मॉडेलींग क्षेत्रात काम करायचे आहे ? त्या आधी हे नक्की वाचा !! भाग - २

जर तुम्ही मॉडेलींगमध्ये करीयर करायचं नक्की केलंच असेल तर प्रोफेशनल पोर्टफोलीओ बनवून घेणे ही पहिली पायरी आहे. या कामासाठी ढीगभर एजन्सी उपलब्ध असतात. अनेक नामांकीत फॅशन फोटोग्राफर पोर्टफोलीओ बनवण्याचे काम करतात.
प्रश्न असा पडतो की पोर्टफोलीओ बनवण्यासाठी एजन्सीकडे जावं की नामांकीत फॅशन फोटोग्राफरकडे? या प्रश्नाचं एकच उत्तर नाही - बजेट परवानगी देत असेल तर फॅशन फोटोग्राफरकडे जा आणि बजेट मर्यादीत असेल तर एजन्सीकडे जा! उत्तराची दुसरी बाजू अशी आहे की फॅशन फोटोग्राफर बर्याच वेळा तुम्ही यशस्वी मॉडेल बनण्याची नेमकी शक्यता वर्तवू शकतो. एजन्सी असा विचार करत नाही. भारतातल्या काही अग्रगण्य एजन्सी आणि फॅशन फोटोग्राफर यांची नावं सर्च केल्यावर मिळतीलही, पण त्यांचे प्रोफेशनल चार्जेस काही लाखात जातात. एजन्सीचे फोटोग्राफर त्यतल्या त्यात कमी खर्चात काम करतात. उदाहरण घेऊनच हे बघू या !!
मुकेश खुल्लर -फॅशन फोटोग्राफर
एकूण खर्च - रु. ७००००
मेक अप आणि केश रचनेसह
पाच वेगवेगळ्या वेश्भूषा
एकूण २५ फोटो.(फक्त सॉफ्ट कॉपी)
व्हिडीओ शूटचे १५००० अतिरिक्त
सुरुवातीचे फोटो आणि पोर्टफोलीओ तयार झाला की मोर्चा वळतो एजन्सीकडे ! एजन्सीला भेट देण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना !
प्रत्येक व्यसायात नैतिक आणि अनैतिक वर्तन असणार्या कंपन्या असतात. मॉडेलींगच्या झगमगत्या क्षेत्रात यांचे प्रमाण जरा जास्तच असते. मग चांगली एजन्सी कशी ओळखायची ?
१. चांगली एजन्सी पैशाची अपफ्रंट (काही काम करण्याच्या आधीच) मागणी करत नाही.
२. नामांकीत कंपन्या दिलेले काम पूर्ण झाले की पैसे मागतात.
३. पहिल्याच मुलाखतीत आम्ही तुम्हाला बॉलीवूडपर्यंत नेऊन पोहोचवू असे म्हणणारे लोक १०० टक्के खोटारडे असतात.
४. सर्वात चांगला मार्ग असा की तुमच्या ओळखीत एखादा जाहिरात कंपनीत काम करणारा मित्र असेल, तर त्यांची कंपनी कोणत्या एजन्सीला काम देते त्याची चौकशी करून मग पुढे चला.
५. शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा : प्रत्येक एजन्सीचे खास प्रभावी वैशिष्ट्य असते. एखादी कंपनी फॅशन मॉडेलींगचे जास्त काम करत असते तर दुसरी कमर्शिअल मॉडेलींगची निवड करण्यात हुशार असते. तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाणार आहात त्याप्रमाणे एजन्सीची निवड करावी.
एजन्सीला संपर्क कसा करावा ?
कोणत्याही एजन्सीकडे मुलाखतीची वेळ ठरवूनच जावे. एजन्सी आगांतुकांचे स्वागत करत नाही. जाहिरात हे क्षेत्र असे आहे की या क्षेत्रात कंपन्या "हे खरं म्हणजे कालच हवं होतं" अशा पध्दतीने काम करतात. दिवसभरात प्रत्येक एजन्सीत पंधरावीस उमेदवार वेळ न ठरवता ये जा करतात. त्यांची कमीतकमी शब्दात र्वानगी केली जाते.
आता तुमच्या पहिल्या मुलाखतीकडे येऊ या !
एजन्सीकडे जाताना प्रत्यक्ष शूटींगसाठी गेलो आहोत असा पेहराव नसावा. (पण गबाळ्यासारखेही जाऊ नका.) स्वतःविषयी अतिरिक्त माहिती देऊ नका. मॉडेल कोऑर्डीनेटर जे प्रश्न विचारेल त्याची नेमकी उत्तरे द्या ज्यातून आत्मविश्वास दिसून येईल. या पहिल्याच भेटीत पोर्टफोलीओची मागणी केली जात नाही. तुमचे साधे फोटो म्हणजे हेडशॉट फोटो बघीतले जातात.
मॉडेलींग एजन्सी उमेदवाराची निवड करताना सहज साध्या आणि अकृत्रीम भाव असलेल्या चेहेर्याचे बारीक निरीक्षण करतात.चेहेर्यावरच्या नैसर्गीक वैशिष्ट्यांकडे त्यांचे अधिक लक्ष असते. यासाठी मेक अप केलेला फोटो एजन्सीकडे न पाठवता हलके फाउंडेशन, किंचित मस्कारा याचा वापर करून काढलेला फोटो पाठवा. या फोटोत तुमचे केस शक्यतो मागे बांधलेले असावेत किंवा केस मो़कळे सोडलेले असतील तर ते चेहेर्यावर येणात नाहीत याची काळजी घ्या. तुमचा पोर्टफोलीओ ताबडतोब एजन्सीकडे पाठवण्याची घाई करू नका. नैसर्गिक प्रकाशात, साध्या पार्श्वभूमीवर (प्लेन बॅकग्राउंड) साध्या डिजीटल कॅमेरावर काढलेले फोटो पहिल्या पायरीवर पुरेसे असतात.
फोटो कसे असावेत ? चेहेर्यावर स्मितहास्य दर्शवणारे - दात दिसतील असे आणि दात दिसणार नाहीत असे दोन्ही प्रकारचे फोटो. चेहेर्यावर हास्य नसलेले फोटो, डाव्या उजव्या बाजूने काढलेले साइड प्रोफाइल फोटो, पूर्ण उंची दिसेल असे फोटो पाठवा. गडद रंगाचा टी शर्ट (ज्यामुळे चेहेर्यावरच्या भावांना अधिक महत्व येते आणि जीन्स (ज्यामुळे तुमची देहयष्टी किती प्रमाणबध्द आहे हे कळते) असे कपडे शूटसाठी वापरावेत असे तज्ञ म्हणतात. सेल्फी, समारंभात काढलेले, ऐतिहासिक स्थळी काढलेले अशा प्रकारचे फोटो पाठवू नयेत.
पोर्टफोलीओ कधी मागीतला जातो. ?
तुमच्या योग्य अशी संधी असेल तेव्हा एजन्सी त्यांच्या क्लाएंटला पाठवण्यासाठी त्यांचा पोर्टफोलीओ तयार करते तेव्हा पोर्टफोलीओ मागवून घेतला जातो.
काम मिळेपर्यंत उमेदवारांनी काय करावे ?
अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत पण सगळ्यात महत्वाची अॅक्टीव्हटी म्हणजे नेटवर्कींग !! मॉडेलींग क्षेत्रात मराठी टक्का फारच कमी आहे. त्यामुळे शिफारस मिळत नाही. इंडस्ट्रीशी संबंधीत सर्व कार्यक्रमांना हजर राहून ओळख वाढवत राहणे हाच यशाचा मार्ग आहे.
दुसरी महत्वाची अॅक्टीव्हीटी म्हणजे या उद्योगाशी संबंधीत एखादा कोर्स करणे. उदाहरणार्थ, रीफायनरी सारख्या संस्थेत जाऊन पेजंट कोर्स करावा.
अशा कोर्समध्ये काय शिकवत असतील याचा नमुना बघा !
आकर्षक मेक अप कसा करावा, केशभूषा कशी असावी, रँप वॉकचा सराव, व्यक्तिगत शैलीचा विकास, वक्तृत्व, मुलाखतीची तयारी, सार्वजनीक शिष्टाचार, व्यक्तीमत्व विकास, शूटींगची तयारी, कॅमेरासमोर कसे सामोरे जावे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची तयारी वगैरे वगैरे !! अशा कोर्सला ६०००० ते १००००० खर्च असतो.
आता अत्यंत महत्वाचा सल्ला !!
हे क्षेत्र रोज तुमच्या मनोधैर्याची परीक्षा घेत असते. नैराश्य येईल अशा घटना रोज अनुभावस येत असतात, नैतिकतेची पातळी सोडण्याचा आग्रह केला जातो. SAD म्हणजे सेक्स, अल्कोहल आणि ड्रग्ज याचा वापर सर्रास होत असतो. अशा माहोलमध्ये नैतिकता टिकवून ठेवणे हीच यशाची महत्वाची पायरी आहे.
आता शेवटचा मुद्दा ? पैशाचं काय ?
या क्षेत्रात फ्रेशरला सुरुवातीला ३ ते चार हजार दिवसाला मिळतात. वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा बघून दिवसाला १५ ते २० ह्जाराचा टप्पा गाठता येतो. फॅशन मॉडेलींगमध्ये एका शिफ्टला लाख रुपयापर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. सातत्य आणि नैतिकता यांची जोड असली तर म्हणतात तसे स्काय इज द लिमीट !!
आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे.
(हा लेख पुढे वाचण्यापूर्वी एक महत्वाची सूचना : या लेखात उल्लेख असलेल्या एजन्सी, जाहिरात कंपन्या आणि इतर संदर्भांशी बोभाटाचा काहीही व्यावहारीक संबंध नाही. ही माहीती वापरून केलेल्या व्यवहारात बोभाटाची जबाबदारी नाही. )
आणखी वाचा :
शो स्टॉपर, लॉंजरी ते कमर्शियल...जाणून घ्या मॉडेलिंगचे दहा प्रकार!!