पकडापकडीचा खेळ आता 'प्रोफेशनल' झालाय, आता ऑलिंपिकमध्ये याच्याही स्पर्धा होणार की काय?

अनेक खेळ जागतिक स्तरावर जेव्हा आले तेव्हा खूप गाजले. प्रो कबड्डी लीग तुम्ही पाहत असाल, महाराष्ट्रात लाल मातीत खेळला जाणार हा खेळ आता सगळीकडे खेळला जातो,पहिला जातोय. अनेक खेळाडू यातून पुढे आले आहेत. क्रिकेट,फुटबॉल, टेनिस अश्या खेळांची किर्ती जगभर आहेच. पण आता आणखी एक नवीन खेळ लोकप्रिय होत आहे. त्याचे नाव आहे 'टॅग'. या टॅग खेळाची वर्ल्ड चेस टॅग आंतरराष्ट्रीय स्पर्धाही खेळवली जाते. अमेरिकेत आणि युकेमध्ये ही स्पर्धा टिव्ही चॅनेल्सवरही दाखवली जातेय. हा टॅग खेळ म्हणजे काय, त्याचे नियम काय आहेत? याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत.

ख्रिस्तीयन आणि डेमियन डेवॉक्स यांनी २०१५ मध्ये एक संस्था स्थापन केली. ख्रिस्तीयनला त्याच्या मुलासोबत खेळताना ही कल्पना सुचली. त्याने याला टॅग असे नाव दिले. आपल्याकडे पकडापकडी हा खेळ खेळला जातो, तसाच हा खेळ. लहानपणी खेळलेला हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुण मुलं खेळत आहेत. या खेळाचे ब्रीदवाक्यच आहे, 'Keep Chasing and Don't Get Caught'. पकडा पकडी खेळताना ज्याच्यावर राज्य आहे त्याला चकवून आऊट न होणे हा नियम टॅगमध्येही आहे. फक्त या पकडापकडीत अनेक अडथळे असतात. त्यावरून उड्या मारून खेळाडूला पकडणे खूप कौशल्याचे असते. यात २ संघ आमनेसामने खेळतात. प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. प्रत्येक गेममध्ये १६ फेऱ्या असतात. टॅग करताना म्हणजे बाद करताना फक्त हाताने करायचे, पायाचा स्पर्श चालत नाही. २० सेकंदासाठी दोन खेळाडू रिंगणात खेळतात. खेळाडू टॅग झाला तर त्या संघाला गुण मिळत नाहीत. २० सेकंदापर्यंत बाद न झाल्यास त्या खेळाडूच्या संघाला गुण मिळतो. १२मीटरच्या चौकोनात हा खेळ खेळला जातो. खाली मॅट असते. या चौकोनाला क्वाड म्हणतात. याच्या बाहेर खेळाडूचा पाय गेल्यास तो बाद ठरवला जातो. १६ फेऱ्यांमध्ये ज्या संघाला सर्वात जास्त गुण मिळतात तो संघ विजेता ठरवला जातो.

१८ डिसेंबर २०१६ला वर्ल्ड चेस टॅगची पहिली स्पर्धा खेळवली गेली होती. हळूहळू या खेळाची लोकप्रियता वाढत आहे. वर्ल्ड चेज टॅग या खेळाच्या यूट्यूब चॅनेलनचे तब्बल ३०० मिलियन फॉलोअर्स आहेत.  WCT च्या निर्मात्यांचे म्हणणे आहे की पुढील १० वर्षांत डब्ल्यूसीटी यूएफसीपेक्षाही मोठे होईल.  अनेक  प्रेक्षक  तिकीट काढून हा खेळ पाहायला येतील. सगळेजण हा खेळ लहानपणापासून खेळत असल्याने समजणे सोपे आहे.

ही पकडापकडीची जागतिक स्पर्धा WCT म्हणून खेळवली जातेय. कदाचित पुढे जाऊन लपाछपी, लंगडी हे खेळही नव्या नावाने खेळवले जातील. लहानपणीचे खेळ नव्याने अनुभवायला नक्कीच मज्जा येईल, तुम्हाला काय वाटते?


लेखिका: शितल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required