computer

वर्षासहलीसाठी उत्तम पर्याय- छोटा पण सर्वगुणसंपन्न भिवगड!! कसे जायचे, काय पाहायचे हे ही पाहून घ्या..

कर्जत हे तसं सर्वांच्या परिचयाचं ठिकाण आहे. मुंबईशी रेल्वेने जोडले गेल्यामुळे कर्जत आज सुपरिचित आहे. या कर्जत परिसरात अनेक दुर्ग, घाटवाटा, लेणी इ. बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत. परंतु या सर्वांमध्ये आपले वेगळेपण जपणारा भिवगड हा दुर्ग खास आहे. त्यामुळेच या लेखात आपण या भिवगडाच्या वेगळेपणाबद्दल जाणून घेऊ.

कर्जत या पुण्या-मुंबईच्या साधारणतः मध्यावर असणाऱ्या तसेच रेल्वेमार्गाने जोडल्या गेलेल्या तालुक्याच्या ठिकाणावरून भिवगड दुर्ग ८ किमी. अंतरावर वसला आहे. येथे येण्यासाठी रेल्वेने कर्जत स्थानकात उतरून तुम्हाला सहा आसनी रिक्षा मिळतात. 'वदप' आणि 'गौरकामत' ही या दुर्गाच्या पायथ्याची दोन गावे आहेत. या दोन्ही गावातून आपल्याला या दुर्गावर चढाई करता येते. आपण जाताना गौरकामतकडील वाटेने चढाई करावी व उतरताना वदपकडील वाटेने उतरावे, असे केल्यास आपल्याला हा दुर्ग उत्तमप्रकारे पाहता येतो व आपली गडफेरी सुद्धा पूर्ण होते.

 

भिवगड गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो, परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२५ फूट इतकीच आहे. भिवगड हा दुर्ग टेकडीवर वसलेला आहे. अर्ध्या फोडलेल्या लाडवांसारखा भिवगडाचा आकार आहे. या दुर्गाचे एक वैशिष्ट्य असे की हा गिरिदुर्ग असूनही स्थापत्यविशारदांनी संरक्षणाच्या दृष्टीनं खंदक खणून भिवगड आजूबाजूच्या डोंगरांपासून विलग केला आहे. अशी संरक्षणात्मक रचना करण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे या दुर्गाला असलेली थोडकी उंची आहे. भिवगडाच्या मागे संह्याद्रीची मुख्य पर्वतरांग असून त्यात 'ढाक' हा दुर्ग आहे. तसेच याच्या पश्चिमेकडे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, पेब, चंदेरी, म्हैसमाळ, प्रबळगड, ईर्शाळा, कर्नाळा, सोंडाई, इ. दुर्ग दृष्टीस पडतात.

प्राचीन काळातील 'खांडपे ते खांडशी' या कर्जतमधील स्थानिक परंतु महत्वाच्या व्यापारी वाटेवर तसेच 'गाळदेवी' या त्या परिसरातील महत्वाच्या घाटवाटेवर भिवगड हा दुर्ग राखणदाराचं काम करीत होता. या दोनही महत्वाच्या वाटा याच परिसरातून जात असल्यामुळे कधीकाळी याच मार्गाने कल्याणच्या बंदरातून व्यापारी ये-जा करीत असत. यावरुन असे अनुमान निघते कि प्राचीन काळापासून भिवगड हे या वाटेवरील महत्वाचं ठाणं होतं, व मध्ययुगात याला दुर्गाचा शेला-पागोटा चढवला गेला. एकंदरीत पाहता हा दुर्ग येथील वाटसरुंचे व महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करीत असे.

भिवगडावर आजमितीला आपल्याला कोरीव पायऱ्या, धान्यकोठार, पाण्याच्या टाक्या (यात काही स्तंभ टाक्यांचासुद्धा समावेश आहे), तसेच वाड्याच्या जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात. यातील वाड्याच्या जोत्याचे अवशेष विशेष आहेत, कारण भिवगडाच्या माथ्यावरील एकूण पठाराचा विचार करता या वाड्याचं जोतं प्रचंड मोठं आहे. ते बघताना आपल्या नजरेला जाणवते. यावरुन भिवगडासारख्या छोट्या दुर्गाचं महत्त्व आपल्या ध्यानी येतं. त्याचप्रमाणे दुर्गावर इतरत्र सुद्धा विखुरलेले ऐतिहासिक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्हला या दुर्गाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर दुर्गवाटाचा भिवगडाचा व्हिडिओ पाहायला विसरु नका. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

गौरकामतकडील बाजूने या दुर्गावर जाताना आपल्याला काही पायऱ्यांचे अवशेष लागतात. त्याच्या उजव्या हाताला वरच्या बाजूला एक कातळकोरीव गुहा असून त्याच्या बाहेर एक वीरगळ असलेला आपल्या नजरेस पडतो. या पायऱ्या चढून वर आपल्यावर सुरुवातीला आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके लागते. इतिहास व पुरातत्त्वव अभ्यासक श्री.सागर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरकामत गावातील ग्रामस्थांनी या टाक्यातील साचलेला गाळ काढून टाकला त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! हे टाके खोदण्यासाठी फोडलेला दगड हा या दुर्गाच्या तटबंदीच्या बांधणीसाठी वापरण्यात आला आहे. यातील गाळ काढल्यामुळे हे प्रत्यक्षात आत उतरुन पाहता येतं. परंतु या दुर्गाचं एक दुर्दैव असं आहे की याचा लिखित इतिहास आज उपलब्ध नाही. त्यामुळे इतिहासात कागदोपत्री याचं नेमकं स्थान काय होतं यावर इतिहास आजतरी शांत आहे. परंतु जेथे इतिहास थांबतो तेथून पुरातत्त्व सुरु होतं. त्यामुळे आजमितीला भिवगडावर असलेल्या पुरातत्वीय अवशेषांवरुन या दुर्गाचा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे भिवगड हा दुर्ग छोटासा जरी असला तरी तो सर्वगुणसंपन्न आहे. त्यामुळेच या दुर्गाचा एकंदर आकार पाहता व त्याने इतिहासात केलेले काम पाहता 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असे आवर्जून म्हणावेसे वाटते.

येथेच जवळ प्रसिद्ध असा वदपचा धबधबा आहे. येथे पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते. परंतु भिवगडावर मात्र फारसे कोणी फिरकत नाही. त्यामुळेच भटक्यांपासून तसा अलिप्त असलेला हा दुर्ग फिरस्त्यांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे.

संधी मिळेल तेव्हा भिवगडला भेट द्या पण तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ नक्की बघा

सबस्क्राईब करा

* indicates required