श्रीमंतीचे प्रतिक, दैवीशक्तीबद्दलची वल्गना ते आजचे टेबलक्लॉथ्स-नॅपकीन्सची जोडी!! टेबलक्लॉथ्सचा हा सारा इतिहास जाणून घ्यायलाच हवा!!
हॉटेल मध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही तिथले वातावरण, स्वच्छता, सुगंध, टेबलची ठेवण, त्यावरील डिझाईन, टेबलक्लॉथ अशा बारीकसारीक गोष्टींची दाखल घेता, की फक्त जेवणावर ताव मारणे इतकंच तुमच्या डोक्यात असतं?
फक्त जेवणावर ताव मारणे सोडून जर आजूबाजूच्या गोष्टींची नोंद घेण्यात रस घेत असाल तर तुम्ही टेबलवरील टेबलक्लॉथकडे कधी बारकाईने पाहिलं आहे का? टेबलावर टेबलक्लॉथ वापरण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली असेल? टेबलक्लॉथचा पहिल्यांदा वापर कधी, कुठे आणि कुणी केला असेल याबद्दल काही माहिती घेण्याचा कधी तुम्ही प्रयत्न केला आहे का? तसे असेल तर तुमचा हा शोध इथे संपतो. कारण, आज आम्ही खास आमच्या वाचकांसाठी हा टेबलक्लॉथचा इतिहास इथे देत आहोत. टेबलक्लॉथची सुरुवात कशी झाली इथपासून ते कुठकुठल्या टप्प्यावर त्यात कसकसे बदल होत गेले, याची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.
जेवताना अनेकदा सांडलवंड तर होतेच, पण आमटी-भाजीतील तेल जर टेबलवर सांडले तर त्याचे डाग काढणे अवघड होऊन बसते. टेबल स्वच्छ राहावा, काही सांडासांडी झाली तरी टेबलवर त्याचा काही परिणाम होऊ नये याच उद्देशाने टेबलक्लॉथ वापरण्यास सुरूवात झाली. स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय जागरूक असणाऱ्या व्यक्तीलाच अशी भन्नाट कल्पना सुचू शकते.
मध्ययुगीन काळात शाही लोक जेव्हा मेजवानी देत असत तेव्हा त्यांच्या टेबलवर लिननचे पांढरेशुभ्र कापड अंथरले जाई. पांढरा रंग हा प्रसन्नतेचा आणि समृद्धीचा प्रतिक आहे. या टेबलवरील कपड्याची शुभ्रता आणि यजमानांचा मोठेपणा यांचे सरळ गुणोत्तर होते. जितके शुभ्र कापड टेबलावर अंथरले जाईल तितके ते यजमान भारी, असे सूत्र त्याकाळी रूढ झाले होते. अर्थात टेबलक्लॉथची ही परंपरा तेव्हा फक्त शाही घराण्यांपुरतीच मर्यादित होती. त्यांचा अजून सर्वसामान्यांसाठी वापर निषिद्धच होता.
पण अगदी सुरूवातीला टेबलक्लॉथचा वापर कुणी केला असेल? १०३ साली मार्शल नावाच्या एका कवीच्या लेखनात या टेबलक्लॉथचा उल्लेख केलेला आढळून येतो. म्हणजेच या टेबलक्लॉथला सुमारे २००० पेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आहे. टेबलक्लॉथसारख्या छोट्याशा वस्तूला इतका प्रदीर्घ इतिहास असेल याचा विचार आपण स्वप्नातही कधी केला नसेल. याचाच अर्थ युरोपात तरी अगदी पहिल्या शतकापासून टेबलक्लॉथने आपले अस्तित्व कायम राखले आहे. याच्याही आधी रोमन सम्राट नक्षीकाम केलेले, सजवलेले टेबलक्लॉथ वापरण्याला प्राधान्य देत असत असाही उल्लेख आढळतो. पण अगदी सुरुवातीला वापरले गेलेले टेबलक्लॉथ्स मात्र अगदी साधे, पांढरे आणि प्लेनच असत. ज्यांचा उद्देश फक्त टेबलवर जास्त पसारा होऊ नये हाच होता.
आठव्या शतकात होऊन गेलेला रोमन सम्राट चार्लमॅग्ने हा ऑस्बेटॉस या खास ज्वलनरोधी धातूपासून बनवलेला टेबलक्लॉथ वापरत असे. त्याच्याकडे जेव्हा इतर बर्बेरीयन राजे येत तेव्हा मेजवानीनंतर चार्लमॅग्ने हा टेबलक्लॉथ आगीत टाकून देई. पण अग्निरोधक धातूपासून बनवलेला हा टेबलक्लॉथ जळत नसे. हे पाहून त्या राजांचे डोळे दिपून जात. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत चार्लमॅग्ने त्यांना असा विश्वास देत असे की, त्याच्याकडे असलेल्या खास दैवीशक्तीमुळेच आगीत फेकलेला हा टेबलक्लॉथ जाळू शकत नाही. त्याची ही वल्गना ऐकून इतर राजे त्याला शरण येत. म्हणजेच आपली सर्वोच्च सत्ता अबाधित राखण्यासाठीही टेबलक्लॉथसारख्या एका मामुली वस्तूचा आधार कसा घेतला जात होता हे पाहून आश्चर्यही वाटते आणि हसूही येते.
मध्ययुगीनकाळात राजे-राजवाडे आणि सरंजामदार घराण्यातून याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. गरिबांना काही त्याकाळी टेबलक्लॉथ विकत घेणे परवडत नसले तरी घरातीलच एखाद्या जुन्या कपड्याचा वापर ते टेबलक्लॉथ म्हणून करत असत. शाही घराण्यासाठी मात्र याचे काही नियम होते. शाही घराण्यातून लिननचे पांढरे शुभ्र कापडच टेबलक्लॉथ म्हणून वापरला जात असे. तुमचा दर्जा जितका वरचा तितकीच तुमच्या टेबलक्लॉथची शुभ्रताही अधिक, असाही एक अलिखित नियम याकाळी तयार झाला होता.
शुभ्र आणि स्वच्छ टेबलक्लॉथमधून जणू (लिननचे कापड घेण्यासाठी) माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि तो स्वच्छ ठेवण्यासाठी पुष्कळ नोकरही आहेत अशीच एक बढाई त्या टेबलक्लॉथ धून झळकत असे. कारण त्याकाळी लिनन ही अतिशय महागड्या सदरात मोडणारी वस्तू होती. आपापला बडेजाव आणि थाट दाखवण्यासाठी त्याकाळी शाही घराण्यात प्रचंड चढाओढ लागत असे. मेजवानीपूर्वी टेबल सजवण्यासाठी आणि मेजवानीनंतर टेबल आवरण्यासाठीही म्हणून खास नोकर ठेवले जात असत. त्यांनतर मेन टेबलक्लॉथवर सुंदर आवरण म्हणून सरनॅप्स वापरण्याची प्रथा सुरू झाली. हे सरनॅप्स अतिशय सुंदर कलाकुसर केलेले असत. यांच्या काठांना लेस किंवा एम्ब्रॉयडरी केलेली असे. असा हा सगळा दिखावा मांडण्यासाठी खास नोकर तर लागणारच ना!
व्हिक्टोरियन काळात तर या टेबलक्लॉथनी आणखी फॅन्सी रूप धारण केले. त्याकाळी फक्त टेबल झाकण्यासाठीच नाही, तर टेबलाचे पाय झाकून जावेत म्हणून चारी बाजूंनी खालीपर्यंत लोळणारे टेबलक्लॉथ वापरण्याची प्रथा सुरु झाली होती. या काळात औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यामुळेही इतर क्षेत्राप्रमाणेच टेबलक्लॉथमध्येही बरेच बदल होत गेले. याच काळात सिंथेटिक डाय वापरण्याला जास्त प्राधान्य मिळाल्याने टेबलक्लॉथमध्ये नवनवे प्रकार रुजू झाले.
जी गोष्ट टेबलक्लॉथची तीच नॅपकीनची देखील. टेबलक्लॉथ सोबतच यांचाही प्रवास सुरू झाला. रोमन काळातच अनेक सम्राट जेवताना आणि जेवणानंतर हात साफ करण्यासाठी याचा वापर करू लागले. टेबलक्लॉथ आणि नॅपकीनची जोडी तेव्हापासूनच अतूट आहे. १५ व्या आणि १६व्या शतकात तर नॅपकीन्सचा वापर देखील स्टेटस सिम्बॉल म्हणून केला जाऊ लागला. त्याकाळी नॅपकीन्स वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकीन्स वापरले जात असत.
पूर्वी जेवताना फोर्क वापरले जात नसत त्याकाळी नॅपकीन्स आकाराने मोठे असत. फोर्क्सचा वापर सुरू झाल्यानंतर नॅपकीन्स आकाराने छोटे होत गेले. १९ व्या शतकात तर सरंजामदार आणि शाही परिवारांनी नॅपकीन्सचा वापर कसा करायचा, तो कुठे कशा पद्धतीने ठेवायचा याचे काही नियमच घालून दिले. आजही हे नियम त्याच पद्धतीने पाळले जातात. टेबल सेटअपचा तो एक औपचारिक भागच बनून गेला आहे. टेबल मॅनर्समध्ये जेवणापूर्वी, जेवताना आणि जेवणानंतर नॅपकीन्सचा वापर कसा करायचा याला फार महत्त्व आहे.
आजच्या काळात टेबलक्लॉथ आणि नॅपकीन्स यांचा वापर रोजच्या रोज करणे थोडेसे अडचणीचेच झाले आहे. वाढत्या कामांच्या यादीत टेबलक्लॉथ बदलणे, ते स्वच्छ करणे हे एक आगाऊ काम नको वाटते. पण तुमच्या घरी जर अजूनही टेबलक्लॉथ आणि नॅपकीन्स वापरण्याची पद्धत असेल तर हा वारसा तुम्हाला थेट शाही घराण्यांकडून मिळाला आहे, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला टेबलक्लॉथ वापरणे कितपत सोयीचे वाटते? तेही कमेंट करून सांगायला विसरू नका.
मेघश्री श्रेष्ठी




