२०१७पासून इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळतोय. जाणून घ्या नक्की काय करतात इंदूरकर!!

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत यंदाचे विजेते घोषित झाले आहेत. या यादीत दरवर्षी एक नाव असतेच असते ते म्हणजे इंदूर... गेले सलग ६ वर्ष इंदूर शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळत आहे. देशात इतर शहरांचे विविध स्वच्छता विषयक कार्यक्रम सुरू असताना इंदूर सलग सहा वर्षे विजेते ठरण्यामागे काय कारण असावे हा प्रश्न आम्हाला पडला. २०१६ यावर्षी २५ व्या क्रमांकावर असणारे इंदूर २०१७ पासून आजवर सलग पहिल्या स्थानी आहे. इंदूरच्या या स्वच्छता यशाचा फॉर्म्युला आज आपण जाणून घेणार आहोत. 

२०१६ साली इंदूरची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली. महापालिकेची त्यावेळेस कुठलीही पद्धतीशीर व्यवस्था नव्हती. कचरा उचलणे आणि त्यांची वाहतूक करणे यांची कुठलीही व्यवस्था नव्हती. कचरा उचलण्याची जिथे सिस्टीम नाही तिथे कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि त्यांची प्रक्रिया करणे याचा तर विषय दूरच राहिला. जवळपास १३ लाख टन कचरा एकाच ठिकाणी गोळा झालेला असल्याने दुर्गंधी, रोगराई यामुळे लोकांचे हाल होत होते. 

पूर्ण शहरातील फक्त ५ टक्के कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जात असे. अशी सगळी अवस्था असताना ही परिस्थिती बदलण्यासाठी ना नागरिक उत्साही दिसत ना महापालिका कर्मचारी त्यासाठी मेहनत घेताना दिसत होते. इतर शहरांप्रमाणे कचरा व्यवस्थित गोळा करून त्यांची विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करणे याबद्दल कुणाचीही काही वेगळे करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. 

२०१४ साली देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाले आणि २०१६ साली इंदूर देशात २५ व्या स्थानी होते. तर दुसरीकडे इंदूर ग्रामीण मात्र उघड्यावर शौचमुक्त जिल्ह्याच्या बाबतीत देशात दुसऱ्या स्थानी होते. आता इंदूर महापालिकेला पण याबाबत आपण काहीतरी करायला हवे असे वाटू लागले होते. त्यावेळी मनपा आयुक्त मनीष सिंग आणि पुढे आलेले आशिष सिंग यांनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली .

सर्वात मोठे जर का आव्हान त्यावेळी कुठले होते तर नागरिकांना घरच्या घरी ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठी जागृत करणे. तसेच उघड्यावर कचरा न टाकण्याबद्दल देखील जनजागृती करावी लागणार होती. या सर्वांवर मात द्यायची तर होती म्हणून इंदूर या कामी लागले.

 प्रत्येकाला घरोघरी कचरापेटीचे वाटप करण्यात आले. महापालिका कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घरोघरी जाऊन कचरा वेगळा करण्याबद्दल नागरिकांना माहिती देत असत. अशात तेव्हा तिथे अनेकवेळा सांगूनही एक गृहस्थ ऐकत नव्हते म्हणून स्वतः अधिकाऱ्यांनी कचरा वेगळा करण्याचीही एक घटना घडली. त्यानंतर लाजेकाजेमुळे का होईना, पण कचरा वेगळा करण्याचे प्रमाण वाढले. काही धार्मिक गुरू आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी सामूहिक साफसफाईचे कार्यक्रम केले, यामुळे देखील लोक जागृत झाले. महापालिकेने ८५० स्वयंसहायता गटातील ८५०० महिलांना कचरा विलगीकरण जागृती मोहिमेत सहभागी करून घेतले. तसेच विविध सोसायट्या आणि मार्केट्ससाठी शून्य कचरा मोहीम सुरू करण्यात आली. 

यात कचरा उघड्यावर टाकला किंवा घरच्या घरी कचरा विलगीकरण न करणाऱ्या लोकांना दंड आकारण्यात येऊ लागला. दट्ट्या दाखवून आणि जागृती करून अशा दोन्ही पद्धतीने काम सुरू होते. कचरा विल्हेवाट आणि प्रक्रिया याबद्दल करण्यात आलेल्या जागृतीमुळे लोक घरच्या घरी कचरा कंपोस्ट करू लागले. यात पुढचे पाऊल म्हणजे कचरपेटी मुक्त शहर तयार करण्याचा संकल्प करण्यात आला. 

यात झाले काय की कचरा नेमका कुठून येतो याबद्दल माहिती गोळा झाली. ही मोहीम कमी वेळेत यशस्वी झाली तसेच अनेक एनजीओंना घरोघरी कचरा गोळा करण्याविषयी जागृत करण्यासाठी मदतीस सोबत घेण्यात आले. यात अजून एक भन्नाट गोष्ट घडली, ती म्हणजे विविध वॉर्डातील नगरसेवकांमध्ये कोण आपले वॉर्ड अधिक स्वच्छ ठेवतो अशी स्पर्धा लागली. एक अर्थाने संपूर्ण इंदूर शहर स्वच्छ इंदूर करण्यासाठी झपाट्याने कामाला लागले होते.

याचाच परिणाम म्हणून २०१७ साली इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला जो आजही अढळपणे टिकून आहे. आजच्या तारखेला १०० टक्के कचरा घराघरांतून गोळा केला जातो. त्याची वाहतूक करून योग्य ठिकाणी विल्हेवाट प्रक्रिया केली जाते. सफाईसाठी अत्याधुनिक मशिन्स वापरण्यात येतात. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी इन्फर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो. 

कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जातो याची सर्व माहिती ठेवणारे एक ऍप तयार करण्यात आले आहे. यावर नागरिक आपल्या प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. इंदूर शहरात ओला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी दरदिवशी २०० टन क्षमता असणारे बायो सीएनजी प्लांट स्थापन करण्यात आले आहेत. यातून बायोमेथानीझेशन पद्धतीने कचरा प्रक्रिया केली जाते. या बायो सीएनजी गॅसवर आज इंदूर शहरात १५ सिटी बस धावताना दिसतात.

त्याचप्रमाणे सुका कचरा प्रक्रियेसाठी ३०० टन प्रतिदिन क्षमतेचे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर सुरू करण्यात आले. या शहरात बायोरेमेडीअशन पद्धतीचा वापर करून तेथील कचरा डेपोला ग्रीन बेल्टमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. यातून शेकडो एकर जमीन सुंदर भागात बदलली गेली आहे. जिथे यायला लोक नाक मुरडत ती जागा आता व्हीआयपी लोकांना चहा घेण्याची हक्काची जागा वाटू लागली आहे. 

रेड्युस, रियुज आणि रिसायकल या तीन आरचा वापर करून ५ पेक्षा अधिक प्रकल्प सुरू करण्यात येऊन इंदूरचा कचरा प्रश्न कमी करण्यात आला आहे. टाकाऊपासून टिकाऊ असे अनेक गोष्टी तयार करत त्यांचा पुरेपूर उपयोग या माध्यमातून करण्यात येऊ लागला. तसेच दरवर्षी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवे गाणे तयार करण्यात येऊ लागले. ३ वर्ष झाली तेव्हा हॅट्रिक लगाऐंगे, चौथ्या वर्षी चौका लगाएंगे तर यंदा छक्का लगाएंगे अशा गाण्यांनी नागरिकांना सामील करण्यात आले.

एकदा पहिला क्रमांक आल्यावर इंदूरकर दरवर्षी हिरीरीने पुन्हा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी मेहनत करून लागले. आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयाने इंदूरने एवढी मोठी झेप घेतली आहे. इंदूरच्य या स्वच्छता मॉडेलचे अनुकरण केले तर देशातील इतरही शहरांना स्वच्छ शहर होण्यास वेळ लागणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required