दुचाकीपुराण: ९० च्या पिढीचा नॉस्टॅल्जिया.. सर्वच बाबतीत पुढे असलेली राजदूत मागे का पडली?

आपल्या आधुनिक जगात रोजच्या रोज नवनवे शोध समोर येत राहतात. वस्तू तीच असली तरी तिचे रूप, क्षमता.. बरंच काही बदलतं. मोटारसायकलीही त्याला अपवाद नाहीत.  

बाईकप्रेमी मंडळींसाठी अत्याधुनिक फीचर्स सहित बाईक्स येत आहेत. बाईक्सचे शेकडो प्रकार आणि ढिगाने त्यात असलेल्या नवनव्या गोष्टी यांनी या बाईक्सचं रंगरूपही बदलत आहे. आजचे जगच अत्याधिक तंत्रज्ञानाचे असल्याने यात काहीही विशेष नाही. तरीही जुन्या काळातील बाईक्सचे आकर्षण मात्र आजही कमी होत नाही. कधीकाळी लोकांच्या मनावर राज्य केले होते, पण सध्या विस्मरणात जात आहेत अशा बाईक्सची आम्ही तुम्हांला पुन्हा आठवण करून देणार आहोत. सुरुवात आपण अर्थातच राजदूतपासून करणार आहोत. 

आज बुलेटची हवा असली तरी कधीकाळी बुलेट जवळपास फिरकणार नाही अशी लोकप्रियता राजदूतकडे होती. या राजदूतचा प्रवास आजच्या लेखात जाणून घेऊया...

८०-९० च्या दशकात प्रत्येकाचे स्वप्न म्हणजे आपल्या अंगणात राजदूत लागलेली दिसली पाहिजे हेच असायचे. मोठे शहर ते छोटे खेडे.. प्रत्येक ठिकाणी अशी एखादी राजदूत दिसायचीच. त्या राजदूत मालकाचा भावदेखील ही मोटारसायकल अंगणात आल्यावर वधारायचा.. कदाचित राजदूतच्या आवाजानेच मोटारसायकलचे नामकरण 'फटफटी' असे केले असावे. 

Image

भारतात राजदूतचा प्रवास सुरु झाला १९६२ साली. देशातील पहिली राजदूत म्हणजे राजदूत १७५!! एस्कॉर्ट्स नावाच्या कंपनीने ही मोटारसायकल तयार करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला या मोटारसायकलच नाव XLT असे होते. तो काळ बुलेटकडे बाईक मार्केट असण्याचा होता. बुलेटला टक्कर देणे सोपे नव्हते. पोलंडच्या SHL M11 या मोटारसायकल पासून प्रेरणा घेत भारतीय रस्ते आणि लोकांची आवड यानुसार तयार करून ही गाडी बाजारात आणली. 

१७५ सीसी असलेली ही राजदूत मजबूत होती. इतर बाईक्सच्या तुलनेत तशी आपली ही राजदूत देखील एकाच वेळी मजबूत आणि स्टायलिश होती. पण प्रस्थापित बुलेटला टक्कर देणे म्हणजे सोपे काम नव्हते. राजदूतची विक्री रडतपडत सुरू होती. पण १९७३ साली ऋषी कपूरचा बॉबी सिनेमा आला आणि ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियासोबत राजदूतचेही नशीब बदलले.  

बॉबीमध्ये ऋषी कपूर राजदूतवर फिरताना लोकांनी बघितले आणि बॉबी आणि राजदूत दोन्ही सुपरहिट ठरले. बॉबी आल्यावर लोकांनी राजदूत १७५ खरेदी करायला सुरुवात केली आणि माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून राजदूतची विक्री सुसाट व्हायला लागली. म्हणतात ना, क्वालिटीला मरण नसते. दिवसेंदिवस राजदूतची विक्री आणि लोकप्रियता दोन्ही जोरात वाढत होती.

याच काळात इतर अनेक कंपन्यांनी आपापल्या बाइक्स नवनवे फीचर्स टाकून बाजारात आणल्या आणि लोकांना राजदूतबद्दलची ओढ कमी व्हायला लागली. याचे मुख्य कारण म्हणजे राजदूतमध्ये होत नसलेला बदल हे ही होते. 1972 साली सुपरहिट ठरलेली राजदूत पुढच्या दहा वर्षांत मात्र मार्केटमधून गायब व्हायला सुरुवात झाली. कंपनीला एक गोष्ट कळून चुकली होती, लोकांना नवे काहीतरी पाहिजे. म्हणून कंपनीने राजदूत 175 चे प्रॉडक्शन बंद केले.

Image

आता कंपनीने यामाहा कंपनीच्या साथीने नव्या पद्धतीची बाईक - राजदूत 350 बाजारात आणली. यामाहाची आरडी 350 बाईकची लायसन्स कॉपी म्हणून राजदूत 350 ओळखली जात होती. राजदूत 350 हिट झाली तशी तिची टक्कर बुलेट 350 बरोबर सुरू झाली. पण राजदूत विचारपूर्वक तयार करण्यात आली होती. मजबुतीच्या बाबतीत बुलेट इतकीच तगडी असलेली राजदूत वजनाच्या बाबतीत मात्र बुलेटपेक्षा हलकी होती. तर परफॉर्मन्स आणि मायलेज बुलेटपेक्षा चांगला होता. तरुणांना आवडणारा पिकअप आणि वेग दोघांच्या बाबतीत राजदूत सरस ठरत होती. ६ स्पीड गियरवाली राजदूत ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ७ सेकंदात गाठत होती, तर तिचा टॉप स्पीड १५०/तास होता. भारतीय युवा मनावर राजदूत त्याकाळी अधिराज्य गाजवत होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Image

आपल्या आठवणीत असणारा राजदूतचा सुवर्णकाळ हाच होता. राजदूची लोकप्रियता इतकी होती की इतर सर्व बाइक्स मिळून देखील तिच्या जवळपास सुद्धा टिकत नव्हत्या. राजदूतचा खप बुलेटपेक्षा बराच पुढे निघून गेला होता. राजदूतची विशेषता म्हणजे शहरातले रस्ते असो वा खेड्यातले कच्चे रस्ते.. सर्वच ठिकाणी राजदूत दणक्यात चालत होती. राजदूतच्या दणकटपणामुळे चालवण्याला पण एक आत्मविश्वास वाटत असे. 

मायलेज, परफॉर्मन्स, पिकप, मजबुती, लुक्स अशी एक एकही गोष्ट नव्हती ज्याच्यात राजदूत मागे होती. एक वेळ तर अशा आली की सरकारने अधिकृतरित्या आपले कृषी कर्मचारी आणि अधिकारी यांना देण्यासाठी राजदूतची निवड केली. कारण राजदूत सर्वच ठिकाणी आरामात पोहोचू शकत होती. खेड्यातल्या लोकांसाठी तर राजदूत म्हणजे सोबती झाली होती. दूध वाहून नेणाऱ्या लोकांसाठी राजदूत अतिशय सोयीची होती. कारण कितीही वजन भरलेले कंटेनर असले तरी राजदूत व्यवस्थित निश्चित ठिकाणी घेऊन जात असे. 

वयात येत असताना तरुणांचे स्वप्न म्हणजे आपल्याकडे राजदूत बाईक असावी. आजही अनेकांना पहिली बाईक कुठली असे विचारले तर त्यांचे उत्तर राजदूत असेच असते. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल धोनी याचीही राजदूत पहिली बाईक होती. पण जे नोकियाचे झाले तेच राजदूतचे पुढे झाले. जागतिकीकरणानंतर अनेक परदेशी प्रोडक्टस् भारतात आले. त्यात बाईक्सही होत्या. 

राजदूतचे सर्वात जास्त मार्केट खाल्ले ते यामाहा RX 100 ने. नंतर Hero Honda CT 100, सुझुकी सुमाराई यांच्या समोर राजदूत तग धरू शकली नाही. तब्बल १० वर्ष काहीही बदल न करण्याचा फटका राजदूतला बसला. तसेच इतर बाईक्सच्या तुलनेत राजदूतचे स्पेअर पार्टस महाग होते. ज्या वेगाने राजदूत लोकप्रिय झाली त्याच वेगाने तिची विक्रीही कमी झाली. शेवटी कंपनीने राजदूतचे प्रॉडक्शन बंद केले.

Image

राजदूत जरी भूतकाळ झाली असली तरी आपल्या अनेकांच्या भूतकाळाचा सोबती म्हणून ती आठवणीत आहे. आजही कुठे राजदूत लावलेली असली की आपल्याला आपला जुना काळ आठवतो. राजदूत ही खऱ्या अर्थाने ९० च्या पिढीचा नॉस्टॅल्जिया आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required