computer

भाग-२ : ८०-९०च्या दशकात शेअर्सचे सौदे कसे चालायचे, जुनाट पद्धतींमुळे घोटाळ्याचा मार्ग कसा खुला झाला ?

भाग-१ : ८०-९०च्या दशकात असा चालायचा आपला शेअर बाजार. शेअर्स मिळवण्यासाठी काय खटपटी-लटपटी कराव्या लागायच्या?

शेअर बाजारात लिस्टींग झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे दोन भागांत म्हणजे Aआणि B असे वर्गीकरण केले जायचे. ज्या शेअरमध्ये जास्तीतजास्त ट्रेडींग व्हायचे ते A ग्रुपमध्ये आणि बाकीचे B ग्रुप मध्ये असायचे. दर दोन आठवड्याने झालेल्या सौद्यांची लेन -देन व्हायची ज्याला 'बदला' म्हटले जायचे. A ग्रुपमधल्या शेअरचे सौदे 'फॉरवर्ड' होऊ शकायचे. एका पंधरवड्यातले सौदे दुसर्‍या पंधरवड्यात ढकलले जाऊ शकायचे. पण सौदा फॉरवर्ड करण्यासाठी तात्पुरते फंडींग उभे करावे लागायचे. ते फंडींग करणारेही अनेकजण बाजारात असायचे. त्यांना जे व्याज मिळायचे त्याला 'व्याज बदला' म्हणायचे. अनेक ब्रोकर फक्त 'व्याज बदला' करण्याचेच काम करायचे. 

A ग्रुपचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात शेअर 'शॉर्ट' करण्याचे सौदे करण्याची मुभा होती. 'शॉर्ट' करणे म्हणजे हातात नसलेले शेअर विकणे आणि त्याचा भाव कमी झाल्यावर खरेदी करून व्यवहार पूर्ण करणे. बाजाराच्या भाषेत खरेदी करणे म्हणजे 'लाँग' पोझीशन घेणे आणि विक्री करणे म्हणजे 'शॉर्ट' पोझीशन घेणे. पंण बोलताना त्याला माथे ('शॉर्ट) आणि पोते (लाँग) असे शब्द होते.

B ग्रुप मध्ये मात्र सौदे पुढे ढकलत नेण्याची सोय नव्हती म्हणून त्याला Cash मधले सौदे असेही म्हटले जायचे. सौदा झाल्यावर ज्या दिवशी शेअर सर्टिफिकेट दिले-घेतले जायचे त्याला 'पतावट' असे म्हटले जायचे. 'पतावट'करण्याच्या दिवशी सर्टिफिकेट दिले नाही तर सौदा 'ऑक्शन'केला जायचा.

बर्‍याच वेळा दोन ब्रोकरमध्ये काही समस्या निर्माण व्हायच्या त्याला 'वांधा' म्हटले जायचे. हा 'वांधा' सोडवण्यासाठी बोर्ड मेंबरची एक 'आर्बीट्रेशन कमिटी' असायची. त्यांचा निर्णय अंतिम समजला जायचा.

प्रत्येक मेंबर ब्रोकरला त्याचे काम करण्यासाठी अधिकृत ६ सब-ब्रोकर्स नेमण्याची परवानगी होती. त्यांनी केलेल्या सौद्याला ब्रोकर जबाबदार असायचे. सौदे हातात असलेल्या एका डायरीवर म्हणजे 'ब्लॉक'वर लिहिले जायचे आणि ते ब्लॉक एक्स्चेंजने दिले असल्याने त्यावर नोंद असलेले सौदे अधिकृत समजले जायचे.
 
काही ब्रोकर फक्त एखाद्या विशिष्ट उद्योग समूहाच्या शेअरची खरेदी विक्री करायचे त्यांना 'हाऊस ब्रोकर ' म्हटले जायचे. पण 'हाऊस ब्रोकर' असणे ही अधिकृत नेमणूक नसायची. काही ब्रोकर फक्त एका विशिष्ट कंपनीच्या शेअरची खरेदी विक्रीच करायचे ज्यांना 'जॉबर' म्हटले जायचे. हे एकाच वेळी भावाचे दोन कोटेशन द्यायचे. उदाहरणार्थ लार्सनचा जॉबर भाव सांगताना १५०/१५१.५० असा भाव सांगायचा. त्याचा अर्थ असा की तुम्हाला लार्सनचे शेअर घ्यायचे असतील असेल तर भाव १५१.५० आणि विकायचे असतील तर भाव १५०! या दोन भावातील फरक म्हणजे जॉबरचा नफा, ज्याला 'तारवणी' म्हटले जायचे.

पण ही सर्व व्यवस्था ७-/८० वर्षे जुनी होती. सर्व व्यवहार कागदावर अवलंबून असायचा. सट्टेबाज हात वर करून बाजाराच्या बाहेर पळून जाण्याचे मार्ग मोकळे होते. दलालांवर नियंत्रण करण्याचे नियम अत्यंत शिथिल होते.संगणकाच्या वापराला ब्रोकर मंडळी नकार देत होती. बाजाराचे कॉम्प्युटरायझेशन करण्याचे ठरले तेव्हा तर ब्रोकर मंडळी चार दिवसांच्या संपावर गेली होती.

सौद्यांमध्ये पारदर्शकता नव्हतीच. दलाली मनाला येईल त्याप्रमाणे लावायची मुभा होती. ग्राहकांना खोट्या भावाची बिले दिली जायची. रोकड रकमेचा म्हणजे दोन नंबरच्या पैशाचा सर्रास वापर केला जायचा. दुपारी बारा ते साडेतीन बाजार चालायचा पण फुटपाथवर उभे राहून अनधिकृत सौदे संध्याकाळी उशिरापर्यंत चालूच असायचे. राजकोटसारख्या बाजारात रात्रभर सौदे चालायचे. थोडक्यात, अत्यंत ढिला आणि मनमानीचा कारभार करायला भरपूर वाव होता आणि त्यामुळेच कंपूबाजीला ऊत आला होता.

पण लेखाच्या या टप्प्यावर आता एक अत्यंत महत्वाची बाब समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे हर्षद मेहताने या बाजारात घोटाळा केलाच नाही. अरेच्चा! मग घोटाळा झाला कुठे? असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येईल. हर्षद मेहेताने घोटाळा केला 'रोखे'  बाजारात आणि त्या घोटाळ्यातून जमा केलेले पैसे त्याने शेअर बाजारात अक्षरश: ओतले. त्याचे काय परिणाम झाले ते आपण बघूया. पण 'रोखे' बाजार हा कोणता बाजार आहे हे आता समजलेच पाहिजे नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required