computer

अमेरिकेतल्या या १४ खुनांमुळे औषधनिर्मिती, पॅकेजिंग आणि वापर हे सगळंच बदललं.

भारतातली पहिली महिला सिरियल किलर ‘सायनाईड मल्लिका’बद्दल तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. सायनाईड मल्लिका भोळ्याभाबड्या, घरच्या समस्यांना वैतागलेल्या बायकांना हेरून पूजा-अर्चा, देवधर्माचं आमिष दाखवायची आणि त्यांना अमुक एके ठिकाणी पूजेसाठी बोलवायची. येताना नटूनथटून, दागदागिने घालून ये असं आवर्जून सांगायची. या बायका तिचं ऐकायच्या. पूजा पूर्ण झाल्यानंतर ती तीर्थप्रसाद म्हणून बायकांना चक्क सायनाईड प्यायला द्यायची. 

अमेरिकेत देखील ८०च्या दशकात काहीशा अशाच पद्धतीने जवळजवळ १४ जणांचा बळी घेण्यात आला होता. इथे तीर्थप्रसादाच्या जागी औषधाची गोळी वापरण्यात आली होती. सायनाईड मल्लिकाच्या दुर्दैवाने आणि त्या भाबड्या बायकांच्या सुदैवाने ती पकडली गेली, पण अमेरिकेतलं हे प्रकरण कायमस्वरूपी रहस्य बनून गेलं आहे. ही घटना आजही आठवण्याचं कारण असं की या घटनेने औषध विक्रीचा आणि ग्राहक उत्पादनाचा चेहराच बदलला. तो कसा आणि हे प्रकरण नेमकं काय होतं हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

घटनेला सुरुवात होते १९८२ सालापासून. जॉन्सन अॅड जॉन्सन कंपनीचं ‘टायलेनॉल’ हे औषध डोकेदुखी आणि इतर लहानसहान आजारांसाठी रामबाण समजलं जायचं. आज आपण जसं लहानसहान आजारांसाठी पॅरासिटामोल, क्रोसिन सारख्या गोळ्यांकडे घेतो तसं त्याकाळी अमेरिकन्स टायलेनॉलकडे जायचे. या टायलेनॉलने मात्र १९८२ या वर्षात शिकागोमध्ये ७ लोकांचे बळी घेतले आणि पुढच्याच वर्षी आणखी ७ लोकांचे बळी घेतले. 

सुरुवात झाली ती शिकागोतल्या मेरी केलरमन या १२ वर्षांच्या मुलीपासून. तारीख होती सप्टेंबर २९, १९८२. मेरीला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं म्हणून ती सकाळीच आईवडिलांकडे गेली. आईवडिलांनी तिला टायलेनॉलची गोळी खायला दिली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

दुसऱ्या केसमध्ये २७ वर्षांचा अॅडम जानुस या तरुणाचा टायलेनॉल घेतल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. सुरुवातीला घरच्यांचा समज होता की अॅडमला हृदय विकाराचा झटका आला आहे. टायलेनॉलने मृत्यू होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हती. भावाच्या मृत्यूमुळे आणि धावपळीमुळे त्याच्या भावाने आणि वाहिनीने अॅडमच्या बाटलीतल्या टायलेनॉलच्या गोळ्या घेतल्या. भावाला लगेचच मृत्यूने गाठलं, तर वाहिनी २ दिवसांनी मरण पावली. 

पुढच्या काही दिवसांतच आणखी ३ जण मृत्युमुखी पडले. हे सर्वजण ३५ वयोगटातील होते आणि सुदृढ होते. पोलिसांना त्यांच्या मृत्यूमागचं कारण समजत नव्हतं, पण सर्वांमध्ये समान धागा असलेल्या टायलेनॉलने या ७ खुनांना एकत्र आणलं. आणि मग तपास सुरु झाला.

सर्वात आधी शिकागोच्या लोकांना टायलेनॉल न घेण्याचं आवाहन करण्यात आलं. जॉन्सन अॅड जॉन्सनची सबसिडरी असलेल्या मॅकनील कन्स्झ्युमर प्रोडक्ट्स या कंपनीने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर जाऊन सर्व टायलेनॉल औषधं परत मागवली. परत मागवलेल्या टायलेनॉलच्या बाटल्यांची संख्या ३ कोटींच्या वर होती. 

शिकागोतल्या किराणा मालाच्या दुकानात आणि फार्मसीमध्ये असलेल्या टायलेनॉलच्या बाटल्यांची तपासणी केली असता या गोळ्यांमध्ये सायनाईड आढळून आलं. सुदैवाने या ७ मृत्युनंतर कोणाचाही मृत्यू झाला नाही. 

या घटनेने जॉन्सन अॅड जॉन्सन कंपनीला मोठा फटका बसला. टायलेनॉलची प्रचंड विक्री रसातळाला गेली होती. याही परिस्थतीत जॉन्सन अॅड जॉन्सन कंपनीने डोकं ताळ्यावर ठेऊन एक नवीन टेक्निक शोधून काढली. त्यांनी औषधांच्या बाटल्यांना टेम्पर प्रुफ करायला सुरुवात केली. गोळ्यांच्या बाटलीचं झाकण उघडल्यावर वरच्या बाजूला चांदीच्या रंगाचा जो कागद आपल्याला दिसतो त्याचा जन्म याच घटनेमुळे झाला. 

१९८३ साली अमेरिकन सरकारने ‘टायलेनॉल बिल’ आणलं. या कायद्याअंतर्गत औषधं किंवा इतर ग्राहक उत्पादनांशी छेडछाड करणे गुन्हा ठरवण्यात आला. याचा परिणाम असा झाला की जॉन्सन अॅड जॉन्सनपाठोपाठ इतर सर्व औषध कपन्यांनी आपल्या इत्पादनांना ‘टेम्पर प्रुफ’ करायला सुरुवात केली. एवढंच नाही इतर अनेक कंपन्यांनी हीच पद्धत वापरली. खास करून खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांनी हे चांगलंच मनावर घेतलं. आजही हवाबंद खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्या हमखास टेम्पर प्रुफ पद्धत वापरतात.

‘टायलेनॉल बिल’मुळे हॉस्पिटल्स, संशोधन केंद्र यासारख्या ठिकाणी असलेल्या विषारी पदार्थांवर कायद्याची नजर राहू लागली. या प्रकरणातून आणखी एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे ज्याला आपण कॅप्सूल म्हणतो त्या गोळ्यांसोबत छेडछाड करणं सोपं असतं. या कॅप्सूल्स उघडून आत सायनाईड भरल्यास कोणाला पत्ताही लागणार नाही. या घटनेत तेच तर घडलं होतं. खुन्याने कॅप्सूल्सचा वापर करून लोकांना सायनाईड खाऊ घातलं होतं. या कॅप्सूल्सना पर्याय म्हणून ‘कॅप्लेट’ तयार करण्यात येऊ लागल्या. या गिळण्यास सोप्या असतात आणि त्यांत भेसळ करणं अवघड असतं. कॅप्लेट म्हणजे काय ते समजलं नसेल तर आपली आवडती पॅरासिटामोलची गोळी आठवा.

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे यामागचा गुन्हेगार कधीच हाती लागला नाही. जेम्स लुईस नावाच्या गुन्हेगाराने हे खून आपणच केले असल्याची कबुली दिली होती. त्याने धमकी देऊन म्हटलं की, "जर तुम्ही मला १ मिलियन (१० लाख) डॉलर्स नाही दिले तर मी आणखी लोकांचे खून करेन". तपासात आढळलं की जेम्स लुईस खंडणीसाठी २० वर्ष तुरुंगात राहून आला असला तरी त्याने हे खून केलेले नाहीत.

मग हे खून कोणी केले? हे आजही रहस्य आहे. पुढच्या काळात या पद्धतीचे खून झाले नाहीत. गोळ्यांसोबत छेडछाड केल्याप्रकरणी १९८७ साली एका विवाहितेला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पण तिचा या केसशी संबंध नव्हता. तिने आपल्या नवऱ्याचा आणि एका महिलेचा जीव घेतला होता. तेव्हापासून आजवर या खूनांमागचा गुन्हेगार सापडलेला नाही. या घटनेत नेमकं काय घडलं होतं याचा एक अंदाज पोलिसांनी लावला होता. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे औषधं फॅक्ट्रीमधून बाहेर पडल्यानंतर गुन्हेगाराने त्यात साइनाईड भरलं होतं. कॅप्सूल्स असल्याने कोणालाही संशय आला नाही.

या घटनेने काय दाखवून दिलं? तर, ग्राहक उत्पादनातील पळवाटा दाखवून दिल्या. आपण आज ज्या टेम्पर प्रुफला गृहीत धरतो आणि काहीवेळा आपल्याला ज्याचा वैतागही येतो ते किती गरजेचं आहे हे या प्रकरणातून समजलं. एका अर्थी औषधांची निर्मिती, त्यांचा वापर याची पद्धतच या घटनेने बदलून गेली.

सबस्क्राईब करा

* indicates required