computer

फटाके कसे बनवतात माहित आहे का ? जाणून घ्या फटाके बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया !!!

दिवाळी येतेय… दिवाळीच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. नवीन कपडे, फराळ यासोबत आणखी एका गोष्टीची खरेदी या सणाला होत असते… फटाके! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे फटाके कसे बनवतात याचा कधी विचार केलाय? धडाम आवाज करणारे, रंगांची उधळण करणारे, जागेवर गोल फिरणारे, सरररकन आकाशात झेपावणारे असे फटाक्यांचे विविध प्रकार कसे बनवत असतील? चला तर मग जाणून घेऊया…

फटाके म्हणजे एक छोटे स्फोटक पदार्थ असतात ज्यांच्यात रसायने आणि इंधने वापरली असतात. जेव्हा यांचा स्फोट होतो तेव्हा आवाज आणि रंग बाहेर पडतात. अचानक बाहेर पडलेली मोठ्या प्रमाणातील ऊर्जा जेव्हा हवेत येते तेव्हा हवेच्या दबावामुळे शॉकवेव्ह निर्माण होतात आणि परिणामस्वरूप आपल्याला आवाज ऐकायला मिळतो. 

फटाके तयार करण्यासाठी कागदामध्ये स्फोटक दारू (गन पावडर) भरून कागदाला गरजेनुसार वेगवेगळे आकार दिले जातात. पाहूया या गन पावडर मध्ये काय काय असते - 

1. पोटॅशिअम नायट्रेट (KNO3) - नायट्रेट हे रासायनिक क्रिया घडवण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करते. 

2. चारकोल - चारकोल कार्बन पुरवठा करते.

3. सल्फर (S) - इंधनाचे काम सल्फर करते.

 

जेव्हा आपण फटाक्याची वात पेटवतो, तेव्हा ती जळत जाऊन या रसायनांपर्यंत पोचते. ज्यावेळी आगीचा संपर्क गन पावडरशी होतो त्या वेळी नायट्रेट, चारकोल आणि सल्फर यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून स्फोट होतो आणि नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड गॅस व पोटॅशिअम सल्फाईड निर्माण होतात. नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅसच्या प्रचंड दबावामुळे कागदाचे आवरण फाटते आणि जोरदार धमाक्याचा आवाज येतो. विविध केमिकल्स मुळे वेगवेगळे रंगही दिसतात.

फटाक्यांना जी वात लावलेली असते ती सुद्धा गन पावडरनेच तयार केली असते. त्या सोबत त्यात पोटॅशिअम परक्लोरेट नावाचे रसायन वापरले असते जे ऑक्सिडायजरचे काम करते. 

आता पाहूया हे फटाके तयार कसे होतात -

जाड कागदाचे अनेक थर लोखंडी रॉडला गुंडाळून त्याच्या पोकळ नळ्या बनवल्या जातात. या नळ्या फटाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या जाडीच्या आणि आकाराच्या असू शकतात. नंतर त्यांना अवजारांचा वापर करून घट्ट बांधले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या गुंडाळीचे छोटे छोटे भाग केले जातात. हेच आपले फटाके. या फटाक्यांची एक बाजू एका विशिष्ट प्रकारच्या लाल मातीने बंद केली जाते. नंतर यात दबाव देऊन गन पावडर भरली जाते. शेवटी वरच्या बाजूने वात लावून त्याची दुसरी बाजू सुद्धा बंद केली जाते. झाला फटाका तयार! 

आता हे फटाके ठरवलेल्या संख्येत एकत्र करून त्यांचे पॅकेट केले जातात. खोक्यात किंवा प्लास्टिक पिशवीत यांना पॅक करून त्यावर कंपनीचे लेबल लावले जाते आणि नंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. 

फटाक्यांचा इतिहास बघितला तर तो फार प्राचीन काळापासून दिसतो. इसवीसनाच्या दोनशे वर्षे पूर्वीपासून चीनमध्ये फटाक्यांचा वापर केलेला आढळतो. वाईट शक्तींना पळवून लावण्यासाठी पोकळ बांबूला गरम करून त्यातून जोराचे आवाज चिनी लोक काढत असत. नंतर गन पावडरचा शोध लागला आणि बांबू मागे पडले. पण आजही जास्तीत जास्त फटाक्यांना बांबूचाच आकार ठेवला जातो. चीनमध्ये सुरू झालेली ही फटाके फोडण्याची पद्धत नंतर जगभरात पसरली. 

आपल्याकडे जसे दिवाळीला फटाके फोडले जातात तसेच अनेक देशांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला, हॉलोवीन सणाला, मुस्लिम देशांमध्ये ईदला, नेपाळमध्ये तिहार सणाला, मोरोक्को मध्ये अशुरा सणाला फटाके वाजवले जातात. 

सध्या मात्र अनेक देशात फटाक्यांवर प्रदूषणाच्या कारणांमुळे बंदी घातली गेली आहे. भारतात पूर्णतः बंदी नसली तरी कोर्टाने वेळेचे निर्बंध मात्र लावले आहेत. दिलेल्या वेळेत फटाके उडवून आपण दिवाळी आनंदाने साजरी करू या…

सबस्क्राईब करा

* indicates required