दिनविशेष : जाणून घ्या दिव्याची पूजा कशी करावी, प्रार्थना आणि कहाणीसुद्धा!!

आज आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. तशी सगळ्या मांसाहारप्रिय लोकांना गटारी अमावस्या म्हणून चांगलीच लक्षात राहते. पण ही आहे खरंतर दिव्यांची अमावस्या! 

पूजाविधी: 

घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने धुऊन स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर धुतलेले दिवे ठेवावेत आणि त्यांची पूजा करावी. आजपासूनच पूजेच्या पत्रीचे महत्त्व सुरु होते. त्यामुळे पत्री म्हणजेच आघाडा, दुर्वा, गौरीची फुले, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. दिव्यांना गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. घरातल्या लहानग्यांचे औक्षण करावे. पूर्वी फक्त मुलांचे औक्षण  करायची पद्धत होती. पण मुला-मुलीचा भेद न मानता दोघांनाही औक्षण करावे. 

दिव्याची प्रार्थना:

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

म्हणजेच, ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’

त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. 

कथा:

आपल्या सगळ्या व्रतवैकल्यांमागे काही ना काही कथा असते. दिव्याच्या अवसेची ही कथा प्रचलित आहे- 

एक अतिश्रीमंत श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीच्या  मुलींचं विनीतच्या मुलांशी लग्न करायचं. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भावाच्या गरीबीकडे पाहून गौरीने वचन मोडलं आणि व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केलं आणि गरीबीतच ती संसार करू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याने त्याची रत्नजडीत अंगठी  काढून काठावर ठेवली. ती एका घारीने उचलून नेली पण मग ती खाद्यवस्तू नाही असं समजताच तिने ती अंगठी टाकून दिली. योगायोगाने जिथे ती अंगठी टाकली ते सगुणेच्या घराचं छप्पर होतं. 

अंगठी राजाची आहे असं कळताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाकडून बक्षीस म्हणून तिने एक विचित्र गोष्ट मागितली, "‘ येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत .’’ 

राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. सगुणेने आपल्या दोन्ही दिरांना  घराच्या पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले.  "येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही" अशी व घरातून मागच्या बाजूने "जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही" अशी शपथ घालायला त्या दोघांना सांगितले.  त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य  खूप झाले. राज्यातले लोक  सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required