computer

डॉ. रुवेदा सलाम: IAS उत्तीर्ण होऊनही IPS कडे वळलेल्या जम्मू -काश्मीरच्या पहिल्या महिला IPS!!

डॉ. रुवेदा सलाम आहेत जम्मू -काश्मीर राज्यातील पहिल्या महिला IPS. रुवेदा यांना त्यांच्या कामासाठी ओळखले जातेच, परंतु कामाबरोबरच त्यांच्या फिटनेसाठीही त्या ओळखल्या जातात. पोलिस अधिकाऱ्याने किती फिट असले पाहिजे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एकदा नव्हे, तर दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रुवेदा सलाम या डॉक्टर आहेत. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुविदा या IPS झाल्या आहेत. तल्लख बुद्धी आणि देशाबद्दलचे असलेले प्रेम त्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला IPS रुवेदा सलाम यांची आपण आज ओळख करून घेऊयात.

श्रीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुवेदा यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर त्यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेण्याऐवजी प्रशासकीय सेवा निवडली. २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात रुवेदा यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांची आयपीएस कॅडरसाठी निवड झाली आणि पुढील प्रशिक्षणासाठी हैदराबादला पाठवण्यात आले. आयपीएस झाल्यानंतर त्यांनी आयएएस व्हायचे स्वप्न पाहिले, तेही त्यांनी २०१५ मध्ये पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. त्यांनी लहानपणापासून रुवेदा यांना IAS होण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१५ मध्ये रुवेदा यांना ८७८ वा रँक मिळाला आणि त्यांनी IAS होण्याचीही पायरी पार पाडली.

रुवेदा त्यांचा अनुभव सांगतात की प्रशिक्षणाची वेळ खूप कठीण असते. अनेक शारीरिक आणि मानसिक चाचण्यांमधून जावे लागते. जेव्हा जी -20 देशांचे शिखर संमेलन होते, तेव्हा त्यासोबत एक युवा -20 चे आयोजन देखील केले जाते. युवा -20 मध्ये प्रत्येक देशातील ५ युवक सहभागी होतात. त्या ५ युवकांना आपले विचार मांडण्याची संधी दिली जाते. २०१६ मध्ये रुवेदा यांची सिडनी येथे झालेल्या जी -20 शिखर परिषदेत निवड झाली होती. त्यामध्ये त्यांनी काश्मीरबाबत आपले विचार मांडले जे सर्वांना प्रभावित करून गेले. त्या म्हणाल्या, "जेव्हा मी लहान होते तेव्हा पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये येत असत. सर्व काही ठीक चालले होते. परंतु ९० च्या दशकात काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट झाली. परिस्थिती अजूनही बिघडत आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्यासाठी काश्मिरीयत ही खूप महत्वाचे आहे. काश्मीर पंडितांचे काश्मीर मध्ये पुन्हा पुनर्वसन करणे खूप महत्वाचे आहे." त्यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांना बऱ्याच काळापासून काश्मीरला जाता आले नव्हते, पण त्या कुटुंबाच्या संपर्कात राहून सर्व परिस्थिती समजून घेत असत.

रुवेदा यांना आपल्या कामासोबतच कविता लिहिण्याचीही खूप आवड आहे. फावल्या वेळेत त्या पुस्तके वाचतात. त्यांना व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यासाठी रोज धावण्याचा व्यायाम करतात. ट्रेनिंगनंतर त्या हैदराबादला गेल्या. त्या तामिळनाडूच्या आयपीएस केडरमध्ये रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची चेन्नईमध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. त्या म्हणतात कोणत्याही राज्यात काम केले तरी मानवतेची सेवा करणे हे महत्वाचे आहे. त्या हैदराबादमध्ये IPS होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुलींना प्रशिक्षण देतात. अनेक जम्मू काश्मीरच्या तरुण तरुणींना या क्षेत्रात येण्यासाठी त्या मदत करतात.

भविष्याबद्दल बोलताना रुवेदा म्हणतात की त्यांना आयुष्यात स्थिरता हवी आहे. काश्मीरच्या समाजासाठी त्यांना खूप काही करायचे आहे. काश्मीरबाहेरील लोकांना वाटते की काश्मिरी हे भारतविरोधी आहेत, पण हे सत्य नाही. अशा लोकांची मानसिकता बदलायची आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांना सुरक्षित वाटेल हे यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

डॉ. रुवेदा याना माहीत आहे की यासाठी अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण त्या तयार आहेत. जम्मू काश्मीरमधून अनेक तरुण मुली, महिला पुढे येतील अशी आशा त्यांना आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required