अतिरेकी कंपूत प्रवेश करून दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालणाऱ्या मेजर मोहित शर्मांची गोष्ट तर वाचा!!
सैन्यातील अधिकाऱ्यांचे काम जितके शौर्याचे असते, तितकेच ते हुशारीचे पण असते. भारतीय लष्कर हे देशाचे अंतर्बाह्य रक्षण करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढत असते. आपले धाडसी अधिकारी स्वतःच्या जीवाची जोखीम घेऊन शत्रूच्या गटात शिरून त्यांची सफाई करून येतात. मेजर मोहित शर्मा या नावामागील गोष्ट म्हणूनच चित्तथरारक आहे.
मेजर मोहित शर्मा २१ मार्च २००९ रोजी उत्तर कश्मीर येथील कूपवाडा येथे शहिद झाले होते. मेजर शर्मा असॉल्ट टीमचे नेतृत्व लीड करत होते आणि ते एका पॅरा स्पेशल फोर्सचे कमांडो होते. कुपवाडाच्या जंगलात झालेल्या तुफान चकमकीत त्यांनी इंडियन मुजाहिदीनच्या ४ अतिरेक्यांना मारत दोन भारतीय सैनिकांचे रक्षण केले होते. या ऑपरेशनचे नाव रक्षण असे ठेवण्यात आले होते.
२००९ मध्ये शहीद होण्यापूर्वी २००४ साली मेजर शर्मा यांनी थेट अतिकेरी बनून हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेत प्रवेश घेत, त्यांना गुंगारा दिला होता. अबू तोरारा आणि अबू समझार या दोन कुख्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी जबरदस्त धाडसी अस प्लॅन आखला. आपली संपूर्ण वेशभूषा बदलत ते अतिरेक्याचे रूप घेऊन या लोकांमध्ये शिरले.
इफ्तीखार भट असे नाव त्यांनी धारण केले. या दोन्ही अतिरेक्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी आपला भाऊ भारतीय सैन्याकडून मारला गेला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी आपण तुमच्यात सामील होत आहोत असे त्यांनी सांगितले होते. मेजर शर्मा यांनी या दोघांचा विश्वास संपादन करून भारतीय आर्मी चेक पॉईंटवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला.
जेव्हा दोन्ही अतिरेकी आपण काहीदिवस अंडरग्राऊंड राहून मदत मिळवू असे म्हणू लागले, तेव्हा जे काही करायचे ते आपणच करू असे म्हणत मेजर शर्मांनी या दोघांना परत जाऊ दिले नाही. पण हे अतिरेकीही काही कच्चे नसतात, ते वेळोवेळी मेजर शर्मा यांच्याकडून ओळख मागायचे, पण दरवेळी मेजर त्यांना काहीतरी कारण सांगून उडवून लावायचे.
एके दिवशी फक्त हे तीन लोक उपस्थित असताना त्यांनी जेव्हा परत ओळखीचा विषय काढला, तेव्हा मेजर शर्मा यांनी आपली बंदूक फेकून दिली आणि म्हणाले, 'माझ्यावर विश्वास नसेल तर ही घ्या बंदूक आणि मला मारून टाका'. आता दोन्ही अतिरेकी संभ्रमात पडले होते. पण मेजर समजून चुकले होते, आपला हा गेम काही जास्त काळ चालणार नाही.
बाजूला पडलेली बंदूक उचलत मेजर शर्मांनी एकामागून एक दोघांच्या छातीत गोळ्या घातल्या. दोन्ही अतिरेकी सावरू देखील शकले नाहीत. अशा पद्धतीने मेजर शर्मा यांनी स्वतःच्या जीवाची जोखीम घेत देशाचे दोन मोठे शत्रू संपविले होते. आपला भारतीय पठ्ठ्या पाकिस्तानी जमिनीवर त्यांना मारून भारतात परतला होता.
२००९ साली मेजर शर्मा यांना बातमी मिळाली की कुपवाडाच्या जंगलात काही अतिरेकी लपले आहेत. खुसघोरी करण्याचा त्यांचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी मेजर शर्मा आपले साथीदार घेऊन जंगलात घुसले. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला आणि शर्मा यांच्या रायफलने दोन अतिरेकी टिपले.
चकमक ऐन भरात सुरू होती आणि एक गोळी येऊन थेट मेजर शर्मांच्या छातीत घुसली. अशावेळी लिडिंग अधिकाऱ्याकडे मागे फिरणे हा पर्याय उपलब्ध असतो. पण भारत मातेचा हा शूर सैनिक उठला आणि जीवाच्या आकांताने लढू लागला. जखमी अवस्थेत कमांडस देत ते लढत होते. याच चकमकीत त्यांनी आपल्या दोन सैनिकांचे प्राण वाचवले.
चार अतिरेक्यांना कंठस्नान घालत मेजर शर्मा यांनी त्यांचा भारतीय जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्लॅन तर हाणून पाडला, पण यात त्यांना मात्र हौतात्म्य पत्करावे लागले. तब्बल दोन मोठ्या ऑपरेशन्स मध्ये जिगरबाज कामगिरी करत देशाची शान राखणाऱ्या मेजर शर्मा यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मेजर मोहित शर्मा यांचे शौर्य आणि हुशारीने भरलेले आयुष्य एखाद्या सिनेमाला शोभावे असेच आहे. त्यांचा आयुष्यावर बेतलेला इफ्तिकार सिनेमा काही महिन्यात लोकांच्या भेटीस येणार आहे.
उदय पाटील




