computer

कबाबचा शोध कुठे लागला? कबाबचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल !

कबाब म्हटले म्हणजे खवय्ये मंडळीच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. बनवायला सोपा, कुठेही न्यायला सोपा तसेच तब्येतीसाठी पण चांगला असा हा पदार्थ आहे. टुंडा कबाब, हरियाली कबाब, दगडी कबाब, शाही कबाब असे कित्येक प्रकारचे कबाब देशाच्या वेगवेगळ्या भागात तयार केले जातात. फक्त भारतच नाही, तर कबाब जगभर प्रसिद्ध आहे. सध्या कबाब कितीही प्रसिद्ध असले आणि कबाबचे नवनविन प्रकार येत असले तरी कबाबचा इतिहास पण तितकाच रंजक आहे मंडळी!!!

तुम्हाला वाटत असेल कबाबचा शोध भारतात लागला असेल.  पण नाही, कबाबचा शोध टर्की किंवा तुर्कस्तानात लागला आहे. इब्न बतुता तुम्हाला माहित असेलच.  हा मोरक्कोचा प्रवासी इसवी सन १२०० च्या सुमारास भारतात फिरायला आला होता. तर त्याने तेव्हापासून भारतात कबाब होते हे लिहून ठेवले आहे.

तुर्की भाषेत कबाबला कबिबा म्हणतात.  म्हणजेच पाणी न वापरता शिजवलेले मांस. पण भारत आणि इतर देशात याला सुरुवातीपासूनच कबाब म्हटले जाते. एक कथा अशी सांगितली जाते की तुर्की सैनिक मांस पुरायला हवे म्हणून तलवारीवर मांस भाजून त्याला वेगवेगळे मसाले लावून खायचे. याचा उल्लेख १३७७ मध्ये लिहिल्या गेलेल्या कैसा-ए-यूसुफ या पुस्तकातसुद्धा आहे. कबाबचा उल्लेख असलेला हा सर्वात जुना पुरावा मानला जातो. हा पदार्थ मग शौकीन खवय्यांमुळे जगभर पसरला. 

चंगेज खानसुद्धा कबाबचा चाहता होता. इतिहासकार सांगतात की जेव्हा केव्हा चंगेज खान युद्धावर जायचा, तेव्हा त्याच्या बायका सैनिकांसाठी मांसाचे पदार्थ बनवून सोबत पाठवत असत. युद्धादरम्यान मग सगळे सैनिक तलवारीवर भाजून ते मांस खायचे. चंगेज खान सैनिक जे खायचे तेच खात असल्यामुळे तो पण तेच खायचा. तलवारीच्या जोरावर चंगेज खानने जग जिंकले म्हटले जाते, पण त्यात कबाबचाही वाटा होता हे मान्य करावे लागेल.  

१६ व्या शतकात मुमताज महलचा मुलगा औरंगजेबने गोवळकोंडयाचा किल्ला जिंकल्याच्या आनंदात सैनिकांसाठी कबाब बनवले होते. पण यावेळी कबाब तलवारीवर भाजून न बनवता ते ग्रॅनाइटच्या दगडावर भाजून बनवण्यात आले होते. या कबाबलाच मग शाही कबाब म्हटले जाऊ लागले. आणि अशा पद्धतीने कबाब भारताच्या स्वयंपाक घरात शिरला.

(शाही कबाब)

१७ व्या शतकातील लखनऊचा नवाब ‘असफ उदौला’ याला कबाब फार आवडायचे पण वयोमान आणि आरोग्यामुळे त्याचे दात कमजोर झाले. दात कमजोर झाले म्हणजे चावता येणार नाही आणि चावता आलं नाही तर कबाब कसे खाणार ? म्हणून असफ उद्दौलाने एक स्पर्धा भरवली. त्यात सांगण्यात आलं की नावाबासाठी असे कबाब बनवण्यात यावेत की ज्यांना चावण्याची गरज पडणार नाही. या स्पर्धेतून जन्म झाला गिलौटी कबाबचा जो टुंडे कबाब म्हणूनही प्रसिद्ध आहे...

हा संपूर्ण इतिहास आमच्या या लेखात वाचा:

नबाब के कबाब : लखनऊचे प्रसिद्ध टुंडे कबाब आणि त्या मागचा गमतीशीर इतिहास !!!

(गिलौटी कबाब / टुंडे कबाब)

बाकी जगभर मांसाहारी कबाब बनतील, पण भारतात प्रत्येक पदार्थासाठी शाकाहारीच काय, पण जैन हासुद्धा पर्याय लोकांना लागतो. त्यामुळं भाजी आणि पनीर वापरुन केलेले कबाबही लोकांना प्रचंड आवडतात.  ज्यात हरयाली कबाब, पनीर टिक्का, दही कबाब खाल्लेच असतील ना तुम्ही? 

थोडक्यात काय, मांसाहारी कबाब तुर्कस्तानातून जगभर पोचला असला तरी शाकाहारी कबाबचा शोध भारतातच लागला आहे. खरंकी नाही?

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required