देशाचा जीडीपी काय असतो आणि तो मोजण्याच्या विविध पद्धतीही जाणून घ्या!!
भारताचे वार्षिक बजेट नुकतेच मांडण्यात आले आहे. बजेट मांडल्यावर किंवा असेही वर्षभर सतत कानावर येणारा शब्द म्हणजे जीडीपी!! जीडीपी कमी असला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मंद, आहे तर जीडीपी जास्त असला तर अर्थव्यवस्था चांगली आहे एवढे तर जवळपास प्रत्येकाला माहीत आहे. पण जीडीपी हा काय इतका लहान विषय नाही तो व्यवस्थित समजून घ्यावा लागेल.
जीडीपीचा फुल फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच स्थूल राष्ट्रवादी उत्पन्न. एका वर्षाच्या कालावधीत देशात तयार होणाऱ्या सर्व सामान आणि वस्तूंची एकूण किंमतीला जीडीपी म्हटले जात असते. अजून सोप्या शब्दात सांगायचे तर एखादा विद्यार्थी अभ्यासात कसा आहे हे त्याला वर्षाच्या शेवटी जे मार्कशीट मिळते त्यावरून तो कुठल्या विषयात किती पारंगत आहे आणि त्याला एकूण मार्क किती आहेत हे समजते.
अगदी तसेच वर्षाच्या शेवटी अर्थव्यवस्था कशी आहे हे देशभरातील विविध क्षेत्रांचा अभ्यास करून समजत असते. भारतात जीडीपी मोजणारी संस्था सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस आहे. वर्षाला चार वेळा जीडीपी मोजला जात असते. वर्षाला हे वाढीचे आकडे जे आपल्यासमोर येतात, त्यातील आधीच्या वर्षी झालेली वाढ आणि चालू वर्षातील वाढ यांची तुलना करून अर्थव्यवस्थेत असलेली वृध्दी काढली जाते.
जीडीपीच्या माध्यमातून वर्षभराच्या काळात देशाच्या आर्थिक विकास आणि वृद्धीचा अंदाज येत असतो. जीडीपीची मोजणी ही तीन पद्धतींनी केली जाते. राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय खर्च या पद्धतीच्या माध्यमातून जीडीपी मोजला जातो.
राष्ट्रीय उत्पादनावरून जीडीपी मोजली जाण्याची पद्धत म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातील वस्तू आणि सेवांची अंतिम किंमत हा देशाचा जीडीपी समजला जातो. उदा. एखादा टीव्ही बाजारात येण्यापूर्वी अनेक प्रोसेसमधून जात असतो. तर या पद्धतीत टीव्ही बाजारात आल्यानंतरची किंमत ग्राह्य धरली जाते. अशा पध्दतीने देशभर सर्व वस्तूंची किंमत मोजली जाते.
दुसरी पद्धत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. यात देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे वर्षाच्या शेवटी जे एकूण उत्पन्न असते, त्या सर्वांची बेरीज केली जाते. यात सामान्य कामगार ते मोठे उद्योगपती या सर्वांचे उत्पन्न मोजले जाते. अशा सर्वांचे उत्पन्न एकत्र करून जो आकडा तयार होतो, त्याला राष्ट्रीय उत्पन्न या पद्धतीतून मोजलेला जिद्दी म्हटला जातो.
राष्ट्रीय खर्च पद्धत. या पध्दतीत देशातील नागरिकांनी वर्षात जो काही खर्च केला असतो त्यांची बेरीज केली जाते. म्हणजेच वर्षाकाठी वस्तू आणि सेवांवर देशाने केलेला एकूण खर्च मोजला जातो. अशा पध्दतीने जीडीपी मोजला जातो. या मोजणीतून समोर येणाऱ्या आकड्यांवरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकाप्रमाणे देशाचे प्रगतीपुस्तक समोर येत असते.
आता देशाचा जीडीपी काय असतो आणि तो कसा मोजतात हे तुम्हांला कळले, पण इतरांना कळण्यासाठी लेख शेअरसुद्धा करा!!
उदय पाटील




