हॅकरचा हल्ला : भाग २ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारू नये म्हणून काय कराल ??

कालच्या लेखात आपण ग्राहकांच्या हक्काची माहिती वाचली. बर्‍याच वेळा असे होते की ग्राहकाच्या चुकीने देखील खात्यावर डल्ला मारला जातो. असे झाले तर काय करायचे ते आज बघू या!!!

१.  प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी कार्ड हरवणे आणि ते लक्षात न येणे. बर्‍याच वेळा एखादे ट्रँजॅक्शन झाल्याचा एसएमएस आल्यावर कळते की आपले कार्ड हरवले आहे. अशा प्रसंगी हेल्प लाईनचा वापर करून कार्डाचा वापर स्थगित करणे हा तातडीचा उपाय  आहे.

वि.सू : आपला कार्ड नंबर (फक्त कार्ड नंबर ) एखाद्या कागदावर लिहून ठेवा. १६ आकडी कार्ड नंबर कधीच स्मरणात राहत नाही. पण त्यासोबत कार्डाच्या मागे लिहिलेला सीव्हीव्ही किंवा कार्ड वापरण्याचा पिन बिल्कुल लिहून ठेवू नका. 

स्रोत

२. एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये बिल देताना एक डिव्हाइस हातात दिला जातो, या डिव्हाइसला स्किमर जोडला असेल तर तुमच्या कार्डाची ड्युप्लीकेट कॉपी तयार केली जाते आणि चोरी केली जाते.
वि.सू. हे क्लोनींग बर्‍याचवेळा हॉटेलमध्येच होते कारण चार पेगची नशा झाल्यावर डिव्हाइस कोणीच चेक करत नाही. तसेच बरेच वेळा वेटर आधी कार्ड घेऊन जातो आणि नंतर पिन विचारायला येतो. कितीही पोट जड झालं असलं तरी अशावेळेस स्वत: चालत मशीनपाशी जा आणि आपला पिन टाका. 

स्रोत

३. "गुड मॉर्नींग सर, मै बँक से बात कर रहा हूं , आपका कार्ड ब्लॉक कर दिया गया है , अगर आप  अनब्लॉक करना चाहते है तो कृपया आपका..." असा कॉल आला तर माहिती न देता फोन  तात्काळ बंद करावा. अशा कॉलला फिशींग कॉल म्हणतात. कितीही त्या लोकांनी फोनवर भीती दाखवली तरी कार्डसंबंधी किंवा तुमच्या संबंधी चकार माहिती त्या व्यक्तीला सांगू नका.

स्रोत

४. बरेचजण आपला पिन नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करतात. काहीजण कार्डाच्या मागेच पिन नंबर लिहून ठेवतात. जन्म तारखेचे पहिले चार क्रमांकच पीन म्हणून वापरतात. हे सर्व उपाय चुकीचे आहेत. बरेचसे वरीष्ठ नागरीक या चुका करतात. 

स्रोत

५. मालवेअरच्या मार्फत डेटा चोरी होणे. यावर उपाय सोपा आहे. असुरक्षीत संकेतास्थळांना भेट देऊ नका. https असं जर वेबसाईट ॲड्रेसच्या आधी लिहिलेले नसेल, तर ती साईट शक्यतो सुरक्षित नसते. 

स्रोत

इतकी काळजी घेतल्यावरही समजा तुमच्या खात्यात घोटाळा झालाच तर काय करायचे हे आपण पुढच्या भागात बघूया !!

 

आणखी वाचा :

हॅकरचा हल्ला - बँकेवर डल्ला : भाग १- आरबीआयची ग्राहक संरक्षण नियमावली

हॅकरचा हल्ला : भाग ३ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारलाच तर काय कराल !!

सबस्क्राईब करा

* indicates required