इकोफ्रेंडली फटाके उडवा, प्रदूषण टाळा. काय असतात इकोफ्रेंडली फटाके

मंडळी, फटाक्यांनी होणाऱ्या प्रदूषणाची सध्या चर्चा सुरु आहे. फटाक्यांनी खरंच प्रदूषण होतं का ? उत्तर आहे - ‘हो’. पण दिवाळी आहे म्हटल्यावर फटाके फोडल्याशिवाय साजरी होऊ शकते का ? तर ते शक्यच नाही ना भौ. मग करायचं काय ? एक चांगला मार्ग आहे राव. ‘इकोफ्रेंडली फटाके’ फोडा !! तंत्रज्ञानाच्या युगात फटाके सुद्धा आधुनिक होत आहेत राव. चला तर जाणून घेऊया ‘इकोफ्रेंडली फटाके’ असतात तरी काय.


मंडळी, फटाके हे अल्युमिनियम, बोरियम, कार्बन आणि पोटॅशिअम नायट्रेट सारख्या प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांनी भरलेले असतात. याशिवाय ज्या गन पावडरमुळे फटाके फुटतात त्यात सल्फर असतो. फटाके फुटल्यानंतर प्रदूषण पसरवणारे घटक हवेत सोडले जातात. हवेत त्यांचं विघटन तर होत नाहीच पण उलट ते श्वासावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात. 


तर, इकोफ्रेंडली (ग्रीन फायरवर्क्स) फटाके बनवताना ही सर्व घातक रसायनं वापरली जात नाहीत. वापरलीच तर अगदी कमी प्रमाणात वापरली जातात. या प्रकारच्या फटाक्यांमध्ये सल्फर आणि शिसे यांचं प्रमाण नगण्य असतं. आवाजाचं म्हणाल तर नेहमीच्या फटाक्यांसारखाच यांचाही आवाज असतो.


अनेक संस्था, समुदाय अशा प्रकारचे इकोफ्रेंडली फटाके तयार करण्याचं काम करत आहेत. आसाम मध्ये असाच एक समुदाय आहे. गणक्कुची गावात राहणारे लोक इकोफ्रेंडली फटाके तयार करत आहेत आणि तेही तब्बल १३० वर्ष जुन्या पद्धतीप्रमाणे. या फटाक्यांना ‘टुब्रीस’ म्हणतात. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या फटाक्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात रसायनांचा वापर होतो. आसाम सरकारनेही गावकऱ्यांच्या कामाला दुजोराच दिला आहे. आता मुद्दा असा आहे की या गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हातभाराची गरज आहे. शिवाय इकोफ्रेंडली फटाक्यांना कायदेशीर मान्यताही मिळाली पाहिजे.


मंडळी, आज इकोफ्रेंडली फटाके तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. CSIR आणि NEERI या भारतीय संस्थांनी इकोफ्रेंडली फटाके तयारही केले आहेत. या संस्थांनी तयार केलेल्या फटाक्यांच उत्पादन करण्यासाठी कमी खर्च तर लागतोच पण फटाक्यांमुळे होणारा धूर आणि आवाजही आटोक्यात राहतो. 


हे फटाके आपल्या हाती कधी येणार ?


भारत सरकारने CSIR आणि NEERI संस्थांनी तयार केलेलं तंत्रज्ञान ‘पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था’ (PESO) विभागाकडे पाठवलं आहे. एकदा का PESO कडून मान्यता प्राप्त झाली की लगेचच भारतातल्या प्रमुख फटाके कारखान्यांमध्ये इकोफ्रेंडली फटाके तयार होऊ लागतील. यासाठी थोडी वातट बघावी लागेल एवढंच. 

मंडळी, या वर्षीची दिवाळी तर संपत आली पण २०१९ ची दिवाळी मात्र ‘इकोफ्रेंडली दिवाळी’ असणार हे नक्की. म्हणजे बघा, फटाके फोडण्याचाही आनंद मिळेल आणि पर्यावरण प्रदूषितही होणार नाही. 

फटाके तयार कसे होतात हे जाणून घ्यायचं असेल तर आमचा खालील लेख वाचायला विसरू नका :
फटाके कसे बनवतात माहित आहे का ? जाणून घ्या फटाके बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया !!!