computer

रस्त्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला धडा शिकवणाऱ्या भावनाने काय धाडस केलं हे वाचलंत का?

आजही महिलांना सगळीकडे सन्मान दिला जातोच असे दिसत नाही. सन्मान जाऊदे, पण निदान ती एक माणूस आहे अशी वागणूक तरी अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. पेपर, टिव्हीत रोजच्या बातम्यांमध्ये कितीतरी बातम्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या असतात. लैंगिक अत्याचाराची दररोज ८८ प्रकरणं नोंदवली जातात. पण या व्यतिरिक्त जी प्रकरणं नोंदवलीच जात नाहीत त्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. बसमध्ये, लोकलमध्ये किंवा रोजच्या प्रवासात किळसवाणे स्पर्श अनुभवले नसतील अशा मुली, स्त्रिया नसतीलच. पण जागच्या जागी अश्या पुरुषांना धडा शिकवणाऱ्या किती जणी आहेत? आज अशीच घटना बघूयात, जी पाहिल्यावर त्या मुलीला शाब्बास म्हणवासं वाटेल. तिच्या धाडसाचं कौतुक करावसं वाटेल.

आसामच्या गुवाहाटी येथे भावना कश्यप ही तरुणी रोजच्या रस्त्याने चालत जात होती. त्याचवेळेला एक हेल्मेट घातलेला एक तरुण त्याच्या स्कुटरवरून समोरुन आला. तिला "सिनाकी मार्ग कोठे आहे?" असं विचारतो. तो पत्ता माहिती नसल्याने ती त्याला, "मला माहित नाही, तुम्ही अजून कोणालातरी विचारा" असं सांगते. पण यानंतर त्या तरुणाने जे केलं ते इतकं धक्कादायक होतं की त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या तरुणाने भावनाच्या जवळ येऊन तिचे स्तन पकडले व तिला जवळ ओढले. साहजिकच भावना क्षणभर हादरली. या अनपेक्षित कृतीने ती प्रचंड संतापली. तो तरुण पळून जाणार इतक्यात तिने त्याच्या गाडीचे मागचे चाक पकडले आणि गाडीसह त्या तरुणाला गटारात ढकलून दिले.

त्या तरुणाने खूप जोर लावून पळून जायचा प्रयत्न केला पण भावनाने सगळी शक्ती एकवटून त्या गाडीचे मागचे चाक धरून ठेवले. त्यामुळे त्याला गाडी पुढे नेता येईना. त्या झटापटीत तिने गटाराजवळ गाडी आल्याचे पाहताच गाडी ढकलली आणि ती गाडी गटारात पडली. तो तरुण त्यामुळे तिथेच अडकला. भावना एवढंच करून थांबली नाही, तिने आरडाओरडा करून त्याला जाब विचारला. त्यांचा आवाज ऐकून तिथून जात असलेले अनेक लोक थांबले, तिने त्यांना काय घडले याची माहिती दिली. तिने फेसबुकवरही तिच्यासोबत जे घडलं याची माहिती दिली. त्याचा चेहरा सर्वांसमोर आणण्याच्या तिने प्रयत्न केला.

अशा प्रसंगी मदत करण्याआधी लोक जे करतात, ते काहीजणांनी केलेच. एकाने याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला. या व्हिडिओमध्ये भावना आणि इतर लोक त्या निर्लज्ज तरुणावर ओरडताना दिसत आहेत. भावनाने त्याला मास्क काढायला लावला. जेणेकरून प्रत्येकजण त्याचा चेहरा पाहू शकेल. त्याने माफी मागितली आणि लोकांकडून त्याची स्कूटर नाल्यातून बाहेर काढण्यासाठी मदत मागितली, पण सगळ्याणी त्याला नकार दिला.

पोलिसांना फोन झाल्यावर काहीवेळातच आसाम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या तरुणाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. भावना म्हणते, " माझ्यात अचानक आलेली हिंमत बघून अनेकजण अवाक झाले, पण ही चीड अनेक दिवसांपासून माझ्या मनात आहे. दिल्लीत असे अनेक क्लेशकारक अनुभव मला आणि माझ्या मैत्रिणींना आलेले आहेत, पण त्याची नोंद कुठेही झाली नाही. असे गुन्हेगार वेळेतच ठेचले तर त्यांची पुन्हा हिंमत होणार नाही"

भावनाने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली याबद्दल तिचे कौतुक होत आहे. पण खरा प्रश्न हा आहे की, स्त्रियांना पाहण्याची अशी विकृत मानसिकता कधी बदलेल?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required