computer

जय हो- 'इकुतारो काकेहाशी' संगीताचे शिक्षण न घेतलेला इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा जनक!!

आजच्या लेखाचा विषय आहेत इकुतारो काकेहाशी.जग त्यांना 'तारो' या टोपणनावाने ओळखते. ते एक क्रांतिकारी जपानी अभियंता, शोधक आणि उद्योजक होते. त्यांनी संगीत वाद्य उत्पादक कंपनी एस टोन,रोलँड कॉर्पोरेशन, बॉस कॉर्पोरेशन आणि ऑडिओ व्हिज्युअल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एटीव्ही कॉर्पोरेशनची स्थापना केली. त्यांनी आयुष्यात अगणित हालअपेष्टा काढल्या, पण त्यातून न खचता तारोंनी संगीत क्षेत्रामध्ये इतिहास रचला. त्यांच्या हाल-अपेष्टांबद्दल वाचलं तर एखादा तिथेच हातपाय गाळून बसेल. पण हे व्हायचं नव्हतं आणि संगीताचा गमभनही न शिकलेले तारो इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे जनक बनले.

काकेहाशी यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३० रोजी ओसाका, जपान येथे झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे थोडे शिक्षण घेतले होते आणि ओसाकाच्या हिताची शिपयार्डमध्ये काम करत होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना काकेहाशींना संगीत ऐकण्याचा एक मार्ग म्हणून रेडिओमध्ये रस निर्माण झाला.

ते अगदी लहान असताना त्यांचे आई-वडील क्षयरोगाची शिकार झाले होते. आजी-आजोबांनी त्यांचं पालनपोषण केलं. पण दुसऱ्या महायुद्धात त्यांचं घर बाॅंबहल्ल्यात जमिनदोस्त झालं. इतकं होऊनही दुर्दैव काही त्यांची पाठ सोडायला तयार नव्हतं. ज्या रोगामुळे त्यांनी आई-वडील गमावले, तोच त्यांना देखील झाला. क्षयरोग झाल्यामुळे त्यांना काॅलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. हे तर काहीच नाही, त्या काळात क्षयरोगावर खात्रीचा उपाय नसल्यामुळे त्यांना अनेक वर्षे सॅनेटोरिअममध्ये घालवावी लागली, जिथे ते प्रायोगिक प्रतिजैविक औषध स्ट्रेप्टोमायसिनसाठी क्लिनिकल चाचणी रुग्ण बनले; म्हणजे गिनीपिगच म्हणा ना! ते औषध परिणामकारक ठरलं तर ठीक, नाहीतर... स्ट्रेप्टोमायसिन अत्यंत गुणकारी असल्यामुळे हळूहळू का होईना पण त्यांची प्रकृती सुधारली.

तारोंनी वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी काकेहाशी क्लॉक स्टोअर हे घड्याळ दुरुस्तीचे दुकान उघडले आणि काही दिवसांनी रेडिओ दुरुस्त करण्यास सुरुवात केली. आठेक वर्षांत या दुकानाचं रुपांतर काकेहाशी रेडिओ आणि इलेक्ट्रिकल उपकरणांच्या दुकानात झाले. फावल्या वेळेत ते इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची दुरुस्ती करत. २८ व्या वर्षात पदार्पण करताकरता त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाद्य आणि साधने बनवण्याचा ध्यास घेतला. काकेहाशींना संगीताचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते, पण संगीताचे कान मात्र नक्कीच होते. वाद्य व्यावसायिकांसाठी तसेच स्वत:सारख्या हौशींसाठी स्वस्त, लहान आणि वाजवण्यास सोपी वाद्ये बनवावी अशी त्यांची इच्छा होती. १९५९ मध्ये त्यांनी पहिले, कोणालाही वाजवता येईल असे ४९-की मोनोफोनिक ऑर्गन तयार केले.

१९६० मध्ये काकेहाशींनी एस इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजची स्थापना केली. १९६४ मध्ये त्यांनी 'आर१ रिदम एस' हे पहिले इलेक्ट्रॉनिक ड्रम विकसित केले, परंतु ते स्वयंचलित नव्हते, किंवा त्यात प्रीसेट (Pre-set) लय नसल्यामुळे त्याचे व्यावसायिकीकरण झाले नाही. नंतर त्यांनी पूर्णपणे ट्रान्झिस्टराइज्ड इलेक्ट्रॉनिक रिदम मशीनवर काम करण्यास सुरुवात केली. १९६७ मध्ये काकेहाशींनी "ऑटोमॅटिक रिदम परफॉर्मन्स डिव्हाईस" ड्रम मशीनचे पेटंट घेतले आणि १९७० पर्यंत त्याचा वापर लोकप्रिय संगीतात होऊ लागला. संपूर्ण जगात या ड्रम मशीनचा बोलबाला झाला. १९७२ मध्ये काकेहाशी यांनी रोलँड कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि चार दशके त्या कंपनीचे नेतृत्व केले.

रोलँडमध्ये त्यांनी ड्रम मशीनच्या विकासावर आपले काम चालू ठेवले. ड्रम मशीन प्रोग्राम करण्यासाठी मायक्रोप्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले. तारोंनी १९७८ मध्ये पहिले मायक्रोप्रोसेसर चालित प्रोग्राम करण्यायोग्य ड्रम मशीन सादर केले. हे ड्रम डिस्को, आर अँड बी, रॉक आणि पॉप गाण्यांमध्ये १९७० ते १९८० च्या दरम्यान वापरले गेले. १९८० ते १९९० मध्ये रोलँडने लोकप्रिय संगीतावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारी अनेक वाद्ये सादर केली.

१९९४ मध्ये काकेहाशी यांनी रोलँड फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष झाले, आणि १९९५ मध्ये त्यांची रोलँड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. २००१ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि रोलँड कॉर्पोरेशनचे विशेष कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्त झाले. २००२ मध्ये काकेहाशी यांनी "आय बिलीव्ह इन म्युझिक" हे आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांचे दुसरे पुस्तक "ॲन एज विदाऊट सॅम्पल्स: ओरिजिनॅलिटी अँड क्रिएटिव्हिटी इन द डिजिटल वर्ल्ड" २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

२०१३ मध्ये काकेहाशी यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडणारे तांत्रिक मानक 'मिडी' या शोधासाठी तांत्रिक ग्रॅमी पुरस्कार मिळाला. इलेक्ट्रॉनिक, नृत्य, हिप हॉप, आर ॲंड बी, रॉक आणि पॉप संगीत यासारख्या लोकप्रिय संगीत शैलींना आकार देण्याचे श्रेय काकेहाशीच्या शोधांना दिले जाते.

अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करत संगीत क्षेत्रामध्ये इतिहास घडवणारे इकुतारो काकेहाशी म्हणजे संगीत क्षेत्राच्या अवकाशातील अढळ तारा.

चंद्रशेखर अनंत मराठे

सबस्क्राईब करा

* indicates required