गाढवांचा बाजार पाहायचाय ? मग या गावाला नक्की भेट द्या !!
मंडळी आज शाकंभरी पौर्णिमा. पौषपौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. या पौषपौर्णिमेच्या निमित्ताने जेजुरीमध्ये जत्रा भरते. जत्रेतील एक खास आकर्षण म्हणजे गाढवांचा बाजार. तसा गाढवांचा बाजार तर सगळीकडेच असतो राव. पण हा बाजार खऱ्याखुऱ्या गाढवांचा आहे.
तर, जेजुरीच्या जत्रेला बारा बलुतेदारांची जत्रा म्हणतात. राज्यभरातल्या वैदू, कोल्हाटी, बेलदार, पाथरवट, गारुडी, कैकाडी, कुंभार, मदारी, डोंबारी, परीट, इत्यादी भटक्या जाती जमाती कुलदैवतांच्या पूजेसाठी एकत्रित येतात. जत्रेबरोबरच त्यांचं पोट ज्या प्राण्यावर आहे, त्यांची खरेदीदेखील इथेच होते. या जमाती गाढवाचा साहाय्याने मेहनतीची कामे करत असतात. त्यामुळे गाढवांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. राज्यभरातून तसेच गुजरात कर्नाटकातूनदेखील लोक गाढवांच्या खरेदीसाठी येतात.

गाढवांमध्ये सर्वात जास्त मागणी असते ती गुजरातच्या काठेवाडी गाढवांना. ही गाढवं तीस हजारपेक्षा जास्त किमतीला विकली जातात. गुजरातबरोबर राजस्थानमधूनही गाढवांना विकण्यासाठी जेजुरीमध्ये आणलं जातं. गावठी, काठेवाडी किंवा अन्य गाढवांना खरेदी करण्याआधी त्यांचे दात, वय आणि रंग बघितले जातात. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान अशा ओळखीवरून गाढवांची निवड होते.
मंडळी, गाढवासारख्या प्राण्याला एवढी मोठी मागणी हे शहरी माणसाला गमतीचं वाटत असलं.. तरी या बाजारात कोटीच्या कोटी रूपयांची उलाढाल होते. आजच्या काळात यंत्राने काम सोपं झालं असलं तरी या गाढवांची मागणी कमी झालेली नाही.




