computer

कथा, अभिनय, थरार आणि बरंच काही... प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या फॅमिली मॅनमध्ये तुम्हांला यातलं काय आवडलं?

Spoilers Alert

अलीकडे वेबसिरीज पाहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांना सेन्सॉरशिपच्या अटी वा बंधने नसल्यामुळे त्यांमध्ये भरपूर प्रमाणात हिंसेचे प्रसंग, शिवराळ भाषा, सेक्सची दृश्ये असतात . बहुधा डिटेक्टिव्ह किंवा गुन्हेगारी कथांवर या सिरीज आधारलेल्या असतात. इंग्लिश, हिंदी व इतर प्रादेशिक भाषांतही अशा सिरीज बनत आहेत. उत्तर वा मध्य प्रदेश येथील जमीनदार किंवा राजकारणात असलेले एकत्र कुटुंब, त्यांची अवैध व बेकायदेशीर कृत्ये, कुटुंबातली बिघडलेली नाती, गुन्हेगारी संबंधांच्या कथा अनेकदा अशा सिरीजमध्ये दिसल्या आहेत. काही थोड्या कौटुंबिक कथाही होत्या. पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही . 

अशा सर्वांमध्ये वेगळी व सध्या गाजत असलेली प्राइम ॲमेझॉनवरची 'द फॕमिली मॕन' ही सिरीज तुफान लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पहिल्या सीझनचे बरेचसे शूटिंग मुंबई, दिल्लीत आणि थोडेफार पाकिस्तान, बलुचिस्तान व काश्मीर इथले आहे. २०१९ साली आलेल्या या सिरीजच्या पहिल्या भागात आधी कळते ती श्रीकांत तिवारी आणि जेकेची मैत्री. ते दोघे एकाच खाजगी संस्थेत काम करतात व एकमेकांना अंतर्बाह्य ओळखत असतात. तपासाच्या मोहिमा ठरवताना, दूरचे प्रवास करताना, हॉटेलमध्ये खाताना , फोनवर बोलताना असे अनेक मजेदार किस्से त्यांच्यात नेहमी घडत असतात. एकमेकांच्या कुटुंबांची काळजी करणे आणि त्यावरून चिडवाचिडवी व भांडणेही होतात, तीही मस्त मनोरंजक आहेत .

सिरीजचे स्क्रिप्ट इतके तंतोतंत आणि जलद पुढे जात राहते की आपण थक्क होतो. आंतरराष्ट्रीय राजकीय  परिस्थिती, त्यातले डावपेच, काश्मिरी जनतेचा संघर्ष, दहशतवाद्यांच्या कारवाया, पाकिस्तानची त्यांना असलेली फूस, सौदी अरेबियाशी असलेले लागेबांधे आणि या सगळ्यांचा तपास लावण्यासाठी अथकपणे लढणारा खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीतील शूरवीर, बुद्धिमान व प्रसंगावधानी अधिकारी श्रीकांत तिवारी हा या कथेचा नायक आहे. त्याचे त्याच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम आहे . तो सतत त्यांचे हित चिंतणारा असला तरी कुटुंबातले सदस्य मात्र त्याच्यावर नाराज आहेत. कारण त्यांच्यासाठी पुरेसा वेळ देणे त्याला शक्य होत नाही. त्याच्या ऑफिसच्या कामांमध्येच तो इतका बुडालेला असतो की त्याचे आरोग्यही त्याने अगदी पणाला लावलेले असते .

श्रीकांतची बायको कॉलेजात शिकवते. त्यांचा आठनऊ वर्षांचा चतुर व चलाख मुलगा आणि चौदापंधरा वर्षांची स्मार्ट व हुशार मुलगी यांच्या शाळा , अभ्यास , क्लास , छंद हे सगळं एखाद्या मध्यमवर्गीय घरात असते तसे वातावरण... पाहता पाहता संशयग्रस्त होऊ लागते . घरगुती संभाषणांना वेगळेच वळण लागते . घरातले ताणतणाव वाढू लागतात . कामाच्या जागी तर टेन्शन , स्ट्रेस हे सवयीचेच झालेले असतात. त्यातून मार्ग कसकसे काढले जातात , ते प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे. भयंकर हाणामारी व रक्तपाताची दृश्ये ओघात येणे साहजिकच असले तरी अप्रतिम छायाचित्रण, नेमके प्रसंग व अचूक संकलन यांमुळे ते पाहणे फारसे असह्य वाटत नाही. असंख्य पात्रे त्यांचे ओझरते दर्शन असूनही लक्षात राहतात, कारण त्यांचे खास वैशिष्ट्य दाखवणारे क्लोजप्स घेतले आहेत. काश्मीरच्या निसर्गाच्या सुखद सान्निध्यातल्या आतंकवाद्यांच्या क्रूर कारवाया व त्यांचे सांकेतिक भाषेतले निर्दय निष्ठूर बोलणे हा अंतर्विरोध आपल्या हृदयाला भेदून जातो.

अभिनयात मनोज बाजपेयीने अर्थातच बाजी मारली आह. हिंदी सिनेमात आतापर्यंत मिळाला नसेल इतका अभिनयाला भरपूर वाव या भूमिकेत त्याला मिळाला आहे. त्याला चांगली साथ दिली आहे प्रियामणी या दाक्षिणात्य अभिनेत्रीने. त्यांचे आंतरप्रांतीय लग्न झाले आहे, त्यांचे प्रेमही आहे. पण हळूहळू त्यांच्यातला सुसंवाद कमी होत जातो, एकमेकांना समजून घेण्यात ते कमी पडतात. त्यांना समुपदेशकाची मदत घ्यावी लागते, हा या काळाचाच महिमा आहे. मात्र त्या समुपदेशकाचे दोघांशी बोलणे ज्या प्रकारे चालते, ते मात्र अजिबात पटत नाही. बायकोचा एक समजूतदार मित्र व सहकारी म्हणून शरद केळकर यांची भूमिका छोटी असली तरी उठावदार झाली आहे. वास्तवातली खरी माणसेच इथे अवतरलेली दिसून येतात.

कथेतली अनेक पात्रे, अनेक स्थळे, अनेक गुंतागुंतीच्या घटना यांचा आवाका मोठ्ठा आहे. तिवारीचे सर्व साथीदार, मराठी बॉस दलिप ताहिल, दोन्ही मुले यांनीही यात सहज अभिनयाचे दर्शन घडवले आहे. चुरचुरीत तरीही वास्तव संवादांमुळे आपल्याही मनावरचे ओझे हलके होते. कारणे व सबबी सांगताना, वेळेवर सुचेल तशी कहाणी रचून सांगताना नायक तिवारीने आणलेला गंभीरपणाचा आव आपल्याला हसवून जातो. पकडलेल्या टेररिस्टशी बोलतानाही तो अशी काही सुरुवात करतो की एवढ्या गंभीर परिस्थितीतही आपल्याला हसू आवरता येत नाही. बायकोमुलांशी प्रेमाने बोलताना त्यांच्याकडून तिरकस शेरे ऐकून घेतो तेव्हाचा त्याचा पडलेला चेहरा, मित्राला दुखापत झाल्यावरचा त्याचा हळवा भाव, सहकाऱ्यांशी वागताबोलताना असणारी जबाबदारीची जाणीव त्याच्या मुद्राभिनयातून अलगदच आपल्यापर्यंत पोचते . 

अतिरेक्यांच्या भूमिकांसाठी केलेली निवडही अगदी हुबेहूब आहे. त्यांची अविश्वसनीय थरारक अशी दृश्ये चित्रित केलेली आहेत. ते पाहून नकळत आपण तोंडात बोट घालतो . काल्पनिक कहाणीही सत्य वाटायला लागते. पडद्यावरची गोष्ट इंग्लिशमधून सांगितली जात असली तरी सगळी पात्रे अस्सल भारतीय आहेत आणि त्यांनी बोललेली इंग्रजी भाषा समजायला खूपच सोपी आहे. हां, एखादा हवालदार किंवा वॉचमन इंग्लिश बोलताना ऐकण्याचा अनुभव आपल्याला चांगलाच गमतीदार वाटू शकतो . पण ते इतके सरळसोपे बोलणे असते की मुळीच खटकत नाही , स्वाभाविक वाटते .

 

दुसरा सीझन गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला आहे . त्याचे जास्तीत जास्त शूटिंग तमिळनाडू व चेन्नईतले असून बाकीचे श्रीलंकेच्या जंगलातले व काही दिल्ली व मुंबईतले आहे . पात्रेही तमिळ(मद्रासी), श्रीलंकन, हिंदी,  मराठी व इंग्लिश अशी विविध भाषा बोलणारी आहेत. चेन्नईमार्गे कोलंबोपर्यंत पसरलेले अतिरेक्यांचे जाळे, स्थानिक लोकांशी संधान साधून त्यांचे ब्रेनवॉश करणे , त्यांना ट्रेनिंग देऊन देशद्रोह्यांच्या कारवायांमध्ये सामील करून घेणे, समुद्रतस्करी करणे, राजकारण्यांमार्फत संधी शोधून स्वार्थ साधून घेणे अशा कित्येक बाबतींतल्या चकित करणाऱ्या घडामोडी इथे पाहायला मिळतात. 

राजीची भूमिका करणारी सामंथा ही अभिनेत्री अजूनही डोळ्यांसमोरून हलत नाही, इतकी ती खरोखर जणू तेच जगली आहे. तमिळ खेडी, शेते, झोपड्या, शहरी घरे, गल्ल्या यांची प्रादेशिकता उत्तम उतरली आहे. चेन्नई पोलीस व मुंबई पोलीस यांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी केलेले साहसी नियोजन, त्यात अजाणता घडलेल्या काही मानवी चुका, निकराचा लढा देऊन धाडसाने फत्ते केलेली कामगिरी... हे सारे स्वप्नवत वाटणारे प्रसंग सविस्तर पाहताना आपण अक्षरशः हेलावून जातो. दिल्लीतल्या एका रासायनिक कारखान्यात घडणारे नाट्य अद्भुत आहे, इकडे हे चालले असताना मुंबईतले दहशतवादी तिवारीच्या कुटुंबालाच वेठीला धरतात. त्याला ताबडतोब घरी येऊन तिथल्या परिस्थितीशी मुकाबला करावा लागतो आणि तोही घरच्यांचा ओरडा ऐकत. अखेर तो तिढा सोडवून पुन्हा आपल्या ड्यूटीवर हजर होताना स्वतःच्या शरीरमनाचा विचार तोसुद्धा करत नाही, इतके ते त्याने स्वतःवर लावून ओढून घेतलेले असते.

तमिळी समाज आणि श्रीलंकन नागरिक यांच्या जगण्यात विलक्षण साम्य आहे . त्यांचे पेहराव , खाद्य हे समुद्री जीवनाशी निगडित आहेत आणि भाषा , राहणीमान यांतही एका सागराच्या लाटेइतकेच अंतर आहे. चेन्नईमधल्या एका पात्राविषयी बोलताना मुंबईकर चटकन म्हणून जातो ,

'अरे...उसकी बोली तो श्रीलंकनवाली तमिल लगती है...वो उधर का ही होगा |' 

झटकन विचार करणे, पटकन निर्णय घेणे व लगेच तो अमलात आणणे या गोष्टींना सरावलेले मुंबईचे डिटेक्टिव्ह्ज म्हणूनच तपासकामात अतिशय माहिर असतात आणि कधीही कशातही हार मानत नाहीत. त्या 4-5 डिटेक्टिव्ह्जमधली एक तीही असते, जी कधीही इतरांनी सांभाळून घेण्याची अपेक्षा करत नाही. विशेष म्हणजे स्त्री जास्त लवचीक असते या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून ती बेशुद्ध पडलेल्या सहकाऱ्याला तर तिथून बाहेर काढतेच, इतरांनाही धीर देते पण स्वतः जायबंदी होते. 

सद्यकालीन भारतीय समाज, कुटुंबातले व्यक्तिगत नातेसंबंध, राजकीय हालचाली आणि आंतरराष्ट्रीय वातावरण या सर्वांना छेद देणारी अतिरेक्यांची कटकारस्थाने या सिरीजमध्ये अनुभवताना आपल्या मनाचा तळ अक्षरशः ढवळला जात असतो. भावना अनमोल असल्या तरी त्यापेक्षा कर्तव्य आधी महत्त्वाचे आहे, अशी कार्यतत्परता व उत्तरदायित्व प्रत्येक निर्णयाच्या वेळेस श्रीकांत व त्याचे सहकारी नेहमीच दाखवतात. अशा अनेक घटना असतात की त्या वेळेस सीनियर्सना केवळ श्रीकांत तिवारीच आठवतो व लढा देण्यासाठी तोच हवा असतो . अचानकच एका एपिसोडमध्ये तिवारी नाइलाजाने साधारण नऊ ते पाच कार्यालयात टेबलकाम करणारा एक कर्मचारी होऊन आपल्समोर येतो. त्याची कामाची पद्धत आणि बॉसची अपेक्षा यांचा काहीही मेळ बसत नसतो . असे प्रसंग पाहताना आपली हसून हसून मुरकुंडी वळते. 

गंभीर विषयातही असणारी अशी नर्मविनोदाची पखरण आपला ताण वाढू देत नाही, पण त्याच वेळेस उत्कंठा मात्र शिगेला पोचलेली असते. पहिल्या भागात सरासरी चाळीस मिनिटांचे दहा व दुसऱ्यामध्ये नऊ असे एकूण तेरा ते चौदा तास प्रेक्षकांना गुंगवून टाकण्यात व त्यामुळे खिळवून ठेवण्यात ही सिरीज पूर्णपणे यशस्वी ठरते. स्टोरीचा किंचितही मागमूस न लागू देता वाचकांची उत्सुकता वाढावी इतपतच इथे मी सिरीजबद्दल सांगितले आहे. कलाकार कसलेले, दिग्दर्शक अनुभवी आणि कॕमेऱ्याची किमयाही अफाट व अचाट आहे  प्राइम ॲमेझॉन या ओटीटी प्लॕटफॉर्मवर हे दोन्ही भाग (एकूण १९ एपिसोड्स) एकापाठोपाठ सलग पाहता येतील. नाहीतरी सध्याच्या या करोनाकाळात बाहेर फिरण्याऐवजी घरीच ऑनलाइन राहून इंटरेस्टिंग फॕमिली मॕनला भेटणे नक्कीच आनंददायी असेल !

 

लेखिका: नंदिनी देशमुख

सबस्क्राईब करा

* indicates required