computer

गुलाबजाम वडापाव पाहिला ? आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला ?

गुलाबजाम पँनकेक, पीनट बटर विथ पिकल, नूडल्स पाणीपुरी, वडापाव सॅलड.. पट्टीच्या खवय्याला मूळ स्वरूपातल्या पदार्थांसोबतच असे फ्युजन पदार्थ ही जाम आवडतात. तसंही माणसाला सतत काहीतरी नवीन हवं असतं. यातून मग लोक वेगवेगळे ही नवीन प्रयोग करतात. फ्यूजन फूड हा असाच एक प्रयोग. रस्त्यावर मिळणाऱ्या चायनीज भेळेपासून फाईव्ह स्टार काय, सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये ते रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत फ्युजन पदार्थांची बरीच मोठी यादी आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्या फ्युजनमधून नवीन कल्पक पदार्थ बनवणं ही एक नवीन फॅशनच खाद्य व्यवसायात सगळीकडे दिसते.

कल्पना करा, तुम्हाला खूप प्रचंड भूक लागलीय आणि समोर एका ठिकाणी वडापाव मिळतोय असं दिसलं. तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर देण्याच्या बेतात आहात आणि तुम्हाला कळलं की त्यात वड्याच्या जागी गारेगार आइस्क्रीम आहे, तर... जातिवंत खवय्ये नक्कीच हा पदार्थ ट्राय करून पाहतील. हा प्रकार आहे आइस्क्रीम वडापाव! हे करून दाखवलंय एका दिव्यांग गुजराती युवकाने.

अमित ठक्कर नावाच्या एका तरुणामुळे मुंबईचे 'स्ट्रीट फूड' म्हणून ओळख असणाऱ्या वडापावाला वेगळं रूप दिलंय. काही दिवसांपूर्वी आइस्क्रीम वडापावचा व्हिडीओ एका साईटवर अपलोड झाला होता. ह्यातून त्याच्या निर्मितीची कथा पण उलगडून दाखवली होती. पावावर पहिल्यांदा कुठल्याशा सुगंधी द्रवाचं शिंपण, मग त्यावर गारेगार आईस्क्रीमच्या स्कुपची प्रतिष्ठापना, त्यानंतर त्याला परत एकदा त्याच सुगन्धित द्रवाने स्नान आणि वर ड्रायफ्रुट्सची पखरण. अहाहा! नुसत्या वर्णनानेच तोंडात अर्धा लिटर पाणी जमा होईल!

आज कोविड संकटामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असताना अमित ठक्कर या अहमदाबादच्या दिव्यांग तरुणाने मात्र स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर 'आईस वडापाव बनवून आपल्या रोजगाराचा मार्ग खुला केला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक नेटिझन्सनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. शेवटी काय, ६ मीटर आतड्याकडे ढकलला जाण्याआधी पदार्थ २ इंची जिभेकडून पास व्हावा लागतो यातच सगळं आलं.

तुम्ही आजवर वडापावचे कोणते फ्युजन प्रकार खाल्ले आहेत? त्यातला तुम्हांला आवडलेला प्रकार कोणता? की आपला अस्सल झणझणीत, गोड-आंबट दोन्ही चटण्या लावलेला, तळलेल्या हिरव्या मिरचीसोबतचाच वडापाव तुम्हांला जास्त आवडतो?

 

लेखिका : स्मिता जोगळेकर 

 

सबस्क्राईब करा

* indicates required