वाचा या अनोख्या मंदिराची कथा !!

राव बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्टापुढे कोणाचंच चाललेलं नाही. आज आम्ही एका बालहट्टाची गोष्ट सांगणार आहोत.

साधारणपणे मंदिरात गेल्यावर नारळ फोडण्याची प्रथा आहे. सण उत्सवाच्या वेळी आपण नैवेद्यसुद्धा दाखवतो. काही देवांच्या आपापल्या पर्सनल आवडीचे पदार्थ आहेत. जसे की गणपती बाप्पाला मोदक आवडतो. देवाला नारळ, नैवेद्य वगैरे तर आपण नेहमी देतोच पण भारतात एक असं मंदिर आहे जिथे लोक देवाला चक्क ‘मंच चॉकलेट’ देतात.

चला तर बघूया कुठे आहे हे मंदिर...

स्रोत

अलाप्पुझा, केरळ येथे असलेल्या ‘थेकन पलानी बालासुब्रह्माण्यम’ मंदिराची ओळख काही वर्षांपर्यंत बाल मुरुगन अशी होती.  पण आता ती मंच मुरुगन म्हणून झाली आहे. या मागची कथा अशी की, २०११ साली एका लहान मुलाने मंदिराची घंटा वाजवली. पण हा मुलगा मुस्लीम असल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला तिथून लगेच घरी नेलं. त्याच रात्री तो मुलगा आजारी पडला. आणि झोपेतच मुरुगनचं नाव घेऊ लागला.

दुसऱ्याच दिवशी त्याच्या आई वडिलांनी मुरुगन मंदिरात त्याला नेलं. त्यावेळी पुजाऱ्यांनी दोघांनाही देवाला काही तरी देण्याची सूचना केली. दोघांनी लगेच देवासमोर तेल आणि फुले वाहिली. आईवडिलांचं बघून त्या मुलाने देवाला मंच देण्यासाठी हाथ पुढे केले पण देवाला चॉकलेट कसं देणार म्हणून आई वडिलांनी त्याला थांबवलं. शेवटी मुलाने हट्टच धरला आणि त्या हट्टापाई देवाला मंच देण्यात आलं. अशाप्रकारे देवाला त्या दिवशी त्याचा पहिला मंच मिळाला. असं म्हणतात की त्यानंतर मुलाच्या आजारपणात आश्चर्यकारकपणे सुधारणा होऊ लागली आणि तो बरा झाला.

स्रोत

ही गोष्ट मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पसरल्यानंतर त्या दिवसापासून देवाला मंच देण्याची नवीन प्रथा सुरु झाली. एका मंच पासून ते मंचचा पूर्ण बॉक्स देण्यापर्यंत माणसांची श्रद्धा दृढ झाली. आता तर काही लोक आपल्या वजनाएवढ्या किलोचे मंच देवाला वाहतात. हे मंच प्रकरण एवढं वाढलंय की मंदिरात प्रसाद म्हणून देखील मंच दिला जातो. त्यामुळे लहान मुलांमध्ये हे मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

आपल्याला मंच मुरुगनची ही कथा खरी की खोटी या बद्दल शंका येईलच, पण या मंदिराजवळ हीच कथा आपल्याला ऐकायला मिळते. आता एवढ्या वर्षात त्यात लोकांनी आपापल्या परीने बदल केल्याचीही शक्यता आहेच.

३०० वर्ष जुन्या मंदिराला अश्या रीतीने ६ वर्षापूर्वी एक नवीन ओळख मिळाली ती बाल हट्टामुळे.

सबस्क्राईब करा

* indicates required