computer

समयसूचकता दाखवत या मजूर महिलेने शेकडो प्रवाशांचा जीव वाचवला!!

समाजासाठी काही करण्यासाठी आपण स्वत: खूप मोठे व्यक्तीमत्व असण्याची गरज नसते. आपल्या समोर घडणाऱ्या गोष्टींत होईल तितके सकारात्मक प्रयत्न केल्यास आपले छोटे प्रयत्नही मोठे बदल घडवून आणू शकतात. उत्तर प्रदेशात एका महिलेने दाखवलेल्या एका सावधगिरीने असाच मोठा बदल घडवून आणला आहे.

रेल्वे अपघात ही तशी भारतात सातत्याने कानावर येणारी गोष्ट आहे. पण सामान्य लोकांनी बऱ्याचदा तत्परता दाखवत कधी लहान तर कधी मोठी हानी टाळली आहे. काही दिवसांपूर्वी बोभाटावर रेल्वे रूळ तुटले म्हणून घरी पळत जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना जागृत करणाऱ्या एका मजुराबद्दल तुम्ही वाचले असेल. 

तुटलेला रेल्वेमार्ग सांगण्यासाठी हा गुजरातेतला तरुण १ किमी धावला!! बक्षीस मिळालेच, पण केवढी मोठी दुर्घटना टळली!!

उत्तरप्रदेशातील इटाह जिल्ह्यात एका मजूर महिलेने याचप्रमाणे शेकडो प्रवाशांचा जीव वाचवला आहे. ओमवती या महिलेने रेल्वे ट्रॅक खराब झालेला बघून लाल निशाण दाखवत रेल्वे थांबविण्याची ही घटना आहे. ओमवती यांना जेव्हा हा रेल्वे ट्रॅक खराब झालेला दिसला, तेव्हा त्यांनी लागलीच आपली लाल साडी दोन काठ्यांच्या सहाय्याने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला बांधली आणि होऊ घातलेली दुर्घटना टळली.

इटाह जिल्ह्यातील गुलेरिया गावाजवळ ही घटना घडली आहे. इटाह पासून तुंडला या रस्त्यावर पॅसेंजर रेल्वे धावत असताना ड्रायव्हरची नजर या लाल निशाणाकडे गेली आणि त्याने धोका ओळखत लागलीच गाडी थांबवली. पुढील तासाभरात हा रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला.

यूपी येथील पोलीस सचिन कौशिक यांनी ट्विटरवर ओमवती यांच्याबद्दल माहिती सांगितली आणि सर्व बाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. ओमवती यांनी दाखवलेले धारिष्ट्य खरोखर शेकडो लोकांचे जीव वाचविण्यास कारणीभूत ठरले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required