computer

येणाऱ्या आर्थिक वर्षात या १० गोष्टी करून तुमची आर्थिक बाजू भक्कम करा !!

बोभाटाच्या सर्व वाचकांना नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो, येत्या वर्षासाठी अर्थविषयक म्हणजे पैशांविषयी काही महत्वाचे मुद्दे आम्ही तुमच्या समोर फुकट मांडत आहोत.

१. अर्थविषयक पहिले सूत्र म्हणजे “उत्पन्न – गुंतवणूक = खर्च”. आतापर्यंत आपण सगळे समजत होतो ते असे की “उत्पन्न – खर्च = गुंतवणूक”.

२. पहिले अर्थसूत्र समजले असेल तर कालबद्ध गुंतवणुकीचे नियोजन करायला शिका. यामध्ये गुंतवणुकीचा क्रम असा असेल.

A. वार्षिक उत्पन्नाचा कमीतकमी १० % आयुर्विमा.

B. वार्षिक उत्पन्नाच्या २.५ पट आरोग्यविमा.

C. म्युच्युअल फंड मध्ये दरमहा करायची गुंतवणूक.

D. प्रशिक्षण घेऊन शेअर बाजारात थेट गुंतवणूक

 

३. सर्व सरकारी योजनांचा पुरेपूर फायदा घ्या. उदाहरणार्थ, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री वयोवंदना पेन्शन स्कीम, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना. अशा सर्व सरकारी योजनांमध्ये नोंदणी करून त्याचा पुरेपूर फायदा घेणे.

४. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करून MSME/SME योजनांचा फायदा घ्या. यामध्ये बँकेपेक्षा कमी दरात पत पुरवठा, सरकारी टेंडर मध्ये प्राधान्य, टेंडर मध्ये अनामत रक्कम न भरण्याची सुविधा असे अनेक फायदे आहेत.

५. म्हाडा सारख्या गृहनिर्माण संस्थेच्या प्रत्येक लॉटरीत हिरीरीने भाग घ्या.

६. तुमचे क्रेडीट रेटिंग तपासून घ्या. सिबिल या संस्थेद्वारा वयक्तिक पतमानांकन (credit score) केले जाते. हे मानांकन 750 किंवा अधिक असल्यास कोणतेही कर्ज सहज मिळू शकते.

७. सरकारी बिगरसरकारी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन ही सुविधा नाही म्हणून ‘नॅशनल पेन्शन स्कीम’चे खाते ताबडतोब उघडून त्यामध्ये एक छोटी रक्कम दरमहा जमा करण्यात सुरुवात करा.

८. ज्या कार्यालयामध्ये ‘ग्रुप इन्शुरन्स’ असेल तिथे ‘ग्रुप इन्शुरन्स’ मध्ये सामील व्हा. समजा तुमच्या कार्यालयात अशी योजना नसेल आणि कर्मचाऱ्यांची संख्या १५ पेक्षा जास्त असेल तिथे ‘ग्रुप इन्शुरन्स’चा आग्रह करा. वार्षिक २००० खर्चामध्ये ५ लाखाचा विमा सहज मिळतो.

९. म्युच्युअल फंड मध्ये योग्य सल्ला घेऊन दरमहा छोटी रक्कम गुंतवायला सुरुवात करा. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या खर्चावर आपला ताबा नाही तर SIP ही सुविधा ही तुमच्यासाठी योग्य ठरेल.

१०. अमुकतमुकने शेअरबाजारात एका वर्षात कोट्यावधी रुपये कमावले असे तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल तर यापैकी ९०% बातम्या निखालस खोट्या असतात. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करून भांडवल न गमावता वार्षिक २५% ते ३०% नफा कमावणं असे लक्ष्य शेअर बाजारात सतत यश मिळवून देऊ शकतं. परंतु त्यासाठी आधी पैश्याची गुंतवणूक शेअर बाजाराच्या शिक्षणात करा. ‘डे ट्रेडिंग’ मध्ये रोज हजारो रुपये कमवा असे शिकवणारे सर्व महाभाग भंपक असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. शेअरबाजारात गुंतवणूक करायचीच असेल तर आधी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडा.

मित्रांनो वर दिलेल्या मुद्द्यांपैकी तुम्हाला अधिक माहिती कशाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा. पुढच्या काही लेखांमध्ये योग्य इतके मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

 

 

आणखी वाचा :

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 'आयुष्मान भारत' योजना आहे तरी काय ? वाचा हे ४ मुद्दे !!

जाणून घेऊया एलआयसी च्या कॅन्सर कव्हर पॉलिसी बद्दल !!

सबस्क्राईब करा

* indicates required