computer

शनिवार स्पेशल : तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!

सेक्रेड गेम्स ज्यांनी बघितला आहे त्यांना गायतोंडे कोण हे सांगायलाच नको!  "कभी कभी लगता है अपुन ही भगवान है..." असं म्हणणार्‍या गायतोंडेच्या घरावर समजा तुम्हाला रेड टाकायची झालीच तर? अशावेळी तुमची जी अवस्था होईल तशीच अवस्था १४ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी दिल्लीच्या छत्तरपूर मधल्या एका आलिशान हवेलीवर रेड टाकण्यापूर्वी आयकर अधिकार्‍यांच्या एका पथकाची झाली होती. ही हवेली होती मोईन कुरेशीची !

मोईन कुरेशी हा दिल्लीतली बडी बडी धेंडं ज्याला 'मसीहा' मानायची अशी असामी. कोण होता हा मोईन कुरेशी? मोईन कुरेशी होता एकेकाळी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मधला एक 'बडे' का मटन एक्स्पोर्टर !! १९९० ला बिझनेसची सुरुवात करून दहा वर्षांत एक नंबरचा बीफ एक्स्पोर्टर बनलेला मोईन कुरेशी! केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा खास मित्र! लिकर बॅरन पाँटी चढ्ढाचा जिगरी दोस्त! किती वेगवेगळ्या पध्दतीने या 'मसीहा' ची ओळख सांगायची??? याच मसीहाची दुसरी ओळख म्हणजे मोईन कुरेशी हा भारतातला एक नंबरचा हवाला एजंट!! आज याचीच ष्टोरी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

त्या दिवशी आयकर खात्याने २०१४ साली जेव्हा मोईन कुरेशीच्या बंगल्यावर धाड घातली. पण अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ कुरेशीचा बंगला बघण्यातच गेला असे म्हणतात. पाच एकराच्या भूखंडावर २५००० चौरस फुटांचा हा बंगला म्हणजे मूर्तिमंत ऐश्वर्याचा नमुना होता. या बंगल्याची किंमत २०० कोटींच्या आसपास असावी असा अंदाज आहे. या बंगल्याच्या अंतर्भागाचे वर्णन करण्यात आम्ही वेळ घालवण्यापेक्षा सोबत दिलेले फोटो बघूनच अंदाज करा.

अपेक्षेप्रमाणे त्या हवेलीत प्रवेश केल्यावर आयकर अधिकाऱ्यांना दम देण्याचे प्रयत्न झाले, धमक्या देण्यात आल्या. पण आयकर अधिकारी गेले कित्येक महिने कुरेशीचा फोन टॅप करत होते. साडेतीनशे तासांचे ते रेकॉर्डिंग वाया जाणार नाही याची खात्री होती. सहासात तासांच्या शोधानंतर सहा कोटी रोकड आणि अनेक संशयास्पद कागदपत्रे घेऊन जेव्हा आयकर अधिकारी बाहेर पडले तेव्हा मोईन कुरेशी हवाला ऑपरेटर्सच्या काळ्या यादीत समाविष्ट झाला होता.

कुरेशीच्या कार्यालयातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या घरावर पण सोबतच धाडी घालण्यात आल्या होत्या. त्यांच्या नावावर एकूण वीस बँक लॉकर मिळाले. त्यातून आणखी रोकड गवसली. कुरेशीने हे लॉकर आपलेच असण्याची कबुली दिली, पण रोकड मात्र आपली नाही असे सांगून कानावर हात ठेवले. आयकर अधिकारी मोईन कुरेशीला ओळखत नव्हते असे नाही, पण पुरेसा पुरावा आणि कुरेशीच्या थेट केंद्रीय मंत्रीमंडळातील काही सदस्यांशी असलेली अतिसलगी त्यांना काही करू देत नव्हती.

२०११ साली कुरेशीच्या मुलीचा विवाह लंडनच्या एका चार्टर्ड अकाउंटंटशी झाला.  तेव्हा तिचा एका लेहेंगाच ८० लाख रुपयांचा होता. हा खर्च  आधीच मिडीयात गाजत होता. याच लग्नात संगिताच्या कार्यक्रमात राहत फतेह अली खानला निमंत्रित करण्यात आले होते. राहत फतेह अली खानला या कार्यक्रमासाठी मिळालेल्या बिदागीचा आकडा किती मोठा होता हे कधीच कळले नाही. पण त्यानंतर राहत फतेह अली खानला दिल्ली विमानतळावर परदेशी चलन घेऊन जाताना जेव्हा पकडले गेले, तेव्हा त्या चलनाची किंमत भारतीय रुपयांत ६६ लाखांच्या आसपास होती.

अर्थातच या सर्व घटनांमध्ये मोईन कुरेशीला गोवण्याइतका पुरावा तेव्हा आयकर खात्याच्या हातात नव्हता. यानंतर ब्रिटिश रेव्हेन्यू इंटेलिजन्स मार्फत खात्रीलायक माहिती आली आणि आयकर अधिकार्‍यांनी कुरेशीचे फोन टॅप करून रेकॉर्डींग सुरु केले. एकूण साडेतीनशे तासाचे रेकॉर्डींग आणि शेकडो टेक्स्ट मेसेज जमा झाल्यावर आयकर अधिकार्‍यांनी कुरेशीवर रेड टाकायचे नक्की केले होते.

याआधीही एक घटना घडली होती.  २०१३ सालच्या नोव्हेंबरमध्ये मोईन कुरेशीची मुलगी पर्निया परदेशातून भारतात आली. तेव्हा विमानतळावर ती ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडली. ज्यांच्याकडे काहीच जाहीर करण्यासारखे नसते त्यांना ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडता येते आणि त्यातून मोईन कुरेशीच्या मुलीला अडवणार कोण? पण त्या दिवशी तिच्या बॅगांची कसून तपासणी झाली. कुरेशीचे फोन टॅप असल्याने या बॅगेजमध्ये काय असेल याची कस्टम अधिकार्‍यांना आधीच माहिती होती. तिच्या लगेजमध्ये काही करोड रुपयांचे सामान मिळाले. त्यात ३५ लाखांच्या फक्त पर्सेस निघाल्या. ही कुरेशीला दिलेली एक वॉर्नींग होती. पण आपल्या 'कनेक्शन' च्या जोरावर आपण काहीही करू शकतो याची खात्री असलेल्या कुरेशीने याकडे दुर्लक्ष केले.

यानंतर आयकर अधीकाऱ्यांचा मोर्चा सीबीआय चीफ अमरप्रताप सिंग यांच्याकडे वळला. 2G घोटाळा, कोळसा घोटाळा प्रकरणांची तड लावणारे अमर प्रताप सिंग प्रत्यक्षात एक लाचखोर निघाले.एका औद्योगिक समूहाला लवकरात लवकर क्लिअरन्स मिळावा म्हणून कुरेशी सिंग यांच्या मार्फत लाच गोळा करत होता आणि परदेशी पाठवत होता. २०१० ते २०१२ या काळात अमरप्रताप सिंग प्रमुख पदावर होते.

अत्यंत निस्पॄह अशी ख्याती असलेल्या या गृहस्थांचे आणि मोईन कुरेशीचे मात्र खूपच घनिष्ठ संबंध होते. त्या दोघांच्या शेकडो एसएमएस संदेशातून आणि टेलिफोनच्या संभाषणातून त्यांच्या जवळिकीबद्दल जितके आणि जे कळते, ते तर फारच धक्कादायक आहे. अमरप्रताप सिंगांच्या घरातल्या अनेक चैनीच्या वस्तूंची खरेदी मोईन कुरेशीचा खिसा रिकामा करून व्हायची. अमरप्रताप सिंग यांची राजकीय वर्तुळात चांगलीच उठबस होती.  त्यांची पत्नी शबनम म्हणजे काँग्रेसच्या मोहसिना किडवाईंची मुलगी. असे असताना आयकर अधिकारी रेड टाकायला घाबरले नाहीत.  त्याचे कारण म्हणजे जमा केलेला भरभक्कम पुरावा!!

(अमरप्रताप सिंग)

एका खात्रीलायक बातमीनुसार या रेडनंतर अमरप्रताप सिंग अभय मागायला अर्थमंत्री चिदंबरम यांच्याकडे पोहचले.  पण त्यांनी ढवळाढवळ करण्यास नकार दिला. या धाडी पडल्या, मिडीयात गवगवा झाला. पण नंतर आलेल्या निवडणूकीच्या प्रचारात काही पुसटसे संदर्भ सोडल्यास 'इलेक्शन मटेरीअल' म्हणून या प्रकरणाचा फारसा गवगवा झाला नाही.  याचे एकच कारण होते की कुरेशीच्या 'हवाला' यादीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्हीतील अनेक मोठ्या व्यक्तींचा उल्लेख होता. साहजिकच ही बातमी फारशी चर्चेत नसणे दोन्ही पक्षांना हवे होते.  

मोईन कुरेशी इतका मोठा खिलाडी आहे की आतापर्यंत सीबीआयच्या तीन प्रमुखांना त्याच्यासोबत असलेल्या घनिष्ट किंवा 'धनी'ष्ट संबंधामुळे नोकरी गमवावी लागली आहे.  २०१४ साली कुरेशीच्या घरावरच्या धाडीनंतरच्या चौकशीत असे उघडकीस आले होते की वर्ष-सव्वा वर्षाच्या काळात रणजीत सिन्हा या सीबीआयच्या प्रमुखांनी मोईन कुरेशीच्या घरी कमीतकमी ७० वेळा पायधूळ झाडली होती. एका मटण एक्स्पोर्टरच्या घरी सीबीआयच्या प्रमुखांचा इतका घरोबा असण्याचे काय कारण असावे हे कळायला फार मोठा तर्क करण्याची काही गरज आहे का? 

त्यानंतर नंबर लागला आलोक वर्मा या सीबीआय प्रमुखांचा !! आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांच्या भांडणाने तर सीबीआयची अब्रू वेशीवर टांगली होती. या दोघांनीही एकमेकांवर मोईन कुरेशीकडून पैसे लाटल्याचा आरोप केला होता. शेवटी पंतप्रधान मोदींना आलोक वर्मांची हकालपट्टी करावी लागली होती.  तर असा थोर महीमा आहे मोईन कुरेशी या माणसाचा!!

मोईन कुरेशीच्या अमर्याद संपत्तीपैकी उघडकीस आलेली काही संपत्ती, अर्थात तीही आपल्यासारख्यांसाठी अमर्यादच आहे- 

२०१४ च्या त्या रेडनंतर सीबीआय-इडी-डीआरआय यांसारख्या सरकारी संस्थांनी कुरेशीच्या परदेशी बँकांतल्या ४५ खात्यांचा आतापर्यंत शोध लावला आहे. अमेरिकेत २०, फ्रान्स, इंग्लंड आणि  इतर युरोपीय देशात १७, तर हाँगकाँग सिंगापूरसह आशियाई देशांत बाकीची खाती आहेत.

ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये असलेल्या बुलोवा होल्डींग्ज कंपनीचा तो एकमेव लाभार्थी आहे. लंडनच्या मेफेअर या महागड्या उपनगरात £३८५०००० किंमतीचा महागडा फ्लॅट याच कंपनीच्या नावावर आहे. कुरेशीचा सगळा गोरख धंदा बॅरो होल्डींग्ज, बुलोवा होल्डींग्ज आणि नॉइस कन्सल्टन्सी या कंपन्यांच्या मार्फत चालतो.

'हमारे आदमी चारों ओर फैले हुए हैं'  या सिनेमातल्या वाक्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मोईन कुरेशीचा हवाल्याचा धंदा कसा सर्वदूर पसरला आहे ते आता बघू या!!

त्याच्या पत्नीची भावंडं इस्लामाबाद, दुबई, लंडन आणि हाँगकाँगमध्ये त्याचा धंदा बघतात. भारतात दिल्लीतल्या तुर्कमान गेट आणि दामिनी एक्स्चेंज-ग्रेटर कैलाश या परिसरात मोहमद परवेझ हा त्याचा डिलर आहे. त्याचं भारतातलं ऑफीस त्याची खास माणसं आदित्य शर्मा, दिनेश गुप्ता आणि एल. के. यादव सांभाळतात. हिमांशू मेहेता आणि नबील खान हे त्याचे दुबईतले व्यवहार बघतात. हाँगकाँगमध्ये 'लकी चॅन' नावाचा इसम त्याची खरेदीविक्रीची कामं बघतो. अमेरिकेत असताना त्याचे वास्तव्य मॅडिसन अ‍ॅव्हेन्यूमध्ये असते, पण न्यू जर्सी-न्यूयॉर्क या शहरांत त्याची अनेक अपार्टमेंट्स आहेत. जगातल्या नकाशावर असलेल्या कोणत्याही मोठ्या शहरावर बोट ठेवा, मोईन कुरेशी तिथे पोहचला आहेच. इतकी सारी खास माणसं राखणं सोपं काम नाही. पण मोईन कुरेशी त्याच्या दिलदार स्वभावचं प्रदर्शन करून त्यांचं इमान विकत घेतो. मध्यंतरीच्या काळात दिवाळीच्या निमित्ताने त्याने सगळ्यांना रोलेक्स घड्याळं वाटली होती.

कुरेशीचा हायप्रोफाईल मित्रपरिवार- कुरेशीचे सगळेच मित्र होते. उदाहरणार्थ, शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर पोलीसांनी सुनंदा-मोईनच्या ब्लॅकबेरी मेसेंजरवरचे टेक्स्ट मेसेज हस्तगत केले. त्यातले अनेक मेसेज मोईन कुरेशी आणि सुनंदा पुष्कर यांची ओळख किती जवळची होती ते दाखवतात.  आयपीएलच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर तर हे मेसेज फारच महत्वाचे आहेत असे पोलीसांना वाटते.

सुनंदा पुष्कर यांचा पहिला निरोप : १७ मार्च २०१३ “Is everything okay in your factory? We missed you. But having another dinner, do come."

(शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर)

सुनंदाचा दुसरा मेसेज :

“Hey Naveen, Shashi and I would be delighted if you would join us for dinner at our home, 97, Lodhi Estate,  Naveen  at 8:30 pm on Wednesday. A chance to be convivial before Parliament recess, Love Sunanda.” (इथं उल्लेखलेले नवीन म्हणजे बहुतेक नवीन जिंदल हे उद्योगपती असावेत ??) 

कुरेशीचा शेवटचा टेक्स्ट मेसेज आणि सुनंदा पुष्कर यांचे उत्तरः २ ऑगस्ट २०१३

“Hope will see you both for dinner at 9 pm at 4 Oak drive.”  
Sunanda replied, “Yes, darling see you.”

या सर्व निरोपानिरोपीचा अर्थ लावण्याचे काम पोलीस करत असतीलच. इथे हे सांगायचा उद्देश मोईन कुरेशीचे संबंध किती उच्च पातळीवर होते हे सांगण्याचा आहे.

अटक, सरकारी गोंधळ आणि मोईनचे पलायन-

यानंतर मोईन कुरेशीला अटक झाली. न्यायालयात खटले उभे राहिले. साक्षी पुराव्यांच्या जंत्र्या सादर झाल्या, इडीमार्फत 'लूक आउट' नोटीस जारी करण्यात आली. कुरेशी केवळ जामीनावर सुटण्यात यशस्वी झाला. एव्हढेच नव्हे तर देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला!!!

१५ ऑक्टोबर २०१६ रोजी दिल्ली विमानतळावर मोईन कुरेशीच्या कथेला सगळ्यात नाट्यमय वळण लागले. मोईन कुरेशी दुबईला जाण्याचा प्रयत्न करत असताना 'इमिग्रेशन' काउंटरवर त्याला दुबईला जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. इडीच्या 'लूक आउट' नोटीसनुसार देशाबाहेर जाण्याची परवानगी त्याला नवहती. चलाख आणि धूर्त मोईन कुरेशीने आयकर खात्याने दाखल केलेल्या खटल्यातील कागदपत्र दाखवून 'ना  हरकत' असल्याचे निदर्शनास  आणून दिले. लूक आउट नोटीस इडीची आणि ना हरकत आयकर खात्याची असा गोलमाल करून मोईन कुरेशी दुबईकडे रवाना झाला. हा गोंधळ झाला कसा हे समजून घेण्यासाठी इडीचे अधिकारी पोहचले, तोपर्यंत कुरेशी दुबई इमीग्रेशन पार करून बाहेर पडला होता.

आजच्या तारखेस खटले चालूच आहेत. नवीन साक्षीदार उभे केले जात आहेत. सुरुवातीला सतीश साना या व्यापार्‍याला इडीने साक्षीदार म्हणून उभे केले होते, त्याला दोन आठवड्यांपूर्वी आरोपी बनवून तुरुंगात पाठवण्यात आले.  पण 'डॉन' कधीच न येण्यासाठी बाहेर पडला आहे आणि 'ग्यारा मुल्कोंकी पुलिस' हात चोळत भारतात बसली आहे.

 

आणखी वाचा :

काळा पैसा इकडून तिकडे करणारा हवाला असा चालतो ??