computer

फॉर्ब्स ३०: भारतातल्या कर्तबगार व्यक्तींची यादी...भेटा यादीतील दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांना!!

भारतातल्या तरुणाई विषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे,आळशी आहे  असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुणाई अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे  सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयी चे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने  बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा  भारतीय  तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे. 

फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत  कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे. 

चला तर आजचा पहिला भाग वाचूया. 

फोर्ब्सच्या यादीतील एक ठळक नाव म्हणजे अवघ्या २८ वर्षांच्या शेफाली विजयवर्गीया आणि निहारिका कपूर. जाहिरात, मार्केटिंग आणि मिडिया या क्षेत्रात या तरुणींनी वेगळाच ठसा उमटवला आहे. आता त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

सुरुवात करूया शेफाली विजयवर्गीया यांच्यापासून. शेफाली विजयवर्गीया या अमूल कूल या कंपनीच्या ब्रँड मॅनेजर पदावर आहेत. २०१६ मध्ये एमबीए (Institute of Rural Management, Anand) येथून पूर्ण केल्यावर त्या अमूल कूल मध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाल्या. कोणत्याही फूड कंपनीत पदार्थांच्या विक्रीचे आव्हानात्मक काम सेल्स मॅनेजर समोर असते. शेफाली यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी Diced Cheese नुकतेच लाँच झाले होते. जरी अमूलसारखे मोठे नाव सोबत असले तरी नव्या सेगमेंट मध्ये उडी घेणे जितके दिसते तितके सोपे नव्हते. चीझ बनवणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्याही स्पर्धेत आघाडीवर होत्या. पण त्यांनी अत्यंत हुशारीने इतर कंपन्यांना मागे टाकले.   

एक स्त्री म्हणून शेफाली यांना अनेक अडचणी आल्या.  त्या सांगतात, "मी तेव्हा नवखी आणि एक स्त्री असल्याने व्यापारी भागीदारांनी मला गांभीर्याने घेतले नाही. पण मी हार मानली नाही. प्रमुख खरेदीदारांसोबत परस्पर संबंध तयार करण्यास सुरवात केली. विविध भागधारकांशी बैठका आयोजित केल्या. अनेक महत्वाच्या बैठकींचे आयोजन केले. नवीन उत्पादन कसे चांगले आहे हे पटवून सांगितले. त्यासाठी अनेक नमुने तयार केले आणि वापरून बघण्यास सांगितले."  नवीन उत्पादनाच्या गुणवत्तेची पूर्ण हमी घेऊन त्या न थांबता, उत्साहाने काम करत होत्या. केवळ दोन महिन्यांत बाजारातील विक्रीचा ३० टक्के हिस्सा त्यांच्या कंपनीने मिळविला. शेफाली यांच्या काम करण्याच्या आक्रमक पद्धतीने कंपनीला चांगला फायदा झाला. गेले एक वर्ष कोरोनामुळे कठीण असले तरी काम थांबले नाही. लॉकडाऊनमध्येही वेळेत कामे झाली. ८ महिन्यात शेफाली यांनी ब्रँड मॅनेजर म्हणून अतिशय यशस्वीपणे अमूल कूलचा पदभार सांभाळला.

आता वळूया निहारिका कपूर यांच्याकडे. शेफाली यांच्या प्रमाणेच निहारिका कपूर यांचेही नाव 'फोर्ब्स' च्या यादीत जाहिरात, मार्केटिंग आणि मिडिया या या क्षेत्रात महत्वाचे आहे. 

डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि सोशल मिडीयावर सगळयात जास्त प्रभावशाली व्यक्ती म्हणून निहारिका कपूर या प्रसिद्ध आहेत. त्या यूट्यूब इंडिया मध्ये APAC lead म्हणून काम करत आहेत. निहारिका या यूट्यूब इंडियाच्या व्हर्टिकल बिजनेस मध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला सदस्या आहेत.

२०१३ मध्ये निहारिका यांनी लेडी श्री राम महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली. करीयरच्या सुरुवातीला त्यांनी गूगल इंडियामध्ये असिस्टंट अकाउंट स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केले. गुगल जाहिरातदारांना ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी मदत पुरविणे हे काम त्या करायच्या. दोन वर्षानंतर त्यांना पार्टनर मॅनेजर म्हणून यूट्यूब इंडियामध्ये संधी दिली गेली. नवीन कलाकारांना तयार करण्यासाठी युट्युबने टीम तयार केली आहे. या टीममध्ये निहारिका होत्या. 

नवीन प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचे पोर्टफोलिओ तयार करणे, युट्युबवर कंटेंट तयार करण्यासाठी कार्यशाळा घेणे, कमाईची नवीन धोरणं आखणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निहारिका यांच्यावर  होत्या. त्यांनी हे काम खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांच्या कामाचे बक्षीस म्हणून त्यांची २०१७ ला वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी मॅनेजर म्हणून बढती झाली. अथक मेहनत, चिकाटी आणि हुशारीने त्या काम करत राहिल्या. अगदी कमी कालावधीतच म्हणजे मागच्याच वर्षी त्यांना आशिया - पॅसिफिक विभागाचे महत्वाचे पदही मिळाले.

तर, आजच्या भागात आपण या दोन कर्तुत्वान तरुण स्त्रियांची माहिती घेतली. पुढच्या भागात आणखी कर्तबगार तरुणांची ओळख करून घेऊ या. तोवर हा लेख शेअर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required