computer

डिजिटल युगात नव्याने आलेले ई-रुपी काय आहे? ई-रुपी कुठे आणि कसे वापरता येईल?

डिजिटल व्यवहार वापरण्याचा कल आजकाल सगळीकडे दिसतो. भारतात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आज ‘ई-रुपी'(e-RUPI) नावाची इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर आधारित डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू झाली आहे. जसे इतर गिफ्ट व्हाउचर आपण redeem म्हणजेच वसूल करतो, तसे हे इलेक्ट्रॉनिक व्हाउचर redeem करता येणार आहेत. कॅशलेस व्यवहार वाढण्यासाठी हे नक्कीच उपयोगी पडेल. आज समजून घेऊयात हे e-RUPI आहे काय? याची सविस्तर माहिती वाचून घ्या.

हा e-RUPI प्लॅटफॉर्म सरकारने विकसित केला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.

ई-रुपी(e-RUPI) हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम असेल जे लाभार्थीच्या मोबाईल फोनमध्ये एसएमएस-स्ट्रिंग किंवा क्यूआर कोडच्या स्वरूपात येईल. हे प्रीपेड गिफ्ट-व्हाउचरसारखे असेल आणि कोणत्याही केंद्रांवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय रिडीम केले जाऊ शकते. यासाठी कोणत्याही फिजिकल इंटरफेसची गरज नाही.

हे व्हाऊचर कसे दिले जातील?

ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे. त्यांनी यात अश्या बँकांची यादी दिली आहे ज्या हे व्हाऊचर जारी करण्याचे काम करतील. कोणत्याही कॉर्पोरेट किंवा सरकारी एजन्सीला हे मिळवायचे असेल तर त्यांना त्या बँकांशी संपर्क साधावा लागेल. या बँका म्हणजे खाजगी किंवा सरकारी दोन्ही असू शकतात. या बँकेकडे व्हाऊचर हवे असेल तर इतर माहितीही द्यावी लागेल. जसे की व्हाउचर कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने घेतली जात आहेत. ज्या व्यक्तीला ई-रुपी व्हाउचर पाठवायचे आहे, त्याची माहिती मोबाईल क्रमांकासह बँकेला द्यावी लागेल. बँक मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधेल आणि माहिती पडताळून त्याच्या मोबाईल क्रमांकावर ई-रुपी व्हाउचर पाठवेल.

ई-रुपी कुठे वापरता येईल?

सरकारी योजनांमध्ये याचा वापर होऊ शकेल. माता आणि बालकल्याण योजनासारख्या कल्याणकारी योजना, क्षयरोग निर्मूलन योजना, तसेच आयुष्यमान भारत, जन आरोग्य योजनांमध्ये पैसे पाठवणे खूप सोपे होईल. खाजगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी या व्यासपीठाचा लाभ घेऊ शकतात. खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अनेकदा सोडेस्को फूड व्हाउचरसारख्या व्हाऊचरद्वारे पैसे देतात. याचा वापर कर्मचारी कोणत्याही ठिकाणी खाण्या-पिण्याचे पैसे देण्यासाठी करतात, तसेच दिवाळी साठीही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट व्हाउचर देतात. ते वापरून कोणतीही वस्तू खरेदी करता येते.

ई-रुपी आणि डिजिटल चलनात काय फरक आहे?

यात sms द्वारे पैसे येतात म्हणून ई-रुपी म्हणजे डिजिटल चलनच आहे असे वाटेल. पण तसे नाही. कारण डिजिटल चलन फक्त सेंट्रल बँक जारी पाठवू शकते जिला सरकारने मान्यता दिली आहे आणि यात व्हाउचर पाठवणारा भारतीय रुपयाचा वापर करतो. भौतिक चलन म्हणजे १० रुपयांची नोट आणि १० रुपयांच्या डिजिटल चलनाचे मूल्य समान असते. फरक एवढाच असेल की डिजिटल चलन कोडच्या स्वरूपात असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल चलन आणण्यावर काम करत आहे. मात्र, त्याचे स्वरूप काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोणत्या बँका ही सेवा देतील?

बँका ई-रुपी वर दोन प्रकारे काम करतील. एक बँक जी ई-रूपी व्हाउचर जारी करतील आणि दुसरी बँक जे त्यांना स्वीकारतील. काही बँका ज्या दोन्ही कामे करु शकतील. सध्या ११ बँका आहेत जे ई-रुपीआय सेवा वापरतील. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी आक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा सारख्या मोठ्या बँका हे व्हाउचर जारी करतात आणि स्वीकारतात. कॅनरा बँक, इंडसइंड बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा आणि युनियन बँक ऑफ इंडिया फक्त जारी करतात पण ई-रूपी व्हाउचर स्वीकारत नाहीत.

ई-रुपी सेवा जगात कुठे वापरली जाते?

ई-रुपी सारखे व्हाउचर अनेक देशांमध्ये वापरले जात आहेत. अमेरिकेत सरकार गरजू मुलांच्या पालकांना शिक्षणासाठी डिजिटल व्हाउचर जारी करते. म्हणजे जर फी जमा करायची असेल तर सरकार त्याचे व्हाउचर पाठवते. कॉपी-बुक आणि स्टेशनरी इत्यादी खरेदीसाठी स्वतंत्र व्हाउचर पाठवले जाते. आवश्यकतेनुसार व्हाउचर उपलब्ध करून दिले जातात. अमेरिकेशिवाय, कोलंबिया, चिली, स्वीडन, हाँगकाँग इत्यादी देशांमध्ये अशा शालेय व्हाउचर दिले जातात.

भारतात ही प्रणाली कुठे सुरू होईल हे पहावे लागेल. यात काही त्रुटी आहेत का याचाही अभ्यास केला जाईल. पण पैसे पाठवण्यापेक्षा त्या सेवांसाठीच ते पैसे वापरले जातील याची माहिती होणे सोपे होईल. तसेच लाभार्थी कोणत्याही कार्ड, पेमेंट ॲप,इंटरनेट बँकिंगशिवाय हे वापरू शकणार आहेत. तसेच भविष्यात याचा कसा वापर होणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required