computer

८०-९०च्या दशकात असा चालायचा आपला शेअर बाजार. शेअर्स मिळवण्यासाठी काय खटपटी-लटपटी कराव्या लागायच्या?

SonyLiv च्या Scam 1992 – The Harshad Mehta Story या वेब सिरीजमुळे अचानक हर्षद मेहता १९९२ त्याच्या रोखे घोटाळ्यांवर अनेक चर्चा  व्हायरल झाल्या आहेत. अर्थात या वेबसिरीजच्या मर्यादा लक्षात घेता विषयाचा पल्ला सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्या The Scam: Who Won, who Lost, who Got Away. ...या पलीकडे जात नाही. 'बोभाटा' आजच्या लेखात आम्ही हर्षद मेहता आणि त्याचा रोखे घोटाळा यासोबत त्या पलीकडे जाऊन काही माहिती तुमच्यासमोर मांडणार आहोत.

(हर्षद मेहता)

जर हर्षद मेहता हे प्रकरण समजून घ्यायचे असेल तर ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात घडणार्‍या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि सोबत त्यावेळी शेअर बाजार कसा चालायचा हे समजून घेणेही आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम 'इक्विटी कल्चर' शब्दाशी परिचय करून घेऊया.

१९७१-७२ चा दुष्काळ, १९७१ चे भारत पाकिस्तान युध्द, १९७५ सालची आणिबाणी, त्यानंतरचे अल्पायुषी जनता सरकार आणि इंदीरा गांधींचे पुनरागमन हा काळ संपेपर्यंत आपल्या देशात खर्‍या अर्थाने 'अर्थसाक्षरता ' जन्माला आलेली नव्हती. केंद्रीय अर्थसंकल्पाकडे जनतेचे फारसे लक्षच नसायचे. आयकराचे दर किती वाढले आहेत याकडे फक्त समाजातल्या उच्चभ्रूंचेच लक्ष असायचे. कर लादणार्‍या सरकारला काय प्रश्न विचारायचे याचे भानही कोणालाच नव्हते.

स्रोत

अशा झोपलेल्या समाजाला जागे करण्याचे काम एका गृहस्थांने केले, त्यांचे नाव नानी पालखीवाला!! त्यांच्या रसाळ पण सडेतोड भाषणांतून, त्यांनी मांडलेल्या विचारांतून शहरी सुशिक्षित समाजाला सरकारी अर्थकारणावर विचार करायला भाग पाडले. विश्वास बसणे कठीण आहे, पण मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमचे मैदान नानी पालखीवालांचे बजेटवरचे भाषण ऐकण्यासाठी खच्चून भरलेले असायचे. देशाच्या अर्थकारणाची दिशा समजावून सांगणार्‍या त्यांच्या वक्तृत्वाने सामाजिक अर्थसाक्षरतेचे पहिले पाऊल पडले.

(नानी पालखीवाला)

यानंतर एका पुस्तकाने मध्यमवर्गीय गुंतवणूक या विषयावर लोकांना विचार करण्यास भाग पाडले. त्या पुस्तकाचे नाव "इन द वंडरलँड ऑफ इन्व्हेस्टमेंट". या पुस्तकाचे लेखक होते ए.एन. शानभाग. उत्पन्न- आयकर- करबचतीची गुंतवणूक- ते शेअर बाजार या विषयावर चौफेर पध्दतीने लिहिलेल्या या पुस्तकाने शहरी सुजाण माणसाला खडबडून जागे केले. जर आर्थिक सुबत्ता हवी असेल तर डोळसपणे गुंतवणूक केलीच पाहिजे हे सांगणार्‍या लेखकाने वाचकांना शेअरबाजाराच्या दरवाज्यापर्यंत नेऊन ठेवले. आजही हे पुस्तक नव्या गुंतवणुकदारासाठी 'वाचलेच पाहिजे' या सदरात मोडते. अर्थसाक्षरता हा रुक्ष विषयावर लिहिलेल्या पुस्तकाच्या आतापर्यंत २९ आवृत्त्या प्रसिध्द झाल्या आहेत.

पण त्या सर्वसामान्य माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अप्रत्यक्ष दीक्षा मनोहर फेरवानी या गृहस्थाने दिली! युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या या अध्यक्षांनी 'युनिट६४' च्या माध्यमातून फक्त बँकेत पैसे जमा ठेवणार्‍या सामान्यांना बँकेपलीकडे जाऊन गुंतवणूक करता येते आणि भांडवल वाढवता येते याचा साक्षात्कार घडवला. त्यातूनच जन्माला आली एक नवी आर्थिक संस्कृती 'इक्विटी कल्चर'!!

(मनोहर फेरवानी)

सुरुवातीला मध्यमवर्गीय माणसं प्रायमरी मार्केटकडे वळली. त्यावेळी नव्या कंपनीला पहिल्या इश्यूत (IPO) 'प्रिमियम' आकारण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे चांगल्या कंपनीच्या इश्यूत पैसे गुंतवण्यासाठी सगळेच धडपड करायचे. आपल्या नावाने शेअर लागणे हा लॉटरीसारखाच चान्स घेण्याचा प्रकार होता. त्यामुळे नवा इश्यू आला की घरातल्या सर्वांच्या नावे अर्ज भरले जायचे. अर्ज भरल्यानंतर एक दीड महिन्यात शेअर आपल्या नावे मिळाले अथवा नाही हे कळायचे आणि ज्या दिवशी त्या शेअरचे लिस्टींग व्हायचे त्या दिवशी बक्कळ नफा व्हायचा.

काहीजण वेगवेगळ्या नावांनी अर्ज करायचे म्हणजे उदाहरणार्थ रामचंद्र गोपाळ आठवले नावाचा माणूस आर. जी. आठवले, रामचंद्र आठवले. ए. आर. गोपाल या तीन नावांनी अर्ज करायचा. काही वेळा ऑफीसातले अनेक लोक एकत्र येऊन 'सिंडीकेट' बनवायचे आणि सर्वजण फंड जमा करून अर्ज करायचे आणि नफा वाटून घ्यायचे, काही कंपन्या आणि बँका पण अर्ज करण्यासाठी व्याजाने पैसे द्यायच्या. राजकोटसारख्या खाजगी बाजारात लिस्टींगच्या आधीच खरेदी विक्री सुरु व्हायची. थोडक्यात, कमीतकमी पैशात भरघोस नफा देणारे एक दालन सर्वांना मोकळे झाले होते. काहीच दिवसांत हे प्रायमरी मार्केटचे खेळाडू थेट सेकंडरी मार्केट म्हणजे शेअरची खरेदी विक्री करून नफा कमवायला लागले. इक्विटी मार्केट हेच जीवनातील अंतिम सत्य बाकी सगळे झूट असे मानणारा एक मोठा समाज तयार झाला. थोडक्यात, हर्षद मेहताच्या आगमनासाठी एक स्टेज तयार झाले. आता फक्त नाटकाचा नायकाची म्हणजे 'हर्षद  मेहेता'ची एंट्री बाकी होती.

ज्यावेळी एकीकडे 'इक्विटी कल्चर' वाढीस लागत होतं त्याच दरम्यान शेअर बाजार कसा चालत होता हे पण आपण बघूया. शेअर बाजार म्हटलं की डोळ्यासमोर फक्त बाँबे स्टॉक एक्स्चेंज उभं राहातं. पण तेव्हा मुंबईसोबत कलकत्ता, मद्रास, दिल्ली , कानपूर येथे ही स्वतंत्र शेअरबाजार होते. प्रत्येक बाजारावर सरकारी नियंत्रण असायचे पण त्यांच्या मर्यादा रोजचा कारभार नियमाप्रमाणे चालतो आहे अथवा नाही हे पाहाण्याइतकाच मर्यादित असायचा. सर्वसाधारणपणे एखादा निवृत्तीला टेकलेला सनदी अधिकारी शेअरबाजाराच्या कारभारावर नजर ठेवत असायचा.

शेअर बाजाराचा सदस्य असलेल्या 'मेंबर ब्रोकर'लाच फक्त ट्रेडींग करण्याची परवानगी असायची. या ब्रोकरना 'कार्ड होल्डर' असेही संबोधन होते. त्यांचेच सौदे अधिकृत मानले जायचे. नव्याने येणार्‍यांना मेंबर व्हायचे असेल तर काही कोटी मोजून कार्ड मिळायचे. त्यामुळे वर्षानुवर्षे मेंबर ब्रोकरांची संख्या आहे तितकीच ठेवून सत्ता हातात ठेवण्याची परंपरा बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये होती. हे ब्रोकरच त्यांच्यातल्या सदस्यांना बोर्ड मेंबर म्हणून निवडून द्यायचे. परिणामी शेअर बाजारावर खरी सत्ता असायची  सगळ्या शेअर बाजाराच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मंडळाची!

थोड्याफार फरकाने अशीच परंपरा मुंबईबाहेर असलेल्या बाजारांची होती. मुंबई बाहेरचे बाजार बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये काय घडते आहे याच्यावर अवलंबून असायचे. मुंबई शेअर बाजाराइतकाच कलकत्त्याचा बाजारही जुना होता. मद्रास, दिल्ली, कानपूर येथे ट्रेडींग करण्याला मर्यादा होत्या. कारण त्या बाजारात लिस्टेड कंपन्या कमी होत्या. त्यामुळे बाजार म्हणजे 'बाँबे स्टॉक एक्स्चेंज' असेच गृहित धरले जायचे. हे इतके सगळे सांगण्याचा उद्देश असा की हर्षद मेहताची एंट्री झाली तेव्हा बाजारात काही निवडक लोकांच्या कंपूचीच सत्ता होती. या कंपूचा विरोध फोडून हर्षद मेहताला स्वतःचे वर्चस्व निर्माण करायचे होते. या कंपूसमोर हर्षद मेहता अगदी चिलटासमान होता. त्याने यासाठी काय व्यूहरचना केली हे आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याअगोदर सौदे करण्याचे मेकॅनिझम कसे होते आणि त्यातल्या काही संज्ञा माहिती असणे आवश्यक आहे.

 

क्रमशः

भाग-२ : ८०-९०च्या दशकात शेअर्सचे सौदे कसे चालायचे, जुनाट पद्धतींमुळे घोटाळ्याचा मार्ग कसा खुला झाला ?

सबस्क्राईब करा

* indicates required